पुस्तक परिचय क्रमांक-५९ क्रांती




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-५९

 पुस्तकाचे नांव--क्रांती

 लेखकाचे नांव-- साने गुरुजी

प्रकाशक-रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०११ 

एकूण पृष्ठ संख्या-२७२

वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई.)--

कथा स्वरुपात कादंबरी

मूल्य--२७०₹

-----------------------------------------------

महाराष्ट्राचे समाजशिक्षक 'श्यामची आई'

सुप्रसिध्द संस्कार ग्रंथाचे संवेदनशील मनाचे लेखक आदरणीय साने गुरुजी यांची विपुल ग्रंथसंपदा असून ती अनमोल आहे.अध्यापन,समाजसेवा,स्वातंत्र्ययुध्द अशा चौफेर क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसावर उमटवणारे आदर्श आणि अनुकरणप्रिय व्यक्तिमत्त्व 'साने गुरुजी' 


मातृभूमीच्या सेवेसाठी अध्यापकाच्या सेवेचा त्याग करुन स्वातंत्र्याच्या स्मरणात समर्पण केले.अखेरपर्यत समाजाच्या हितासाठी लढा देत राहिले.समाजातील अस्पृश्यता, जातीभेद, भेदभाव नष्ट व्हावा.शेतकरी व कामकरी वर्गाचे 

दारिद्रय दूर व्हावे.सर्वत्र समाजवाद असावा.यासाठी ते जनजागृती करत राहिले.


लहान मुले,स्त्रिया,तरुण,दीन-दलित यांना स्वत्त्वाची  जाणीव व्हावी या उदात्त हेतूने व उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम साहित्य संपदा निर्माण केली.अत्यंत सोप्या भाषेतील कथा,गोष्टी आणि लेख आदी साहित्य प्रकाशित करुन महाराष्ट्रातील घराघरांतून गुरुजींच्या विचारांचे पारायण व्हावे यासाठी 'क्रांती' या कथा वजा कादंबरीची साहित्यकृती निर्माण झाली आहे.


   आदरणीय साने गुरुजींनी कारागृहात असतानाच विपुल लेखन केले आहे.तोच साहित्यरुपातील अनमोल संस्कारक्षम विचारांचा ठेवा आहे.त्यातील विशेषतः श्यामची आई, धडपडणारी मुले,पत्रीतील काही कविता आणि पुनर्जन्म हे त्या वेळचेच लेखन आहे.सन१९३३ साली नाशिक कारागृहात असताना दीनबंधू बांबू म्हणून एक बृहत् कथा गुरुजींनी लिहिली होती.त्याच'दिनबंधूत' बदल करून 'क्रांती'कथा साकारली आहे.ते म्हणतात,'मराठी भाषेच्या वाग्देवतेसमोर महान पूजक मोलाची पूजा बांधतील,परंतु मी आणणार साधी पत्री.थोर कलावान महान आलाप घेतील.

परंतु माझी साधी चिवचिव.तानसेन अमर छान घेतो.पण चिमण्याही आपापल्या किलबिलीत रंगलेल्या असतातच की..'क्रांती ही कादंबरी कथेच्या रुपातील  स्वातंत्र्य समरातील अहिंसा, स्वदेशी खादी,संस्कार आणि मूल्यपरिवर्तन यावर आधारित आहे. 


 या अक्षरशिल्पात २९ कथांमधून कादंबरीचा प्रवास घडत राहतो.कोठे गेले ते बाबा?दत्तक विधान, मुकुंदराव, दिवाळी, प्रयाण,विश्वभारती,मुकुंदरावांची तीर्थयात्रा,शांता तू शीक, प्रद्योत, येईल,एक दिवस येईल,मोहनाशक मोहन,रडू नका उठा,स्वातंत्र्य-दिन, महापूर,घरची तार,पित्याची इच्छा पूर्ण केली, दीनबंधू,शांतेचा संसार,माया, विद्यार्थी-संघ,अमर दिवस,रामदासला अटक,अमर रात्र,तू माझा भाऊ हो, कामगारांचा संप, सुटका, हिंसा-अहिंसा,चिर-मिलन आणि भविष्यवाणी आदी शिर्षक कथा आहेत.


कोठे गेले ते बाबा या कथेत श्रीमंत कन्या मिनी आणि तिचे पिराजी श्रीनिवासराव यांची भावस्पर्शी कथा आहे.मिनीची आई लहानपणीच निर्वतलेली असते. त्यामुळे अनेकजण दुसरं लग्न करा म्हणून गळ घालत असतात पणे ते ठामपणे नकार देतात.मिनी त्यांची लाडकी असते.एकदा पहाटे ती गाडी चालवत असताना सगळीकडे धुकं पसरलं होतं.गाडी थांबवून ती धुक्यात न्हायला बाहेर उतरली.आणि आनंदाने बागडू लागली. धावताना तिच्या पायाला काहीतरी लागल्याने ती अडखळून पडली.तिला वाटले एखादा दगड असेल.


पण तिला माणसाच्या पायाचा स्पर्श होतो.एक माणूस रस्त्यावर पडलेला होता.त्याचा शरीरावरील वैराग्याची वस्त्रे धुक्यातही दिसत होती.थंडगार शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करु लागली.वडिलांच्या साथीने त्याला गाडीत घालून घरी आणले.त्याची सेवासुश्रूषा केली. त्याला खादीची वस्त्रे दिली.तो बरा झाला.एक दिवस तो जाऊ लागला.दोघांनीही विनवणी केली.पण तो म्हणाला,'मी व्रतबध्द आहे.'अन् तो निघून गेला.पण जाताना मिनीची शाल घेऊन जातो.अशी भावस्पर्शी कथा वाचताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.इतकी अमोघ ताकद गुरुजींच्या लेखणीत आहे.


येथून पुढे दत्तविधानापासून 'क्रांतीची' गोष्ट घडत जाते.खानदानी सरदार गोविंदराव चव्हाणांना औरस संतती नसल्याने खेड्यात राहणारे नातलग रामराव यांच्या रामदास व शांता ही दोन्ही मुले त्यांच्याकडे शिकण्यासाठी राहतात.सुट्टीला आपल्या गावी जात.तदनंतर गोविंदराव रामदासला दत्तक घेतात.तो भरजरी पोषाखात सजतो तर शांता साधीच राहते.दत्तक विधीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्या कानावर "हृदय जणु कोणा नसे,बंधू उपाशी लाखो भरती,सुचति विलास कसे?

हाहा:कार ध्वनि शत उठति,येथे उडत जलसे….. 


हे सूर पडल्याने तो धीरगंभीर होतो.त्याला वाचा गेल्यासारखी वाटते.गाणे म्हणणाऱ्या मुलाला सगळे हाकलून लावा म्हणून गलका करतात.त्यावेळी शांता म्हणते तो भिकारी नाही, सोनखेडीच्या आश्रमातील दयाराम त्याचा मित्र आहे.पण कोणीच ऐकत नाही.इकडे तर त्याच्या शरीराची लाहीलाही होते.गोविंदराव मग त्याला हाकललेल्या नोकरांना शोधून आणायला लावतात.मग दयाराम, रामदास आणि शांता ही भारतमातेची तीन माणके गप्पा मारत बसतात.देशदेवाला त्यांनी आज मला दान दिले आहे..गरीबांचे जीवन सुखी व सुंदर करण्यासाठी आपलं जीवन त्यागू असं रामदास म्हणतो.


मुकुंदराव ,शांता,मोहन आणि रामदास देशसेवा करताना घडलेल्या घटनांचा परामर्श आणि वैचारिक दृष्टिकोन आपणाला दिसून येतो.कष्टकरी शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात सुखशांती आणण्यासाठी केलेल्या भगिरथ कार्याचा आलेख भावभावनांतून गुरुजी व्यक्त झाले आहेत.क्रांती म्हणजे बदल, रक्तपात न करता काबाडकष्ट करणाऱ्यांना सुखी करणं.श्रमाची पूजा करणं.अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणं.


बंगालच्या वंगभूमीचे वर्णन वाचताना विश्वभारतीत संचार घडतो.व्यक्तिंचे चित्रण सुंदर शब्दात केलेले आहे.एका वेगळ्या धाटणीची ही कथास्वरुपात कादंबरी आहे.

गोरगरिबांसाठी समाजभान जपून मानवतेची सेवा रामदास शांता मोहन आणि मुकुंदराव कशी करतात याची कहाणी म्हणजे क्रांती….


@ श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

दिनांक ७सप्टेंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड