पुस्तक परिचय क्र.५७ बालकवी




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-५७

 पुस्तकाचे नांव--बालकवी भारतीय साहित्याचे निर्माते

 लेखकाचे नांव--दमयंती पांढरीपांडे

प्रकाशक- साहित्य अकादमी,नवी दिल्ली

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण २०१०

एकूण पृष्ठ संख्या-७१

वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी,ललित ई. )--ललित

मूल्य--४०₹

-----------------------------------------------

   "हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी

त्या नील सागरावरचा चतुर खलाशी

प्रिय सखा फुलांचा,ओढ्याचा सांगाती

त्यांच्यास्तव धुंडुनि ताराकण आकाशी  

आम्ही  धरेवर  अक्षर  या धनराशी "

   कवीवर्य कुसुमाग्रजांनी बालकवींचे वैशिष्ट्य सुंदर शब्दात व्यक्त केले आहे.'सौंदर्याच्या  सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे.'सौंदर्याचीआस्वाद घेण्याची क्षमता आणि संवेदनशीलता विशेष स्वरुपाची असणारे बालकवी कविता आणि नवकाव्य यात अनुबंध सांधणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जीवनचरित्र आणि साहित्यकृती "भारतीय साहित्याचे निर्माते बालकवी"या पुस्तकाचे लेखन लेखिका दमयंती पांढरीपांडे यांनी केले आहे.त्यांनी निसर्गात रममाण होणारे बालकवी यांच्या काव्यसंपदेचे समीक्षण या पुस्तकात करून जीवनपट उलगडून दाखविला आहे.या मराठी भाषेच्या आस्वादक समीक्षा म्हणून प्रसिद्ध आहेत.

नागपुरातल्या श्रीमती बिंझाणी महिला महविद्यालयातील मराठी विभागाच्या होत्या.


   एका बाजूस प्रेम, शांती, सौंदर्य या तत्त्वांच्या अद्वैताची जाणीव आणि दुसऱ्या बाजूला याच अद्वैताच्या गूढ अतर्क्य रूपाचे विराट दर्शन आहे.हे बालकवींच्या निसर्ग कवितांमधील अध्यात्मिक चिंतनाचे स्वरूप आहे. काळ ही संकल्पना बालकवींच्या प्रतिमा विश्वाला एक विशिष्ट आकार प्राप्त करून देते. प्रभात सायंकाळ आणि रात्र या तिन्ही काळात बालकवींची कविता फुलत जाते. आपले स्वतंत्र आणि समृद्ध प्रतिमाविश्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या,प्रतिभासंपन्न कवीच्या कवितेवर रचनेवर,काव्यदृष्टी आणि विश्वबोधावर प्रकाश टाकणार हे चरित्रात्मक लेखन लेखिका दमयंती पांढरीपांडे यांनी केले आहे.


   महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, यांच्या विद्यार्थी गुणवत्ते साठी सर्व शिक्षा अभियान उपक्रमा अंतर्गत प्राथमिक शाळांना वाचनालय समृद्धी योजनेतून मिळालेले होते.पडताळणी करताना या पुस्तकावर नजर गेली.आणि मग रसग्रहण करायला सुरुवात केली.


       बालकवींचे जीवनचरित्र,वाड्मयीन जडणघडण, आधुनिक मराठी कविता व बालकवी, बालकवींची कविता व प्रतिमासृष्टी,गद्यविलास,बालकवींचा समकालीन व उत्तर -कालीन कवींवरील परिणाम उपसंहार आणि संदर्भ सूची असे विभाग आहेत.


  खानदेशातील खेडोपाडी बदली निमित्ताने फिरणारे मध्यमवर्गीय कुटुंब.अशा कुटूंबात जन्म घेऊन त्र्यंबक महाराष्ट्राचा लाडका बालकवी झाला.मराठीच्या काव्यसृष्टीत निसर्गाचे सु़ंदर शिल्प कोरुन ठेवले.अगदीबालपणापासूनच ते नदीच्या काठी शांतपणे बसून निसर्गसौंदर्याचा आनंदानुभव घेत होते. काव्यसंवेदनेची क्षमता त्यांना दोस्तांच्या संगती रुजत गेली.बालकवींच्या मनावर त्यांची थोरवी बहीण जीजाचं संस्करण झालेलं होतं.ते नेहमी आपल्या जीजाकडे जात असत.बालवयात रचलेल्या कविता ते पहिल्यांदा बहीण जीजाला वाचून दाखवून कौतुकाची थाप मिळवित असत.बालकवींनी अनेक कविता रचल्या.


बालकवी सतरा वर्षाचे असताना सन १९०७ सालीजळगाव येथे भरलेल्या कविसंमेलनात स्वरचित काव्य वाचनाची संधी मिळाली होती तेंव्हा त्यांनी,'अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्रव्युप्पती'ही कविता सादर करुन वाहवा मिळवली होती.संगमनेरचे कवीवर्य श्री टेंभुर्णीकर कविता लिहावी कशी या उद्देशाने बालकवींसोबत दररोज सायंकाळी बागेत फिरायला जात असत.तेंव्हा बालकवींच्या निसर्गासवे तल्लीन होण्याचे वर्णंन करताना ते म्हणतात,'एखादी भव्य चिंच पाहिली की 'घुबडाचे'गाणे म्हणावे. कधी उंच टेकडीवर उभे राहून सूर्यास्ताकडे पाहात राहावे आणि म्हणावे, हे किरण मी डोळ्यात साठवून घेतो आहे. सूर्य जाईना का गेला तर, उद्या सकाळी तो परत आला की त्याचे सगळे किरण त्याला परत देऊन टाकीन. बालकवींचे शरीर आणि मन एखाद्या टिपकागदा प्रमाणे आस्वाद विषय शोषून घेत असे.असे अनेक वेचक आणि वेधक निवडक वेच्यांचे समीक्षण वाचून त्यांची काव्यसंपदेची महती समजते.निसर्ग कवितांचे बारकावे आणि शब्दप्रचुरतेची माहिती मिळते.ते आधुनिक मराठी कवितेचे जनक होते.कवितेतून नवीन संवेदनशीलता,वैचारिकता आणि अभिव्यक्ती दिसते.


कुणी कुणाला आकाशात 

प्रणयगायन होते गात

हळुच मागुनी आलेकोण 

कुणी कुणा दे चुंबनदान ...


समृध्द प्रतिमाविश्व निर्माण करणारे बालकवी प्रतिभासंपन्न होते.प्रतिभा असल्याशिवाय काव्यरचना निर्माण होतच नाही.काव्याचे सामर्थ्य आणि अलौकिकता निर्माण करण्याचे भान त्यांना होते.काव्यरसिकांना हे समीकरण म्हणचे अस्सल वाचनाची मेजवानीच आहे.


@श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड