पुस्तक परिचय क्रमांक-६२ सभेत कसे बोलावे
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६२
पुस्तकाचे नांव--सभेत कसे बोलावे
लेखकाचे नांव--श्याम भुर्के
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०१०/ पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-७४
वाङमय प्रकार ( कथा,कादंबरी,ललित ई. )
-ललित
मूल्य--६०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
एका कार्यक्रमात तुम्हाला प्रमुख व्याख्याते म्हणून बोलावले आहे.कार्यक्रम सुरू होण्याची सूत्रसंचालक सूचना करत आहे.आपण व्यासपीठावर विराजमान झालेला आहात.
तदनंतर संयोजन समितीतील मान्यवर आपला परिचय करून श्रोत्यांना करून देतायत. स्वागत म्हणून आपणास अध्यक्षांच्या हस्ते फुलांचा गुच्छ अर्पण केला आहे.तो घेताना आपल्या सुहास्यवदनाची प्रतिमा क्षणार्धात छायाचित्रकाराने टिपली.त्याचवेळी क्षणभर पडलेल्या प्रकाशझोताने तुम्ही सेलिब्रिटी झाला आहात.रसिकजण टाळ्यांनी स्वागत करतायत.
तद्नंतर ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते श्रीमान आदरणीय …….
आपणास मार्गदर्शन करतील असे सूत्रसंचालकाने निवेदन केल्यावर तुम्ही आत्मविश्वासपूर्वक माईकसमोर उभे राहिलेले आहात खणखणीत आवाजात सुरुवात करून श्रोत्यांना काबीज केले आहे.आणि आपल्या विचारांनी श्रोते प्रभावित होतायत.समर्पक उदाहरणांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तुम्हालाही प्रोत्साहन मिळत आहे. मग आपलं व्याख्यान संपताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतोय.असे हे वर्णन किती सुखद आहे!किती कल्पना किती आनंददायी! परंतु ही कल्पना म्हणजे कल्पनातले मनोरे नव्हेत. स्वप्न नव्हे.भाषणाची भीती वाटणे अगदी साहजिक आहे. पण ही भीती कमी करायला लावणारे "सभेत कसे बोलावे" हे शिकवणारे पुस्तकआहे. केवळ शब्दप्रपंच नसून वाणीवर प्रभुत्व असणारे प्रसिद्ध लेखक श्याम भुर्के यांनी स्वानुभवातून दाखवलेला हा भाषणाचा सुलभमार्ग आहे.
व्याख्याते श्याम भुर्के यांनी साताऱ्यात नामवंत प्रतिभासंपन्न ऋषितुल्य साहित्यिक आचार्य अत्रे, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि क्रांतिसिंह नाना पाटील आदी वक्त्यांची भाषणं श्रवण केल्याने त्यांच्या मनात'आपणही वक्ता व्हावं'अशी सुप्त इच्छा निर्माण झाली.सरावात सातत्य ठेवत ते नामवंत व्याख्याते म्हणून प्रसिद्ध पावले.त्यांनी बॅंकेतील नोकरी सांभाळत हजारो व्याख्याने विविध विषयांवर दिलेली आहेत.सभेत कसे बोलावे याच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत.
प्रत्येकाच्यात वक्ता होण्याची क्षमता असते.आपण हे पुस्तक मनापासून वाचले तर आपणही वक्ता होऊ शकाल याची लेखक खात्री देतात.'सभेत कसे बोलावे' या विषया इतकेच 'सभेत कसे बोलू नये'हे फार महत्त्वाचे आहे.त्यातील बारकावे सुक्ष्मपणे मांडले आहेत.पारावर, चावडीवर आणि मित्रांच्या बैठकीत आपण गप्पा झोडत असतो.पण स्टेजवर सर्वांपुढे बोलायचं झालं तर आपणाला भिती वाटते,शब्दांना कंप येतो.पाय लटपटायला लागतात.त्यातच पहिल्यांदाच सुरुवात केली तर टेबलावर ठेवलेल्या वस्तुंशी चाळा करत कसेतरी आपण बोलायचा प्रयत्न करत असतो.काही शब्द पुन्हा पुन्हा बोलतो.आपले भाषण कधी संपतेय असं वाटतं राहते.
'जो थोडक्यात पण महत्त्वाचे सांगतो तोच खरा वक्ता होय.' या अनुकरणीय पुस्तकात १४लेख आपणाला सभेत बोलण्याचे सोपान आहेत.तुम्ही वक्ते होणार,भाषणापुर्वी,
आता व्याख्यानाला निघायचं हं,व्यासपीठाचा भूगोल, आकर्षक सुरुवात,साऱ्यांचे डोळे तुमच्याकडे,आवाज, विचार,अडचण,रेंगाळणं, समारोप ,वाचलेले भाषण शुभस्य शीघ्रम आदी लेखांतून काय करावे याचे विवेचन सहज सुंदर सोप्या शब्दात केले आहे.विशेषत: प्रसिद्ध नामवंत व्याख्यांत्यांचे भाषणाच्या अनुषंगाने मत, विचार आणि आवाज यांचे सोदाहरण पटवून दिलेले आहे.नामवंत व्याख्यात्यांच्या सभेतील भाषणातील मास्टर पीस,श्रोत्यांना आपलसं करण्यासाठी केलेल्या शब्दपेरणीची माहिती समजते.
तुम्ही वक्ते होणार या लेखात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते.विद्यार्थांनी मजा म्हणून व्याख्यानउधळावयाचे ठरविलेले असते. प्राचार्य म्हणजे शब्दांचे जादूगार सरस्वतीच्या प्रांगणातील शारदेचे पुजारी.सुरुवातील पहिलेच वाक्य उच्चारले,''साहित्य सोनीयाच्या खाणीतला मी एक मजूर. तुम्हा तांत्रिक आणि यांत्रिक विद्यार्थ्यांपुढे हा शब्दांचा मांत्रिक काय बोलणार?''सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सारे विद्यार्थी एकदम रसिक श्रोते झाले.आपली प्रबळ इच्छा हीच व्याख्यानाची पहिली पायरी आहे.त्याही वयात व्याख्यानाची सुरुवात करता येते.'Better late than never' भाषण ही कला आणि शास्त्र आहे.माहिती घेऊन सराव केला की तुम्ही समाधीटपणे सभेत बोलाल.पहिल्यांदा सुरुवातीला अडखळत घाबरतच शब्द नफुटता भाषण करताना अनेकांचे हसं झालेले असतानाही ते पुढे प्रसिध्द व्याख्याते म्हणून नावारूपाला आले आहेत.
प्रसिद्ध सिनेनट चार्ली चाप्लीन याचे रेडिओ वर व्याख्यान होते ते द्यायला जाताना चार्ली चाप्लीन इतका घाबरला होता की तो म्हणाला,'प्रचंड वादळ सुटलं असताना अटलांटिक सागरातून जाताना जसा भीतीचा पोटात गोळा उठतो, त्यापेक्षाही जास्त भयाने व्याख्यानास जाताना मी पछाडलो होतो.' पण हेच चार्ली चाप्लीन पुढे लोकांना निर्भयतेने सामोरे जाऊ शकले.
भाषणापूर्वी या लेखात मनात विषयाची तयारी करणे. संबंधित विषयाचे साहित्य वाचन करणे.टिपणं काढणं, मनन करणे,आखणी करणे, विचारांची जुळवाजुळव करून योजनाबध्द आराखडा तयार करायचा.विषय प्रतिपादनात सद्यस्थिती तद्नंतर नेमकं काय करायचं?अशा स्थुल स्वरुपात आराखडा तयार करावा.
भाषणाची तळमळ हवी,विषय ज्ञान असावे.काय आणि किती बोलावे हे महत्त्वाचे आहे.श्रोते पाहून बोलण्याची भाषा सहज सोपी असावी.आता व्याख्यानाला निघायचं हं या लेखात तुमचे अस्तित्व हेच व्यक्तिमत्त्व असल्याने साजेसा पेहराव असावा.नियोजित वेळेपूर्वी पोहचावे.मुद्दयांचे टिपण आणि परिचयाचा कागद सोबत घ्यावा.
सकारात्मकतेने संयोजकांशी हितगुज करावे.आणखी महत्त्वाच्या टीप्स तपशीलवार दिलेल्या आहेत.सुरुवातीला श्रोत्यांना काबीज करण्यासाठी सुरूवात लहानशा कथेने,
म्हणीने,प्रश्नार्थक वाटल्याने अथवा काव्याने करावी म्हणजे 'पुढे काय'याची उत्सुकता जागृत राहील.कथा अथवा विनोद हजारोंच्या पुढे सांगितल्यावर खुलतो.तेव्हा सुरुवातीलाच श्रोत्यांना खळखळून हसायला मिळाले की मग सारं ऐकण्याच्या मनस्थितीत श्रोते राहतात.
रसिक श्रोत्यांचे लक्ष तुमच्याकडे असल्याने तुमच्या बारीकसारीक हालचाली प्रेक्षकांच्या नजरेत भरतात. बोलताना उभे कसं राहावे.व्यासपीठावरील टेबलावर ठेवलेल्या वस्तुंशी खेळत बसू नये.माईक टेबल बुके इत्यांदींना बोलताना स्पर्श करु नये.दृश्य आणि श्राव्य दोन्ही एकत्र वक्तृत्वामध्ये असते.आवाज, शब्दफेक, शब्दोच्चार, निरर्थक शब्दांची पुनरावृत्ती टाळणे.(उदा.या ठिकाणी, तर, तेव्हा,हे पहा असे शब्द)कारण हे शब्द ग्रामोफोन वरील चांगल्या रेकॉर्डमध्ये खरखर आल्या- सारखे वाटतात.जसे सुग्रास भोजनात एखादा खडा लागला की लज्जत कमी होते.तसेच भाषणाचंही होत असतं.प्रेक्षकांचे अवधान टिकवायला अधूनमधून समर्पक विनोदी चुटके ही पेश करावेत.त्यामुळं वातावरण हलकं फुलकं होतं.
WATCH म्हणजे Wordsशब्द Action विचारThoughts कृतीCharacter आचार आणि Habitsसवयी.चांगल्या सवयी साठी हे महत्त्वाचे आहे.समारोपापुर्वी विषयाचा सारांश संक्षेपाने प्रस्तुत करावा.समारोप एखाद्या उत्साहवर्धक संदेशात्मक काव्य पंक्तीने अथवा नामावंतांच्या कथेने करावा.
कलेची आराधना केली की ती आत्मसात होते.अशा अनेक टिप्स आणि किस्से पानोपानी आपल्याला वाचायला मिळतात.या पुस्तकाचे रसग्रहण केल्यावर आपणही सभेत वक्ते म्हणून आत्मविश्वासाने उभे आहात.विषयाचे विवेचन करत आहात.सुरुवात दमदारपणे केलीय.प्रेक्षक टाळया वाजवून दाद देतायत.
मस्तच खुसखुशीत विनोदावर हास्याची कारंजी उडताहेत. तुमच्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडतोय प्रभावी लयबद्ध कवितेने आपण समारोप करुन टाळ्यांचा कडकडाट होतोय.काहीजण भाषण चांगले झाल्याचे आवर्जून भेट घेऊन सांगतायत.दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात तुमचा फोटो व व्याख्यानाचे कव्हरेज छापून आलेय ते तुम्ही आनंदाने वाचीत आहात.हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपणाला 'सभेत कसे बोलावे' याचा कानमंत्र मिळेल..
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
Comments
Post a Comment