पुस्तक परिचय क्रमांक-६९पावनखिंड
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६९
पुस्तकाचे नांव--पावनखिंड
लेखक-रणजित देसाई
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण फेब्रुवारी २०१९
एकूण पृष्ठ संख्या-१५८
वाङमय प्रकार --- ऐतिहासिक कादंबरी
मूल्य--१५०₹
---------------------------------------------------------------------
६९||पुस्तक परिचय
पावनखिंड
लेखक रणजित देसाई
"""""""""""""""""'""'""""""""""""""""”""""""""""""""""""""""""""""""""""""
नशिबाने यासंकटातून पार पडलोच, तर…
बाजी, पालखीचा मान तुम्हांला देऊ
त्यावेळी तुम्हाला कळेल, ही पालखी केवढं सुख देते, ते!
पालखी हेंदकाळत धावत होती. अचानक पालखी थांबली. मागून नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,' बाजी,गनिम पाठलाग करतोय.'
बाजी ओरडले,' थांबू नका, पळा.' राजांंची पालखी धावत होती. वेग वाढला होता. पांढरपाणी ओलांडून खेळण्याचा पायथा गाठला. गजाखिंडीत पालखी आली आणि पालखी थांबली. पालखी वरचं अलवान उचललं. 'राजे,उतरा.'
'बाजी काय झालं??' राजांनी विचारलं 'राजे दैवानं दावा साधला.खेळणा सुर्व्यांच्या मोर्चात सापडलेला आहे.'बाजी! चिंता करू नका, सुर्व्यांंचे मोर्चे जरूर आम्ही मोडून काढू.'राजे. उद्गगारले. 'राजे उसंत नाही. तीनशे धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा,आम्ही ही घोडखिंड लढवतो.'राजे म्हणाले, 'नाही! तुम्हाला सोडून जाणार नाही. जे व्हायचं असेल ते, होऊ दे.' राजांंना काही सुचत नव्हते.बाजींचंं वेडावलं रुप ते पाहत होते.
बाजी म्हणाले,' राजे,आता बोलत बसण्याची वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिलात,तो पाळा.तुम्ही आमची चिंता करू नका. तुम्ही गड गाठा.गडावर जाताच तोफेचा आवाज करा.तोवर एकही गनीम या घोडखिंडीतून आत येणार नाही.' राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली.फुलाजीला कवटाळलं. बाजी म्हणाले, 'राजे परत नाही भेटलो, तर आठवण विसरू नका.'
अशा एकसोएक वेचक उताऱ्यांचे वाचन करताना रसिक मंत्रमुग्ध होतात.ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध पावलेले.रसिक वाचकांच्या मनावर समर्थ लेखणीतून अधिराज्य गाजविणारे साहित्यिक रणजित देसाई.त्यांच्या साहित्य साधनेची अनेक अक्षरशिल्पे लोकप्रिय आहेत.त्यांनी चौफेर साहित्य क्षेत्रात लेखन केले आहे.त्यांच्या या कार्याचा भारत सरकारने 'पद्मश्री'किताब देऊन गौरव केला आहे.महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार पुरस्काराने सन्मानित केले आहे.त्यांची ही ऐतिहासिक कादंबरी 'पावनखिंड'
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य संस्थापित करताना स्वता:च्या प्राणाहुतीने सोनेरी इतिहास निर्माण करणाऱ्या एका जिगरबाज साहसी शिलेदाराची शौर्यगाथा 'पावनखिंड' आहे.त्याग, असिम भक्ती आणि स्वामिनिष्ठा शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेल्या समर गाजविणाऱ्या जंगजौहर करणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची गौरवगाथा.हजारो गनिमांना भिडणारे पराक्रमी मावळे.याच ३०० मावळ्यांच्या हिकमतीने खिंड लढविणारे बाजीप्रभू देशपांडे…..
दोन्ही हाताने दांडपट्ट्याने शत्रूला नामोहरम करण्यात हातखंडा असणाऱ्या बाजीप्रभुंच्या ऐतिहासिक कर्तृत्ववाचा ठसा अधोरेखित करणारी ऐतिहासिक कादंबरी'पावनखिंड.'
पावनखिंडीचे नाम उच्चारताच आपल्याला डोळ्यासमोर पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मुसळधार पावसात गडद धुक्यातून सहीसलामत विशाळगडाकडे घेऊन जाताना घोडखिंडीतील रणांगण गाजविलेल्या जहाबाॅंज बाजींची याद येते.
पावनखिंड कादंबरी बारामावळातील हिरडस मावळावर आदिलशहाची चाकरी करणाऱ्या स्वता:ला राजा म्हणवून घेणाऱ्या कृष्णाजी बांंदल-देशमुख.या वतनदाराकडे दांडपट्टा बहाद्दर बाजीप्रभू देशपांडे दिवाण होते.स्पष्ट,करारी आणि स्वामीनिष्ठ आणि शौर्य या मर्दुमकीमुळे हिरडस मावळात त्यांचा दबदबा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिड्यावर स्वारी केली त्यावेळी वीर लढवय्ये बाजींनी गाठ पडली.क्षणभर युध्दाचं भान विसरून बाजी शिवाजी महाराजांचे रुप निरखीत होते.तसेच आवेशपूर्ण बोलत होते.राजेही आपल्या भूमीच्या रक्षणासाठी, आम्हाला योग्य सल्ला देण्यासाठी तुमच्या सारखी वडील माणसं आम्हाला हवीत.असे म्हणाले.तदनंतर कधी हातातला पट्टा गळून पडला आणि बाजी राजांच्या मिठीत बध्द झाले.
अशा अनेक प्रसंगांचे वर्णन कादंबरीकार रणजीत देसाई यांनी अप्रतिम शैलीत लेखन केले आहे.यातील उताऱ्यांचे वाचन करताना रोमारोमांत इतिहास सळसळतो.प्रसंग डोळ्यासमोर घडतात.आपणही वाचनात गुंग होऊन जातो.इतकं अचूक वर्णन प्रसंगांचे केले आहे.महान वीरांच्या बाजी आणि फुलाजी या बंधूंच्या अलौकिक शर्थीने लढविलेल्या आणि पवित्र रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीच्या 'पावनखिंड'ची कथा छान रंगवली आहे.
वाचताना देहभान हरपते.उत्कंठा वाढते.
यशवंताचे गुणाजी जगदाळेचे धारकरी म्हणून बाजीसोबत झालेले तलवारीचे हात,रोहिड्याची चढाई व बाजींच्या गुणांची पारख , रोहिडा ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचा बाजींच्या सिंध गावचा पाहुणचार, बाजींनी जासलोड(मोहनगड) गडाच्या दुरुस्तीची फतेह केलेली कामगिरी.जासलोड गडाची तीन वर्षांत बाजींनी पुनर्बाधणी केली. किल्लेदार विठोजी गडकरी, तात्याबा म्हसकर आणि गुणाजी जगदाळे यांच्या सहकार्याने गडाची दुरुस्ती, यशवंताची खंबीर साथ.गडाचे तट,माच्या व बुरुज दुरुस्त करणे.कोठार बांधणे,किल्लेदाराच्या वाडा, शिबंदीचं निवासस्थान अशी प्रचंड कामं बाजींनी हिंमतीने कशी पूर्ण केली याचे रसदार वर्णन केले आहे.यशवंताची वाघराबरोबर झुंजणं.दाट रानात पसरलेल्या मुलुखात ताशीव कड्यांनी गड आकाशात चढला होता.कमानीवरील नगारखान्यावर भगवा जरीपटका डौलाने फडकत होता.गडपाहणी करायला राजाचं येणं,सखुचं राजांबरोबर प्रेमळ बोलणं,वेताळ बुरुजाखाली मोहऱ्यांचे हंडे सापडणं.राजांनी या गडाला 'मोहनगड'हे सार्थ नाव ठेवणं.
शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचे साहसी वर्णन,त्यावेळी गनिमाच्या फौजेला पळता भुई थोडी करणारी जेधे,नेतोजी आणि बाजीची अतुलनीय कामगिरी, अफजलखान वधानंतर महाराजांंचे वाईच्या तळावर आगमन, तद्नंतर राजांचे बाजी जेध्यासह आदिलशाही मुलुख जिंकत पन्हाळा गाठणे. सुवर्णाक्षरांनी लिहिली शौर्य गाथा म्हणजे पावनखिंडीतील रणसंग्राम.अशा अनेक प्रसंगांचे यथार्थ वर्णन सूक्ष्मपणे केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या विचारांचे अनेक पैलूंचे कौतुक बाजीप्रभू करताना दिसतात.अप्रतिम अक्षरशिल्पात कोरलेलं ऐतिहासिक साहित्य लेणं 'पावनखिंड' शब्दांचही बावनकशी सोनं झालेली, लोकप्रिय कादंबरी आहे.
# परिचयक -श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक ३ अॉक्टोंबर २०२१
Comments
Post a Comment