पुस्तक परिचय-६६प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स..
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६६
पुस्तकाचे नांव--प्रेरणा
द साउंड ऑफ सायलेन्स...
लेखिकेचे नांव--डॉक्टर उज्ज्वला सहाणे
प्रकाशक-प्रेरणा कम्युनिकेशन ,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल २०२०/तृतियावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-२४०
वाङमय प्रकार -आत्मचरित्र
मूल्य--३५०₹
-------------------------------------------------------------------
६६|| पुस्तक परिचय
प्रेरणा -द साऊंड ऑफ सायलेन्स..
लेखिका-डॉक्टर उज्ज्वला सहाणे
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
डॉक्टर सौ.उज्ज्वला व श्री केशव सहाणे या शिक्षक दांम्पत्याच्या आयुष्यातील चढउतारांचा अनुभव घेताना लढायला हसायला जगायला शिकायला प्रेरणा देणाऱ्या ' प्रेरणा'कन्येची ही अभिमानाची कथा आहे.तर तिचं आयुष्य घडविताना तिच्या आई-वडिलांनी केलेल्या संघर्षाची जीवन गाथा म्हणजे 'प्रेरणा' द साउंड ऑफ सायलेन्स...कर्णबधिर असूनही भरतनाट्यम् नृत्यांगना होणाऱ्या प्रेरणा सहाणे-दिक्षीत हिची संवेदनशील आत्मचरित्रात्मक कहाणी आहे....
डॉक्टर उज्ज्वला सहाणे यांनी लेखणीतून साकारलेली स्वकथा आहे.या पुस्तकास सन २०१५ सालातील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार व लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.तर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने विकलांगजन श्रेणीतील सबलीकरणाचा"रोल मॉडेल" म्हणून प्रेरणा केशव सहाणे हिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
तसेच 'प्रेरणा'या आत्मचरित्रात्मक पुस्तकास इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराने उत्कृष्ट लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार प्रदान करुन या पुस्तकावर यशस्वीतेची मोहर उठविली आहे.आपले दिव्यांग मूल घडविताना हार न मानणाऱ्या जगातल्या सर्व पालकांना तसेच मनातील संवेदनशीलता जपून या मुलांना व पालकांना मदतीचा हात देणाऱ्या सर्व सुहृदांना हे पुस्तक लेखिका डॉक्टर उज्ज्वला सहाणे यांनी समर्पित केले आहे.
या पुस्तकाचे लेखिका स्वाती कर्वे, संगीता सरदेसाई, सोनाली बोराटे,अनिता गंधे, सविता पांडे आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स व दैनिक लोकमतने परीक्षण केले आहे.तर प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक डॉक्टर मंदा खांडगे, मानसोपचारतज्ज्ञ मुक्ता पुणतांबेकर, कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, साहित्यिक प्रकाश संगीत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौंदर्या जोशी यांनी अभिप्राय दिलेले आहेत.
या पुस्तकास प्रतिभासंपन्न ऋषितुल्य साहित्यिक अनिल अवचट यांची प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात की,"ही कहाणी उज्ज्वला,केशव आणि प्रेरणा यांची विलक्षण कहाणी आहे.संघर्ष, संकटं व झगड्यातून उपजलेली कहाणी...या पुस्तकात कल्पनेचा विलास नाही की भाषेचा नवा आविष्कार नाही.यातील वाक्य नि वाक्य ते तिघे जगले आहेत.तेचअनुभव उज्ज्वलाने शब्दात मांडले आहेत.तिच्या वाट्याला झगडेच आलेत.आंतरजातीय विवाहाने बसलेले चटके, सासर माहेराचे परकेपण,संस्थाचालकांनी दिलेला लढा आणि मुलगी झाली पण एका आजारपणामुळे ती दिव्यांग कर्णबधिर झाली.केवढा मोठ्ठा मानसिक धक्का.
घराचे छत अंगावर कोसळावे असा प्रसंग.पण त्यातूनही वाट काढत काढत मार्गक्रमण केले.आणि मुलीला नृत्यनिपूण बनविले."
वेदनेचे नृत्य झाले या लेखात डॉक्टर सु.रा.चुनेकर ही कौतुक करताना म्हणतात,"मुलीला घडविण्याचे जे व्रत घेतले त्यातून उभे राहिले नवे जीवन!अर्धांगाच्या आजारावर मात करून ती नुसती उभी न राहता एक नर्तकी पर्यतचा खडतर प्रवास तिने आई-वडिलांच्या प्रयत्नात कसा पूर्ण केला त्याची रोमहर्षक कहाणी आहे.आयुष्याच्या आकाशात अनेक सहकार्यवृत्तीची माणसे ताऱ्यासारखी चमकत राहतात.
त्यातील काहींनी लुकलुकण्यातून मला जीवनातील संघर्षाकडे सकारात्मकतेने बघण्याचा रस्ता दाखवला. लेखिका डॉक्टर उज्ज्वला सहाणे यांचा विवाह ते कन्या प्रेरणा हिचा विवाह अशा ३२ वर्षाच्या कालचक्रातील आलेख 'प्रेरणा' पुस्तकात लिखित केला आहे.त्या मनोगतात उल्लेख करतात की,'प्रेरणा आम्ही जरी तुला जन्म दिला असला तरी,तूच आमची माय,यात व गुरुआहेस.कारण आहे त्या परिस्थितीत तूच आम्हाला हसतमुखाने बिनधास्त जगायला शिकवलेस. तू फक्त प्रेरणा नाहीस तर आमचे ऊर्जास्त्रोत आहेस.
भारती रिसर्च सेंटर,साताऱ्याचे संस्थापक सन्मानित डॉक्टर अशोक पाटील यांनी माझा उपक्रमशील शिक्षक म्हणून माझ्या घरी येऊन सपत्निक गौरव करताना हे पुस्तक मला भेट म्हणून सत्तावीस जून २०२१ला दिले होते. वाचून अभिप्राय देण्याची प्रेमळ सूचनाही केली होती.म्हणून परिचय करून देण्याचा एक प्रयत्न केला आहे……...
लेखिका डॉक्टर उज्ज्वला सहाणे यांनी दैनिक सकाळ, मिळून साऱ्याजणी,पालकनीती वनराई पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक आदी मासिकात विपुल लेखन केले आहे.
डॉ.वि.ब.वनारसे आदर्श शिक्षक पुरस्कार,आई पुरस्कार, संघर्ष सन्मान पुरस्कार,मातृप्रेरणा पुरस्कार,मॉं एक रुप अनेक पुरस्कार.'प्रेरणाची आई'हा जगातला सर्वात मोठा सन्मान मानतात.
आयुष्याच्या वळणावळणावर देवदुता सारख्या भेटलेल्या माणसांच्या नात्यातील वीण घट्ट करत जातो.प्रेरणाचे आयुष्य घडविताना आलेली संकटे,बसलेले धक्के सहन करत तिला स्वता:च्या पायावर उभं करायचं याचं साहस,जिद्दआणि ध्यासाने यशाची शिडी चढत चढत यशस्विता होऊन दाखवले.हाल,उपेक्षा, मानहानी प्रतिकूल परिस्थितीतही झगडत त्यांनी प्रेरणाला यशस्वी घडविले.याची कहाणी मायेच्या ममतेने हे आत्मचरित्र लिहिले आहे.वाचन करताना त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ठ्यांचे पैलू समजतात.संघर्षपणे झगडत आयुष्य कसं अनुभव सिध्द झालं याचा उलगडा होत राहतो.काही प्रसंगी भावना अनावर होतात.डोळ्यांच्या कडा ओलावतात.मुलीच्या आजारपणात तपासणीसाठी, शिकण्यासाठी करावे लागलेले दिव्य खटपटी या घटना प्रसंग वाचताना मन गलबलून जाते.मुलीचं शिकणं सुलभ व्हावं म्हणून समावेशित शिक्षणाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन तिला समजावून घेऊन शिकवलं.
प्रेरणाचा अभ्यास घेत घेत समाजातील इतर मुलांचाही शोध घेऊन त्यांना तपासणी करण्यासाठी विनवणी करणारे,प्रसंगी स्वत:आर्थिक भार उचलणारे,त्याही मुलांच्या शिक्षणासाठी सजगता दाखवून शाळेच्या ग्रंथालयात प्रशिक्षण केंद्र सुरू करणाऱ्या सहाणे मॅडम व सरांच्या कितीतरी पैलूंचे दर्शन होते.सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मायेचा आधार देत मायेच आधार घेत केलेलं कार्य अलौकिक आहे.
डॉक्टर वंदनादिदीने विमनस्क अवस्थेत चाकण मधील घरी येऊन 'स्टोरी आॅफ माय लाईफ'-अर्थातच हेलन केलर हे पुस्तक देऊन हेलन केलरचा जीवनपट उलगडून आम्हा दोघांना दाखविला.
अपंगाने मातीमोल झालेल्या आयुष्याला एका स्त्रीने जिद्दीने कष्टाने सोन्याची झळाळी दिली होती.मूकबधीर व अंध असलेल्या हेलनला कुटूंबाची साथ मिळाली आणि ती जगात महान ठरली.आणखी पुढं दिली कानाची रचना व कार्य, श्रवणयंत्र,स्पीच थेरपी आणि बहिरेपणा यावर चर्चा करते. बहिरपणावर मात करून यशस्वी झालेल्यांनी इतिहास घडविल्याचे ते सांगते.हे ऐकल्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते.मग मनोमन 'हेलन केलरला' दंडवत घालून मुलगी प्रियांकाला घडविण्याचे मनोमन ठरवितात.उगवत्या सूर्याच्या साक्षीने आता जगायचे ते फक्त प्रियांका साठी.असं म्हणून त्याचवेळी आपल्याला जगायला प्रेरणा मिळाली म्हणून मुलीचे प्रियांका नावं बदलून'प्रेरणा' ठेवतात.तिच्याच नावाचे पुस्तक आहे.
तदनंतर प्रियांकाला पुण्यातील नामांकित मॉर्डनचे पी.ई.एस.गर्ल्स हायस्कूल येथे दाखल करतात.इयत्ता पहिलीत प्रवेश मिळतो.आता ती दररोज चाकणहून शिवाजीनगरला एस.टी.ने जाऊन येऊन करते.नाताळची सुट्टी लागायच्या वेळी ती घरीच पोहचत नाही.सगळीकडे शोधा शोध सुरू होते.प्रत्येक येणारी एस.टी.तिचे बाबा बघतात तर आईने घरी हंबरडा फोडलेला असतो.रात्री ८ वाजता संपर्क होतो.प्रेरणा ओळखीच्या बाईकडे असते.
कारण एस.टी.त बसवणारी बाई आलेली नसते.ती शाळेच्या पायऱ्यावर रडत उभी असते.तीलाओळखीच्या लाईटमनची बायको बघते.ती हरवलीय हे लक्षात येतं नाही आता काय करावे? तीला लिहितावाचण्याचा गंध नसतो.ती प्रेरणाला घरी घेऊन येते.यामुळे मग तिचं शिक्षण व्यवस्थित होण्यासाठी संस्थेकडे बदलीचा अर्ज पुण्यातील शाळा मिळण्यासाठी करतात.
सांगवीत दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते.प्रेरणा छान पैकी स्कुलबसने शाळेत जात होती.सर्व मजेत चालले होते. पेपर चांगला गेला की तिचा इंद्रधनुष्यीआनंदी हसरा चेहरा आम्ही काळजावर कोरुन घ्यायचो.इकडे प्रेरणाचा वाढदिवस साजरा करत असतानाच माझी बदली चाकणला झाल्याचा आदेश औंध शाळेचे प्राचार्य घेऊन घरी घेऊन येतात. पुन्हा तेच संकट, तेच दुःख, तिच अगतिकता आणि विषण्य मन होतं विमनस्क अवस्था होते. हो नाही करता मग सारासार विचार करून सांगवीतून चाकणला मॅडमचे येजा सुरू होते.
त्यामुळे प्रेरणाच्या अभ्यासकडे दुर्लक्ष झाल्याने ती नापास होते.असेच दिन मार्गस्थ होतात. एकदा घरातल्या हॉलमध्ये टीव्हीवर नृत्याचा कार्यक्रम पाहताना ती नाचायचा प्रयत्न करीत होती.छान वाटत होतं.अचानकपणे माझे वडील भाऊसा आम्हाला भेटायला येतात. बारा वर्षानंतरची पहिली भेट असते. माझा आनंद गगनात मावत नाही. मुलीलाही आशीर्वाद देतात आणि नानासाहेब गोरे यांची तुला, मी भेटण्याची सूचना अमलात आणली हे आवर्जून ते सांगतात.
एकदा शाळेच्या गॅदरिंगमध्ये 'गणराज रंगी नाचतो' या गाण्यावर मेनका गोसावी नावाच्या मुलीने बहारदार नृत्य सादर केले होते. शाळेत सगळेजण तिचे कौतुक करतात. तेव्हा मॅडम तिला विचारतात.' काय ग तुझ्या गुरु माझ्या मुलीला नृत्य शिकवतील का' ?ती तात्काळ होकार देते. आणि उद्या संध्याकाळी भेटायला जायचं निमंत्रणही देते. आम्ही नाराजीनेच तिच्या गुरु शमिता चटर्जी हिच्या घरी जातो. शमिका व प्रेरणाची नजर भेट होते.चेहरा फुलतो ओठांवर हास्य पसरते. ती प्रेरणाला कर्णबधिर असली तरी भरतनाट्यम शिकवण्यास होकार देते. मग काय?फारच आनंदी क्षण.तदनंतर तिचा क्लास सुरू होतो. क्लासला जायचा ती कधीच कंटाळा करत नाही.केशव सरांना तिला क्लासला घेऊन जाण्याची जबाबदारी येते.
एकदा मोठ्या मुलींना अवघड मुद्रा शिकवलेल्या असतात. त्या करत असताना त्या वारंवार चुकतात. म्हणून शमिता त्यांच्यावर रागवते-चिडते त्यावेळी प्रेरणा स्वयंस्फूर्तीने शमिकाच्या पुढे जाऊन आखीव रेखीवपणे अवघड मुद्रा सादर करते.ते पाहून शमिता चकित होते.आणि भेटायलाच उज्ज्वलाला बोलावते.ती उज्ज्वला मॅडमचा हात घट्ट धरून म्हणते.
"उज्ज्वला प्रेरणा, इज गॉड गिफ्ट, अगं संगीत सूर ताल सगळे शरीरातच घेऊन ती जन्माला आलीय. तिच्याकडे जन्मजात ही कला आहे. मी फक्त ही कला जिवंत करणारं साधन आहे. खरंच ही देवाची देणगी आहे. मग काय?प्रेरणाचे 'अरंगेत्रम' करण्याचे स्वप्न तिला पडते.
भरतनाट्यम् नृत्यांगना करण्याचे ती मनोमन ठरविते.
एका सर्वसामान्य कर्णबधिर मुलीचा प्रवास भरतनाट्यम् नर्तिका होण्याच्या दिशेने सुरू झाला.तर इकडे संस्थेने लेखिकेची निवड सेवानिवृत्त शिक्षिकेच्या जागेवर केली.अन् ग्रंथपालची प्राथमिक शिक्षिका झाली.पण मान्यता लवकर येत नव्हती.तेव्हा प्रेरणा सह ते जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे समजावून सांगितले.त्यांनी माझ्या मुलीकडे एक वेळा पाहिले.माझी मुलगी कर्णबधिर आहे.माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता मला आहे. म्हणून मी बीएड असतानाही डीएड नोकरी स्वीकारते आहे.तद्नंतर तात्काळ त्यांनी मान्यतेचे पत्र तयार करून दिले.तदनंतर ते पत्र घेऊनच त्या शाळेत जातात.
सुपरस्टार नाना पाटेकर सोबत प्रेरणा दीड-दोन तास मूकबधिरांच्या भाषेत गप्पा मारतात. हितगुज करतात. संवाद साधतात आणि याच संवादाचा लेख १७ एप्रिल १९९७ च्या दैनिक सकाळमध्ये 'नाना व प्रेरणा'या शीर्षकाने प्रसिद्ध होतो.कौतुकाचे अनेक फोन येतात. शब्दाशब्दातून आनंद पेरणारे लेखक अनिल अवचट यांनी तिला ओरोगामी कागदकाम शिकवले होते.मी ही डॉक्टरेट मिळवावी अशी चुनेकर सरांची इच्छा होती.दिवस पुढं सरकत असतानाच अधून मधून आमची आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांची बदलीवरून खडाजंगी होत होती. त्यातच राजेश आणि सुधीर या दोन मुलांचा आम्हाला लळा लागतो. ते दोघेजण प्रेरणेला बहीण मानतात.तर तिकडे शमिता कोलकत्ता येथील नृत्यनाटिका सादर करण्यासाठी प्रेरणाची निवड करते.तिथं सर्व प्रसारमाध्यमे कार्यक्रम बघून कौतुक करतात.
संगीत रक्तातुन वाहत होतं,गीताचे बोल हृदयात उमटत होते.पदन्यास ,भावमुद्रा निसर्गाचा अविष्कार होता.
तद्नंतर प्रेरणा दहावी व बारावी पास होते.सगळ्यांना अत्यानंद होतो.लहानपणी शाळेत पाहिलेलं लेखिकेचे स्वप्न साकार होते."लेखक अनिल अवचट यांच्या साहित्याच्या अभ्यासावर"डॉक्टरेट मिळविते.यासाठी कौटुंबिक टीम वर्क करून यश मिळविलेले असते.
एक जून २००७ रोजी भरतनाट्यम 'अरंगेत्रम' चे सादरीकरण होते.तिचा वैयक्तिक नृत्याविष्कार सादर करते.एका कर्णबधिर मुलीने शास्त्रीय नृत्य उत्कृष्टरित्या सादर केलेले असते.सगळेजण टाळ्यांच्या गजरात गौरव करतात.कौतुक करतात.वर्तमानपत्रात प्रसिध्दी मिळते.नावलौकिक होतो.तदनंतर अनेक शहरांत प्रेरणा विविध थीमवर नृत्याविष्कार सादर करते. तिला मानसन्मान मिळतो.
शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीतून लेखिका कार्याध्यक्षपदी निवडून येतात.प्रेरणा भरतनाट्यमची परीक्षेतही मातेच्या नावाप्रमाणेच उज्ज्वल यश मिळविते.प्रेरणाला सांभाळून घेणारा तिची भावना व भाषा जाणणारा तिच्याशी तिच्याच भाषेत मूकसंवाद साधणाऱ्या स्वप्नील दिक्षितशी विवाह संपन्न होतो.
आयुष्यातील सुवर्ण क्षण दि.३ डिसेंबर २०१५ रोजी लाखो आनंदाच्या चंद्रज्योती लखलखल्या.अर्धांगवायू होऊन शरीराची लोळागोळा झालेली प्रेरणा ते राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन्मानाने होणारी प्रेरणा !माझं काळीज आभाळाएवढं झाले. आईला यापेक्षा आयुष्यात काय हवे.अभूतपूर्व क्षण कॅमेरात कैद झाले.आमच्या दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.ऊर अभिमानाने भरून आला होता.गोड हसत अनिमिष नेत्रांनी आम्ही प्रेमाला पुरस्कार स्विकारताना पाहत होतो.
श्रवणाचा अक्षय कान, नृत्याविष्काराने दिला मान,देशाने दिधला बहुमान,तूच आहेस आमची प्रेरणास्थान……
सहज सुंदर ओघवत्या भाषाशैलीत 'प्रेरणा' द साउंड ऑफ सायलेन्स..या आत्मचरित्राचे लेखन जीवनपटात गुंफले आहे.हे पुस्तक वाचताना आपण मंत्रमुग्ध होतो.त्यांच्याच कुटूंबाचा भाग बनून जातो.अशी दोन सशक्त स्त्रियांची संघर्षमय जीवनगाथा, संवेदनशील व्यथा आणि प्रेरणादायी कथा आहे.कलात्मक पध्दतीने जगत दुसऱ्याला भरभरून देणे हे यशस्वी जीवनाचे रहस्य या आत्मकथेतून उलगघडत जाते.दिव्यांग अपंग मुलांना घडविणाऱ्या अनेक पालकांना त्यांच्या अडचणींवर मात करायला हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल. अप्रतिम पुस्तक आहे….
@परिचयक -श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment