पुस्तक परिचय क्रमांक-७१ समिधा
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-७१
पुस्तकाचे नांव-समिधा
लेखिकेचे नांव--साधना आमटे
लेखांकन-सीताकांत प्रभू
प्रकाशक-पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२०/
तिसरे पुनर्मुद्रण आवृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१९७
वाङमय प्रकार---आत्मकथा
मूल्य--३००₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
७१||पुस्तक परिचय
समिधा
साधना आमटे
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या परिवाराची कल्पकतेची,महान कर्तृत्वाची आणि सामाजिक विकासाची निशाणी सर्वांना परिचित आहे. परंतु गागाभट्टांच्या घुलेशास्त्री कुटुंबातील इंदू ही इनामदारी आणि वकिली सोडून संन्याशी बनलेल्या जटाधारी मुरलीधराच्या नजरेस पडली नसती तर…….
एखाद्या परीकथेच्या शोभणाऱ्या या प्रेमकहाणीतून बाबा आमटे आणि साधनाताई यांचा संसार सुरू झाला. निरनिराळ्या अर्थांनी या दोघांचीही पूर्वपीठिका सरंजामशाही वातावरणातील होती. परंतु त्यांनी मार्ग ठरविला तो समाजसेवेचा, आधुनिकतेचा. त्यांच्या अखंड चाललेल्या मधूमिलातून अनेक स्वप्ने साकार झाली.बाबांची कल्पकता आणि कर्तृत्व आणि ताईंची तद्रूपता, सहृदयता आणि सातत्य आपण अनेक प्रकल्प सिद्ध झाले. आणि मुख्य म्हणजे हजारो माणसं त्यांनी घडविली.त्यांच्या जीवनात नवचैतन्य प्रकाशित केले. कोसो दूर असणाऱ्या समाजाने बहिष्कृत केलेल्या माणसांची सेवासुश्रुषा करून जगण्याची उमेद निर्माण केली.तसेच आदिवाशींच्या जीवनात आरोग्य आणि शिक्षणाचं बीजांकुरण केले.
पाहिलं तर ही एक साहसकथा.परंतु साधनाताईंच्या नर्मविनोदी पारदर्शी शैलीतून त्याला एका अनोख्या प्रेमकहाणीचे मोहक रूप प्राप्त झाले आहे.ही चमत्काराची गाथाच आहे. पण त्याचबरोबर ही शक्ती ईश्वरी कृपेपेक्षा माणसाच्या मनातील प्रेमभावनेतून निर्माण होते याचा साक्षात पुरावा या आत्मकथनातून प्रतीत होतो.
अशी ही 'समिधा'आत्मकथा साधनाताई आमटे यांनी लिहिलेली आहे. आणि शब्दांकन केले आहे सीताकांत प्रभू यांनी.'समिधा' किती यथार्थ आणि सार्थ नांव आत्मकथेला लाभले आहे.जसं की यज्ञात आहुती देण्यासाठी एकेक काडी अर्पण करून यज्ञाचा अग्नि प्रज्वलित होताना त्या समिधेला किती चटके व झळ सोसावी लागते.याची प्रचिती ही कथा वाचताना लक्षात येते.बाबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना आलेल्या संकटांना धीरोदात्तपणे त्यांनी साथ दिली आहे.
साधनाताईंनी ही आत्मकथा काळ्या कातळातून आनंदवन पुरविणाऱ्या निर्मिकांस अर्पण केली आहे.आयुष्यातील सुखदुःखाच्या प्रसंगाचे संस्मरण या जीवनपटात उलगडत जाते.
साधनाताईंना महाराष्ट्र शासनाने 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तर विद्याताई माडगूळकर यांच्या स्मरणार्थ 'गृहिणी सखी सचीव 'पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्यावर मोहर उमटवली आहे.पण त्या,''कामातून मिळणारा सात्त्विक आनंद हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे."असं मानतात.
या आत्मकथनाला ऋषितुल्य साहित्यिक राम शेवाळकर यांची 'हिमालयाची सावली' या शिर्षकाची प्रस्तावना लाभलेली आहे.यामध्ये आमटे परिवारातील साधनाताईंचा संपूर्ण जीवनपट संक्षेपाने प्रस्तुत केला आहे.खरचं अप्रतिम शब्दसाजात सौ. साधनाताईंची ओळख अधोरेखित केली आहे.समर्पक आणि यथार्थ शब्दांत त्यांच्या स्वभावाची आणि गुणवैशिष्ठ्यांची महत्ता पटवून दिली आहे.
दृष्टादृष्टिच्या त्या एका क्षणी आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचा निर्धार गळून पडतो.ताईंच्या मनावरील परंपरेची बंधने निखळून पडतात.तसे त्या दोघां उभयतांमध्ये बऱ्याच बाबतीत अंतर आहे.नंतर वयाचे,रंगरुपाचे, स्वभावाचे व जीवन दृष्टीचेही अंतर परिवर्तनाच्या त्या एका क्षणाने दोघांच्याही नकळत कसे भरून निघाले. ते दोघांनाही कळले नाही.सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य तर सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य म्हटले जाते.
दोघे एकमेकांच्या अशा सौंदर्यावर लुब्ध होतात. त्यांच्या वृत्तीची काव्यात्मकता,भव्य स्वप्ने पाहण्याची वेड व ती कार्यान्वित करण्याचा आत्मविश्वास ताईंना आवडला होता.इंदू घुले आणि मुरली आमटे यांच्या वादळी सहजीवनाची कहाणी अधिकृतपणे 'समिधा'या आत्मकथेच्या रूपाने पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे.
आत्तापर्यंत बाबांच्या विषयी अनेक पुस्तकं देशात-परदेशात लिहिली गेली तरी त्यांचे आहे पण नाही पदी विराजमान करणाऱ्या काव्य कथा कादंबऱ्या समाजासमोर बऱ्याच आल्या पण साधनाताईंनी आपल्या आयुष्यभरातील धगधगत्या व रोमांचक अनुभवांना आपल्या आत्मकथेत अधिकारवाणीने बोलके केलेआहे. बाबांच्या आयुष्यातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखवले आहेत. साधनाताईंना बाबांच्या अलौकिक कार्यासाठी परिणामी आयुष्यभर सर्व वादळांशी,वेगांशी आणि अंगिकृत कार्यात झोकून देण्याशी त्यांचे मन व जीवन तद्रुप झाले.माहेरच्या अनेक बाबी तडकाफडकी सोडाव्या लागल्या.
महालातील घुल्यांच्या वाड्यापासून नर्मदा काठच्या कसरावतपर्यंत बाबांच्या मनोवेगाशी संवाद साधत साधनाताईंचे आयुष्य वाहत गेले.या संघर्षबहुल अकल्पित व नाट्यसमृध्द कालखंडातील थरारक स्मरणचित्रे ताईंनी आपल्या आत्मकथेत रेखाटली आहेत.ती वाचताना आपणही हळवे होतो.त्यांच्या आयुष्यभराच्या जीवनाची विशेष संस्मरणीय माहिती वाचताना आपल्या चित्रांची काहिलीत होते.अशा प्रत्येक जिवावरच्या प्रसंगामध्ये ताईंचे सावित्रीपण पणाला लागले होते.अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय राम शेवाळकर प्रस्तावना मांडतात.
आत्मकथेतील लेखनशैली लक्षवेधक आहे.
अनेक शब्द विचार करायला लावतात." सतीचे वाण घेणाऱ्याने चितेच्या उपक्रमांची त्या बाळगू नये.","चोच देण्याआधी चारा निर्माण करणाऱ्या त्या विश्वनियंत्याच्या या जगात खरोखर कोणीच अनाथ नसते."," कामाने यशाचे टोक गाठलेली प्रशंसक मिळतात." "वादापेक्षा पेक्षा संवादच बरा असतो." यांसारखे सुविचार सुभाषिते बाबांच्या गोत्राची ओळख करून देतात.त्यांनी लिहिलेली दैनंदिनी,वह्या आणि डायऱ्या यांच्या सहाय्याने सीताकांत प्रभू यांना ही आत्मकथा सिध्द करणे शक्य झाले.अनुभव ताईंचे आणि गुंफण प्रभूंची.अनेक प्रकारची फुले व पत्री ताईंच्या बागेतली असून सुईदोरासुध्दा त्यांच्याच संग्रहातील आहे.पण देखण्या 'समिधा' पुष्पमालेचे कसब सीताराम प्रभू यांचे आहे.
साधनाताई मनोगतातही व्यक्त होतानाही त्यांनी संस्मरणे स्पष्टपणे सोदाहरण मांडलेली आहेत.तर शब्दांचे जादूगार सीताराम प्रभू यांनी दोन शब्दात आत्मकथेचे मर्म मांडलेय. बाबा आमटे आणि सौ.साधनाताई हे दोन हिमनग आहेत. अशा व्यक्तिंचे व्यक्तिमत्व जेवढे मला आकलन झाले तेवढे आत्मसात करायचा मी प्रयत्न केला आहे.
मुखपृष्ठावर आपणाला आत्मकथेचे मर्मबंध साधनाताईंच्या हस्ताक्षरातील वेधक संस्मरण नजरवेधते."विस्मृतीच्या अंधारात चालताना मनावरचे मळभ कधीतरी अचानक दूर होते.
काळोखाच्या सावल्यातून दूरवर स्मृतीचे दीपक खुणावू लागतात. पाणावलेल्या पापण्यांच्या कडांशी प्रतारणा करणारे शब्द वैरी होतात.ते सैरावैरा धावतात.त्यांच्या शिस्तबध्द रांगा लागून लागत नाहीत.मन आक्रंदू लागते.क्षणभराने आठवणींचे तरंग विरतात.अन् परत सारे काही स्तब्ध होते.स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलताना जे हाती गवसले ते तुमच्या समोर ठेवित आहे.
जे विस्मृतीच्या गर्तेत गेले.ते प्रभुचे देणेहोते.
त्याचे त्याने सव्याज परत केले."
अप्रतिम शब्दांकनाने आत्मकथा मनाला खिळवून ठेवते.घटनाप्रसंग वाचताना पानोपानी याची प्रचिती येते.आमटे परिवारातील सगळ्यांच्या चरित्रकथा वेगळया ऊंचीवर आहेत.त्याग सेवा समर्पण करुन कार्य कसं करावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही अक्षरशिल्पे आहेत.त्यातील साधनाताई आमटे यांचे चरित्र म्हणजे वास्तवदर्शी चित्रण लिखाणातून केले आहे.जसं आहे तसं….ही मातृशक्तीच्या लेखनशैलीची आत्मीयता वाचक रसिक मनोभावे जपतील. बाबांच्या वादळीजीवनात त्यांना साधनाताईंनी साथ दिली त्याची अद्भुतरम्य कहाणी अाहे.अशा शब्दात प्रा.ग.प्र.प्रधान यांनी या आत्मकथेचा गौरव केला आहे.
निवासी जरी राख माझी उद्या की
पुन्हा त्यातुनी जगण्याचा इरादा ||
कवयित्री संगीता जोशी यांच्या कवितेतील ओळी किती सार्थक आहेत.
माझे माझे सारे जीवनच वादळाला जपायला दिले आहे. असे अचानक माझ्या मिठीत बाबांचे वादळ आले. सारे अंतर सरून क्षणात माझेच वादळ झाले. 'समिधा'वाचल्यानंतर रसिक वाचकांना कळून येईल की मीच वादळ प्याले!
साधनाताई म्हणतात ते अगदी खरं आहे.
एक सर्वांगसुंदर आत्मकथा वाचल्याचं समाधान लाभतं.तसेच महान तपस्वी समाजसेवकांच्या कार्याच्या पडद्याआड असणाऱ्या सहधर्मचारिणीच्या कार्याची महती समजते.
परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १० अॉक्टोंबर २०२१
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
Comments
Post a Comment