पुस्तक परिचय क्रमांक-७० ऐलमा पैलमा शिक्षण देवा




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-७०

 पुस्तकाचे नांव--ऐलमा पैलमा शिक्षण देवा

 लेखिकेचे नांव--लीला पाटील

प्रकाशक-उन्मेष प्रकाशन,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मे २००५/नवीन सुधारित आवृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-१५४

वाङमय प्रकार----ललित 

मूल्य--१००₹


📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

७०||पुस्तक परिचय 

ऐलमा पैलमा शिक्षण देवा

       लीला पाटील

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

कविश्रेष्ठ अनिल यांच्या ओळीच मनात फेर धरतात-

'वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले…

असे गेले कळलेच नाही,हाती फार थोडे आले..

दोन दिवस आराधनेत,दोन प्रतीक्षेत गेले….

अर्धे जीवन प्रयत्नांत,अर्धे विवंचनेत गेले.'

शिक्षणतज्ज्ञ लेखिका लीला पाटील माध्यमिक शिक्षिका म्हणून त्यांचे शैक्षणिक कार्य सर्वांना परिचित आहे.क्रमिक पुस्तकांच्या पल्याडही अनुभूती देणारे विलक्षण विश्र्व आहे.त्याची ओळख करून देणारे.वाचन-लेखन, विचार प्रसरण यास वेगळं रुप प्राप्त करून देण्याचे सायास-प्रयास म्हणजे'ऐलमा पैलमा, शिक्षण देवा'हा कृती युक्तिवाद असणारा अनुभव सिध्द प्रयोगशील ग्रंथ आहे.शिक्षकांना शिकवण्याची नेमकेपणानं वेगळी ओळख निर्माण करुन देणारे विचार पीठ होय.


लेखिका लीला पाटील यांनी बी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी सुगम आणि सोप्या भाषेत दर्जेदार पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका म्हणून शिक्षणक्षेत्रात सुपरिचित आहेत.सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणाविषयीच्या मूलभूत संकल्पना असणारं पुस्तक मी आजवर लिहिलेलं नव्हते.त्या म्हणतात की,' श्रीमती मेधा राजहंसांची भेट घडल्यानंतर, शिक्षणाविषयी लेखमाला लिहिण्याचा विचार मनात घोळताच ,'ऐलमा पैलमा, शिक्षण देवा'हे लेखमालेचे शीर्षक ठरविले.त्याच लेखमालेचे हे पुस्तक आहे.'यातील लेख 'माणूस' साप्ताहिकात प्रकाशित झाले होते.


या पुस्तकातील बावीस लेखात वैचारिक सूत्र दिसून येते. १)शिक्षण आणि शिक्षकपण म्हणजे काय? याविषयीच्या रुढ विचारांत बदल करण्यात असलेलं महत्त्व.२)मुले पालक व शिक्षकांच्यात संवाद व विश्र्वास , ३) मुक्त शिक्षणाची गरज व त्याचा शिक्षणातील आविष्कार. ४)मूल्यशिक्षण हेच खरे शिक्षण असे चार प्रमुख सुरांवर ही लेखमाला आहे.


सृजनशील चिकित्सक संशोधक आणि साहित्यिक आदरणीय अनिल अवचट यांची प्रस्तावना या वैचारिक अक्षरशिल्पास लाभली आहे.ते लेखिका लीलाताईंचं कौतुक करताना  म्हणतात की,'हे पुस्तक वाचताना आपल्याला आपल्या विचारांशी संवाद साधलेलं माणूस भेटलयं आणि ते आपल्याशी बोलतयं.'


या लेखमालेतून मुलांची बाजू घेऊन त्या समाजाशी भांडत आहेत.आपण पालकांकडून मुलांच्या तक्रारी ऐकत असतो.पण मुलांचे शिक्षक आणि पालकांकडून काय म्हणणे आहे.त्याची बाजू आपण समजून घेत नाही.सृजन विद्यालयातून नेमकं मुलांना काय अपेक्षित आहे.ते देण्याचा त्यांचा स्तुत्य व अनुकरणीय प्रयत्न केला आहे.


या पुस्तकातील सर्वच लेख वैचारिक मंथन करायला उद्युक्त करतात.प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तित्व असतं. बुध्दी,रुची, क्षमता, अभिव्यक्ती आणि मानसिक कल हे सारेच घटक प्रत्येक मूलागणिक बदलतात.मुलांचा स्वभाव व वृत्ती भिन्न असते.मुलांना वळण लावणे म्हणजे काय करणे.याचा परामर्श त्यांनी 'शिक्षणातील H20'या लेखात मांडला आहे.शिक्षणाविषयीच्या प्रश्र्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.


 या पुस्तकातील सर्वात जास्त मला भावलेला लेख 'संवाद'.वयाची सात-आठ वर्षे झालेली मुलं किती पालकांच्या सहवासाला आसुसलेली असतात?आपला आणि मुलांचा आंतरिक संबंध असल्याचं पाहिजे.आव्हानं पेलायला दक्ष असावे लागते.मुलाच्या वयानुसार त्याचं स्वरुप,पोत आणि दर्जा बदलणं गरजेचे आहे.हे लक्षात येते.

माणसामाणसातले आंतरसंबंध सदाबहार राखण्याचा साधा,बिनखर्चिक उपाय म्हणजे संवाद... मुलाच्या मनात सतत प्रवाहित असणारे विचार,भावना,कल्पना,प्रश्न, अभिप्राय आपल्या पर्यंत पोचेल.आपण ते उत्सुकतेने सावधानतेने ऐकतो आहोत.असं मुलाला वाटलं तरच मूल आपल्या पुढे त्याचे मन उघडं करते.अध्ययन-अध्यापन करताना होणाऱ्या संवादाने विद्यार्थ्यांचे अंतरंग शिक्षकापुढे खुली कशी होतील याचा उहापोह केला आहे.समर्पक शब्दांचा आणि चित्रांचा वापर केला आहे.


पुस्तकांच्या अनुषंगाने कितीतरी विचारांचे तरंग मनात उमटले असतात.अनेक रंगीबेरंगी झुमरं मनात पेटलेली असतात.ते विचार त्याला व्यक्त करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे.मुले अनुकरणीय असतात.याची मार्मिक उदाहरणे 'मुलांचे बोलणं'या लेखात स्पष्टीकरण करतात.


शाळेची सवय कशी लागते.यातील स्वैर कविताही वाचनिय आहे.बंदिस्त शिक्षणातही मुक्ततेला अवसर कसा द्यावा याची माहिती सहज सोप्या भाषेत व्यक्त केली आहे. खेळातूनही शिकण्यासारखं बरच काही असतं.शिकताना मजाही वाटते. 'जादूचा रुमाल'या खेळातून काय काय बनवता येईल.अशी सूचना दिल्यावर सहभागी मुलांनी कितीतरी लांबडी यादी केली….चुंबळ, चेंडू, टोपी…..करत करत पन्नासहून अधिक वस्तू तयार होतात.हे मुलांनी सांगितले..म्हणजे आनंदाने मुलं गाणी आणि खेळातून शिकत असतात.फक्त सजगतेने दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करणे आवश्यक आहे.


'शिकवायच्या तऱ्हा'या लेखात विविधअध्यापन तंत्रज्ञांची पध्दतींची माहिती दिली आहे.माहिती देणे.कौशल्याधिष्ठीत उपक्रम राबविणे.कामात गुंतवून ठेवणे.स्वता: करायला लावणे.कार्यक्षम बनविणे.विद्यार्थांचे मन जागं करण्यासाठी शिक्षकांना त्याच्या मनातील ज्योत पुढे सरकण्यासाठी कधी इंधन पुरवावं लागतं तर कधी ज्योत प्रज्वलित करावी लागते.आजचं शिक्षण सचेतन,प्रभावी कालोचित होण्यासाठी मूलगामी विचार करून मुलांना शिकवायला पाहिजेत. यासाठी मुलांना कृतीयुक्त संधी मिळणे गरजेचे आहे.मुलांचा सर्वांगीण गुणवत्ता विकासाला पोषकता कशी असावी याचा कानमंत्र घेण्यासाठी या पुस्तकाचे  रसग्रहण करणं उपयोगी पडेल.


परिचयक-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


लेखन दिनांक ७आॅक्टोंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड