पुस्तक परिचय क्रमांक-६० टीचर
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६०
पुस्तकाचे नांव-- टीचर
लेखिकेचे नांव--सिल्विया अॅश्टॅन-वाॅर्नर
अनुवादक-अरुण ठाकूर
प्रकाशक-मनोविकास प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०१२/बारावी आवृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१८३
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--
ललित
मूल्य--१५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
६०|| टीचर तिच्या वेगळ्या प्रयोगाची रोचक कहाणी
लेखिका-सिल्विया अॅश्टॅन-वाॅर्नर
अनुवादक अरुण ठाकूर
-----------------------------------------------
शिकणे म्हणजे माहित नसलेलं माहीत होणे. व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहीत झालेले वापरता येणे, वापरता येण्यासाठी त्याचे स्मरण करून आणि शक्य झालेतर माहीत झालेल्यात काही भर घालते.यालाच आपण 'शिक्षण' हे सारे माणसांतच नव्हे तर सर्व सजीवांच्यात उपजतअसते. त्यामुळे शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.खऱ्या अर्थाने ती घडताना आनंद मिळतो.म्हणून शिक्षण ही आनंददायी घटना.
पण हल्ली परीक्षेतील गुणवत्ता हीच मुलाची मालमत्ता मोजण्याचे साधन मानले जात आहे.समाजातला 'मार्क्सवाद' मंदावला आहे पण शिक्षणातल्या 'मार्क्सवाद'ने छळवाद मांडला आहे.गणितात कमी गुण मिळालेल्या मुलाला उत्तम कार्टून्स काढता येतात पण कोणी त्याच्या कार्टून्सचे कौतुक करत नाही.तसेच मराठीत बऱ्यापैकी गुण मिळविणारा मुलगा उत्तम अभिनय करतो पण त्याला शाबासकी देणार नाहीत.विज्ञानात जेमतेम गुण मिळविणारी मुलगी धावण्याच्या स्पर्धेत विजेती होते,तर तीच्याआकौतुकास्पद कामगिरीचे स्तुती करत नाहीत.त्यामुळे अशा परिस्थितीतच दुभंगलेली मानसिकता जन्म घेते.
मानसिकता जीवनात घात करत असते.अशी आहे शिक्षणातील 'मार्क्सवादा'ची खरी कहाणी.शिक्षणाने समाज दिवसेंदिवस अधिक चिंतातूर आणि भयभीत झाला.हे चित्र कुठेतरी बदलले पाहिजे,असे सर्व जण सांगत असतात. यासाठी आनंददायी शिक्षणाचे प्रयोग करून करून पाहणं आवश्यक असतं.जगामध्ये अशा प्रकारचे प्रयोग नवनिर्मिती वेगळ्या वाटेने विविध ठिकाणी कृतीशील शिक्षक करत असतात.विविध तंत्रं व पध्दतींचा उपयोग करून मुलांचं शिकणं आनंददायी करण्याचे प्रयत्न करत असतात.
त्या पैकीच सिल्व्हिया हॅंडरसन न्यूझीलंडमधील आदिवासी 'मावरी' समाजातील मुलांच्यावर पूर्व- प्राथमिक शाळेत केलेले प्रयोग म्हणजे त्यांनी लिहिलेले 'टीचर'हे पुस्तक होय. या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद अरुण ठाकूर यांनी केलेले आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना 'शिक्षणाचं चांगभलं' या शिर्षकाने शिक्षणतज्ज्ञ,आपटे प्रशालेची शान वाढवणारे,तळागाळातील व उपेक्षित मुलांना फुलविण्यासाठी नित्य तत्पर असणारे, अनेक सामाजिक संस्थांना आपल्या सर्वोत्तम सहकार्याने आधार-दिलासा देणारे, सर्वांना आपले वाटणारे, तसेच नापासांच्या शाळेचे संस्थापक पुरुषोत्तम गणेश वैद्य यांनी टीचर या पुस्तकातील नव उपक्रमाचे शैक्षणिक प्रयोगाचे समिक्षणात्मक विवेचन आशयघन शब्दात शब्दांकन मांडले आहे.
सिल्व्हियाचे बालपण अतिशय हलाखीत गेले तिचे वडील अपंग असूनही आजारी होते. त्यामुळे ते सदैव चाकाच्या खुर्चीत किंवा अंथरुणाला खिळून असत.तर आई शिक्षिका त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचबरोबर ती वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून तिने काम केले. संगीत, चित्रकला व लेखन हे तिचे छंद बनले. खरतर तिला शिक्षिका व्हायची आवड नव्हती .परंतू त्या काळातील कुटुंबाची गरज आणि तिने घेतलेले शिक्षण यामुळे तिची शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.
माणसाची जन्मापासूनच शिकण्याची प्रक्रिया घडत असते.हल्ली तर अडीच वर्षाची मुलं प्ले ग्रुप मध्ये घालतात म्हणजे सध्या अडीच वर्षांपर्यंतच मुलं घरामध्ये असतात पूर्वी मुलं पाच ते सहा वर्ष घरामध्ये असायची. पाच-सहा वर्षांची मुले घरामधील वातावरणातून ऐकून पाहून निरीक्षण करून आणि अनुकरणाने शिकतात.तिने केलेली शैक्षणिक प्रयोगाचे मूळ बालपणी तिच्यावर झालेल्या संस्कारात आहे.
असं प्रास्ताविकाकार नमूद करतात.
सहकार्याचे,सहजीवनाचे सहज मदत करण्याचे धडे तिला घरातच मिळत गेले आणि त्यातूनच तिच्यामध्ये सर्जनशीलता निर्माण झाली. कुटुंबातील थोरली असल्यामुळे तिच्या जबाबदार्या वाढल्या आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिला अनुभूती मिळाली त्यातूनच तिला खूप काही शिकायला मिळालं.त्याची माहिती तिने केलेल्या शिक्षणातील प्रयोगातून दिसून येते.घर हे शिक्षणाचे पहिले विद्यापीठ.यात कोणीही थेट शिकवत नाही. निरीक्षण अनुभव अनुकरण यातून सगळे एकमेकांपासून शिकत असतात आणि यालाच आपण 'सहजशिक्षण' म्हणतो आणि तिने मावरी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयोगांच्या नावातही सहज हाच शब्द होता. एकंदरीत तिच्या विचारसरणीतही त्याचा जास्त पगडा होता हे आपणाला हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवते.
या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेत १९६३ साली झालं आहे.वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत मुलाला झालेल्या संस्कारातून घडणारे व्यक्तिमत्त्व कायम स्वरूपी असते.हे मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे.प्रयोगशील लेखिका सिल्व्हिया अॅस्टन-वॉनर म्हणतात, "लिहणारी बोटे पुढे सरकतात, लिहीत लिहीत पुढे जातात. तुमची सहानुभूती व चातुर्य त्यांना अर्ध्या ओळी वर थांबू शकत नाही. तुमचे सगळे अश्रू त्याचा एक शब्द पुसू शकत नाहीत."मुलांच्या अवधान लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसिद्ध संगीतकाराची सूरावट वाजवणे.या स्वरलहरी ऐकताच मुलं हातातील काम सोडून माझ्या बोलण्याकडे लक्ष देत.आपण काय सांगतो यापेक्षा कसं सांगतो याला महत्त्व आहे.
टीचर पुस्तकाचे अनुवादक अरुण ठाकूर यांचेही मनोगत प्रयोगशीलतेचा समृद्ध प्रवास कसा उलगडला यांचे संक्षेपाने विश्लेषण करतात.बाल विज्ञान केंद्राचे संचालक श्री अरविंद गुप्ता यांनी सहज वाचायला म्हणून दिलेले'टीचर'हे पुस्तक मनात घर करून बसले. तरुणपणी शिक्षण क्षेत्रातील उपेक्षितांच्या प्रश्नांशी काही काळ मी निगडीत होतो. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या.
नाशिक मधील काही मित्रांनी आनंददायी अर्थपूर्ण शिक्षण चळवळीतील शाळा उभारण्याचा संकल्प केला.अन् १९९८ साली'आनंद- निकेतन'ही शाळा सुरू झाली. आनंद निकेतन मधील शिक्षकांच्या वृत्तीशी असणारे नाते मला 'टीचर' हे पुस्तक वाचल्यावर जाणवले. आणि त्यांच्याशी या पुस्तकावर मी बोलू लागलो. यातूनच ही अनुवादाची प्रेरणा मिळाली. या पुस्तकाचे सर्व श्रेय अरविंद गुप्ता आणि 'आनंद निकेतन'च्या शिक्षिका यांचेच आहे.माझी भूमिका ही केवळ संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर, "फोडिले भांडार |धन्याचा हा माल| मी तो हमाल| भार वाही|"एवढीच आहे असे नमूद करतात.
एखादे पुस्तक आपल्याला जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन प्रदान करते. तेव्हा ते नुसते पुस्तक उरत नाही तर जिवंत मार्गदर्शक बनते.'समरहील', 'तोत्तोचान' ,आणि टीचर ही शिक्षण क्षेत्रातही अशी तीन पुस्तके आहेत.केवळ शालेय शिक्षण या विषयावरची नसून जीवनविषयक दृष्टिकोन घडविणारी पुस्तके आहेत. सिल्व्हिया वॉर्नर यांचे पुस्तक सुद्धा अगदी रसरशीत आहे.
उदाहरणे दाखले यांचा वास्तव भाग असून मुलांशी झालेल्या संभाषणाचे वर्णंन आहे.यातील प्रयोग 'आनंद निकेतन' शाळेत राबविले जातात.
प्रयोगशील टीचर पुस्तकात २१ विभागातून लेखन वाचन अभिव्यक्तीचा उलगडा होतो.सेतू बांधा रे सागरी…,पायाभूत शब्दसंग्रह ,मावरींच्या बालवाडीत वाचनाच्या तयारीची मार्गदर्शक तत्त्वे, व्यक्तिगत आधारभूत शब्दावली, मूलभूत शब्दावली शिकवण्याचे तंत्र-मंत्र, मी कधीच काहीच शिकवत नाही. सहज लेखन, जीवनिष्ठ सहज लेखनाचे तंत्र व मंत्र,सहज वाचन सहज शब्द लेखनाचे तंत्र मंत्र मावरींची संक्रमण वाचनमाला, निसर्ग आमचा सोनेरी टापू, जीवन जे फुललेच नाही, मावरी शाळेतील जीवन आणि स्मरण यात्रा असे घटक विभाग आहेत.
आदिवासी मुलांना शिकवण्यासाठी सहन वाचन पद्धती कशी उपयुक्त आहे हे तिने मोजक्या शब्दात सांगितलेले आहे. शिकण्याची तीन प्रकार असतात.एक पारंपारिक दुसरी अपारंपारिक पद्धत आणि तिसरा प्रकार 'सहज शिक्षण' हे आपण नित्याच्या व्यवहारात पदोपदी वापरत असतो.तो कधी घोकावा करावा लागत नाही.ते आपोआप लक्षात राहते. विसरायचं ठरवलं तरी ते विसरत नाही कारण शिकणारा आणि शिकवणारा यांच्या भावविश्वाशी या शिकण्याचा संबंध असतो यालाच 'सहज शिक्षण' असं म्हणतात तिचा सहज शिक्षण या संकल्पनेवर खूप विश्वास होता आणि त्यातूनच ती या मुलांना बाराखडी पायाभूत शब्दसंग्रह,व्यक्तिगत आधारभूत शब्दावली व शब्दाचा आकृतिबंध पॅटर्न चित्र आणि वस्तू यांच्या संगतीने तिने मुलांना शिकवायला सुरुवात केली होती.
अध्ययनची स्वकृती करून पाहणे.स्वत: रचना करणे.वाचनासाठी शब्द अर्थसंपन्न असणे, त्याने पाहिलेले आणि त्याच्या परिसरातील शब्द असावेत.शब्दकार्ड वापरणे.भावबंध हा सर्जनशीलतेचा शक्तीस्त्रोत आहे.मुलांनी एकामेकांनी बोलणं,गप्पा मारणं आणि चर्चा करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.त्यांना बोलायला प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे.असं त्यांचं मत होतं.मुलांना जोडीने वाचायला लावणं.तिसऱ्याला निरीक्षण ठेवायला सांगणे.हळू वाचत असल्यास गतीने वाचायला सांगणे.म्हणजेच आपल्याला जमते ते न येणाऱ्यांना शिकविणे.स्वयंअध्ययन आणि स्वत:रचना करत अध्ययनाचा अनुभव आनंदाने हसत खेळत 'सहज' घेणे.
एक शैक्षणिक अध्ययनाचा वेगळा कृतीशील अनुभव 'टीचर' या पुस्तकातून घेऊन आपणा सह मुलांना शिकायला व शिकवायला एक तंत्र म्हणून अनुभव मिळाले असं मला वाटतं.कारण याचाच आधार घेऊन नाशिक येथील आनंद निकेतन मध्ये हा प्रयोग तेथील शिक्षिका करत असतात….
@श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
Comments
Post a Comment