पुस्तक परिचय-५४चिंतन एक जीवन वेध भाग-१
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-५४
पुस्तकाचे नांव--चिंतन एक जीवनवेध भाग-१
लेखकाचे नांव--श्री राजेंद्र बोबडे
प्रकाशक-ग्राममित्र प्रकाशन,नांदलापूर कराड
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- आॅगस्ट २०२१/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-२४८
वाङमय प्रकार--ललित
मूल्य--२५०₹
-----------------------------------------------
शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे जलतरणपटू सतिश कदम,लिहितं करायला प्रेरणादेणारे मित्रवर्य व प्रस्तावक पत्रकार सुनील शेडगे सर,आदर्श शिक्षिका सौ वैशालीताई शेडगे,३५वर्ष पत्रमैत्री जोपासणारे श्री महादेव भोकरे सर आणि मार्गदर्शक गुरुवर्य दीपक भुजबळ या स्नेहीजणांच्या शुभ हस्ते.बोबडे कुटूंबिय व नातेवाईकांच्या संगतीने, इष्टमित्रांच्या उपस्थितीत,प्रकाशन समारंभ साजरा होत असताना वरुणराजानेशब्दथेंबांच्या तालासुरात शुभेच्छांची वृष्टी केली.
आमचे शिक्षक मित्रवर्य,लेखक नवचिंतनकार, तत्त्वज्ञ सन्माननिय राजेंद्र बोबडे यांच्याच अभिष्टचिंतन दिनी छोटेखानी समारंभात लेखक,कवी आणि रसिक वाचक मित्रांच्या मांदियाळीत 'चिंतन एक जीवनवेध 'भाग-१ आणि विचारवेध या दोन चिंतन शिल्पांचा रसिक लोकार्पण सोहळा संपन्न झाला.रसिक वाचकांना दररोज सोशल मिडीयातील अनेक समुहावर प्रसिद्ध होणारी चिंतन लेखमाला एकत्र आवृत्तीत मिळतोय.खरंच हा सोहळा अत्यंत अभिनंदनीय, गौरवास्पद आणि कौतुकास्पद झाला.आज आमचा मित्र साहित्यिकांच्या नामावलीत विराजमान झाल्याचा अभिमान वाटला.
माझ्या जीवनातील दुग्धशर्करा योग म्हणजे ,दुसऱ्याच दिवशी १२ सप्टेंबरला माझा वाढदिवस.माझे प्रेरक स्नेहीजन अध्यापक विद्यालयातील वर्गमित्र श्रीमान दीपक भुजबळ (बापू) यांनी माझ्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन लेखक श्री राजेन्द्र बोबडे लिखित ''चिंतन एक जीवनवेध भाग-१"हा ग्रंथ भेट देऊन केले. फारच मनस्वी आनंद झाला.समवेत कराडचे शिक्षकस्नेही गणेश जाधव होते.
सरांची आणि माझी मैत्री लॉकडाऊनच्या काळात उपक्रमशील शिक्षक आणि छांदिष्ठ्य समुहात लेखन व्यक्ततेने जुळली.भटकंतीच्या लेखनशैलीचे ते नेहमी सोशल मिडियावर कौतुक करायचे.लेखनाला ऊर्मी मिळेल अशी प्रतिक्रिया द्यायचे.प्रत्यक्ष त्यांची गळाभेट प्रथमतः पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच झाली.
'चिंतन एक जीवन वेध भाग-१'या पुस्तकाला 'विचारयात्रेचे प्रवासी'या शिर्षकाने दैनिक सकाळचे व्यासंगी पत्रकार सुनील शेडगे यांची लाभली आहे. सामाजिकभान जपणाऱ्या शिक्षकमित्रांना प्रकाशित करण्याचे अलौकिक कार्य शेडगे सर करत असतात. प्रस्तावना पुस्तकाच्या अंतरंगाची ओळख करून देते.हे चिंतन म्हणजे विचारांची शिदोरी आहे.
ते पुस्तकाचे कौतुक करताना म्हणतात की, 'स्वता:अनुभवलेले अनुभवविश्र्व वाचकांना भावेल रुचेल पटेल अशा भाषेत शब्दातीत केले आहे. यात सलगता आणि सातत्य ठेवत लेखन केले आहे.चांगल्या विचारांच्या संगतीने माणसाचे आयुष्य घडते. पुस्तकातले शब्द अन् त्याचे वास्तवातले अर्थ याचा उलगडा त्यांना होत राहिला.'
या चिंतन ग्रंथाचे लेखक प्राथमिक शिक्षक असून त्यांना लेखन, वाचन, मॅरेथॉन आणि फोटोग्राफीचा छंद असून यापुर्वी दैनिकात प्रासंगिक लेखन केले आहे.'चार शब्दां'च्या मनोगतात त्यांनी आयुष्याचाया जीवनपट संक्षेपाने प्रस्तुत केलाय.ते वर्णनही मनाला भावते.लेखक राजेंद्र बोबडे यांनी यातील विचार मांडलेत रोखठोक कारण ते जगतायत रोखठोक.आणि हीच त्यांची खरी दौलत आहे!
संंघर्षमय प्रवासातून समाजामध्ये आदर्शवत झालेल्या व्यक्तींचा नामोल्लेख करून त्यांच्या श्रेष्ठत्वाची सोदाहरणाने ओळख पटवून देतात.ज्यांच्या सहवासात घडत गेले.पितासमान वरिष्ठ मुख्याध्यापक श्री लक्ष्मण खाशाबा शेडगे गुरुजी(तात्या) यांचे पुस्तक लेखनाचे स्वप्न आज साकार झाले.हे पुस्तक म्हणजे तात्यांना 'गुरुदक्षिणा' दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
सन २०२०सालातील दि.१ फेब्रुवारी ते ९ मे
अशा सलग 'हंड्रेड डेज'एक शून्य शून्य शतकी लेखांचा समावेश या पुस्तकात केला आहे.आपल्या संभाषणातील आणि अवतीभोवती असणाऱ्या शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे.मानवी मनाचे स्पंदन जीवनवेधाच्या चिंतनातून होत आहे.अनिष्ट विकृतीच्या प्रवृत्तीला मूठमाती देऊन, सात्त्विक विचारांची स्विकृती करून सामाजिक संस्कृतीचे तत्वज्ञान त्यांच्या शब्दरुपी चिंतनातून उलगडत जाते.
रमणीय, शांत पहाटेच्या वेळी ते मनन-चिंतन करुन,मनाच्या गाभाऱ्यातून प्रकटलेल्या शब्दांचे सामर्थ्य सहज सुंदर ओघवत्या भाषा शैलीत गुंफून सोशल मिडियावर शेअर करीत होते.कित्येकांच्या दिवसांची सुरुवात त्यांच्या अमृतरुपी शब्दसिंचनाच्या चिंतनाचे वाचन करून करत होते.तर काहीजणांची वाचण्यात अधीरता होती.अनेक जण त्यांच्या चिंतन लेखमालेचे फेसबुक,व्हाटसअप ग्रुपवर रसिक वाचक चाहते झाले आहेत. ई-मिडीयावरील 'रयतेचे कैवारी'या पीडीएफ दैनिकातही दररोज त्यांचा लेख प्रसिद्ध होत होता.नेहमी आपल्या संभाषणात असणाऱ्या अनेक शब्दांचा मौलिक भावार्थ, रुढार्थ आणि उपयोगिता त्यांच्या विचारांतून समजते.एकेक लेख म्हणजे विचारांचे बलस्थान आहे.
लेखातील शब्दांचे विवेचन करताना त्यातील बारकावे सुक्ष्मपणे ओळखून त्यांची समर्पक शब्दांत उकल केली आहे.त्यामध्ये आशय पटण्यासाठी एखादा वेचा, काव्य, उदाहरणे,दाखले,गोष्ट,कथा किंवा चारोळी यांची पखरण करीत.दोन्हीबाजूंची पडताळणी करुन समारोपातून विचाराला चालना देणारा संदेश अधोरेखित करतात. प्रभातसमयी अनेक रसिक वाचकांची बौद्धिक मशागत त्यांच्या चिंतन विचारधारेतून होत होती.कित्येत शब्दांना नवेकोंदण देऊन आशयगर्भता प्रस्तुत केली आहे.विचार नावाचा वृक्ष भावभावनांनी बहरलेला असून चिंतनरुपी फळांचा अवीट गोडवा विचारपीठावर 'जीवनदीप'बनून मंगल विचार प्रेरित करीत राहतो.
प्रारंभ 'दिवा' लेखाने तेजस्वी दिव्यता जपत प्रणाम करून सात्त्विक मनाने मंदिराच्या कळसाचा वेध घेतला आहे.
निसर्गातील डोंगर-दऱ्या धुंडाळत अबोल घटकांना बोलतं करण्याचं धाडस करत खेड्यांचा ठेवा जतन करण्याचा संदेश दिला आहे.मनाला प्रसन्न करुन देवदूतासारखे मुलांच्या भावविश्वाची व बालपणाची ओळख मोठ्या विश्वासाने करून, सुखाच्या धाग्यात ऋणानुबंधाने नाती गुंफली आहेत. लेखकाचा दृष्टीकोन रोखठोक असूनही
सामान्य माणसाच्या दृष्टितून सृष्टीतील शब्दांचे चिंतन लेखमालिकेत आहे..
चिंतन लेखमालेचा पुस्तक आवृत्तीचा प्रवास सुरू मातोश्रींचे वृद्धापकाळाने देहावसान झाले.
मातृप्रेमाच्या स्मृति चिरंतन रहाव्यात म्हणून मातृप्रेमाचे मंगल स्त्रोत्र(रचना)आणि छायाचित्रे मलपृष्ठावर रेखाटले आहे.अनेक वाचक मित्रांनी यथार्थ व समर्पक शब्दांत दिलेले शुभसंदेश दिलेले वाचनीय आहेत. पुस्तक वाचताना नकळतपणे आपले आत्मपरिक्षण होते.अप्रतिम शब्द साजात चिंतनशिल्प सजले आहे.याचा प्रत्यय वाचताना लक्षात येतो... आपल्या लेखन कार्यास सलाम! अन् लिहिते राहण्यासाठी शुभेच्छा!
या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा निधी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून,समाजातील दिव्यांग गोरगरीब,अनाथ मुलांसाठी, वयोवृद्ध महिलांच्या कल्याणासाठी, अकाली वैधव्य आलेल्या महिलांसाठी ते उपयोगात आणणारआहेत.याची टॅगलाईन त्यांनी मलपृष्ठाच्या शेवटी ठळक केली आहे.
✒️📖 परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दि.२४ सप्टेंबर २०२१
पुस्तकांसाठी संपर्क:-
चिंतन एक जीवनवेध भाग-१हे पुस्तक "गणेश लेडीज फॅशन, २५४ भवानी पेठ सातारा (मोमीन मार्केट शेजारी)" सौ.संजना साळुंखे यांच्या कडे उपलब्ध होईल.पुस्तकाची मूळ किंमत २५०/- रूपये आहे. सवलतीच्या दरात २१०/- रुपयांना उपलब्ध होईल.पुस्तक परगावी पाठवायचे असेल तर पोस्टेज खर्चासह २५०/- रूपये होतील..!
१) सौ. संजना साळुंखे
संचालक श्री गणेश लेडीज फॅशन, २५४ भवानी पेठ,सातारा- ४१५००२.
गुगलपे 7020138964
२) कु. प्राधी राजेंद्र बोबडे, सातारा.
गुगलपे- 8265011609*
३)लेखक श्री. राजेंद्र बोबडे, सातारा.*
9822916788
Comments
Post a Comment