पुस्तक परिचय क्रमांक-६५ रानमेवा
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६५
पुस्तकाचे नांव--रानमेवा
लेखकाचे नांव--व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण/ऑक्टोंबर २०१७
एकूण पृष्ठ संख्या-८०
वाङमय प्रकार ( कथा,कादंबरी,ललित ई.)--कथासंग्रह
मूल्य--९०₹
📖📚🍁📖📚🍁📖📚🍁📖📚🍁
६५||रानमेवा
व्यंकटेश माडगूळकर
कथासंग्रह
-----------------------------------------------
''काहीवेळा कथेचं लहान बीज मनात येऊन पडते.पिंपपळाच्या बीजासारखे..अशी बीजे नेहमी पडत असतात, पण त्यातलं गवताचे कोणते आणि पिंपळाचे कोणते,हे मात्र नेमके कळत नाही.पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो,त्याच्या पानाची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते." ही गंभीर सळसळ व्यंकटेश माडगूळकर यांनी कशी ऐकली असेल.याची कल्पनाही आपण करू शकत नाही.पण किन्हई, कुंडल आणि माडगूळच्या माणदेशी खेड्यातील मानवी जीवनाचे नाट्य अनेक कथात उतरवलं आहे.असं त्यांची कन्या ज्ञानदा नाईक यांनी मनोगतात मांडलेले आहे.
जेष्ठ प्रतिभासंपन्न साहित्यिक ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी वाड्मय क्षेत्रात चौफेर विस्तृतलेखन केले आहे.त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसतानाही त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने मराठी साहित्य क्षेत्रात मौलिक भर घातली आहे.त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या नाटकं गाजलेली आहेत. बनगरवाडी, माणदेशी माणसं, सत्तांतर आणि रानमेवा आदी हिरव्या बोलीच्या अक्षरशिल्पांनी वाचक रसिकांवर गारुड केले आहे.अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रशच्या सानिध्यात रममाण होऊन चित्रकला जोपासताना वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी लिहिलेल्या एका कथेला पारितोषिक मिळाले.हे लेखणीचं सामर्थ्य लक्षात आल्यावर 'लेखन' क्षेत्रात भरारी घेऊन अनेक कथा कादंबरी आणि पटकथांचे लेखन केले.अल्पकाळ मुंबईत पत्रकारिता केली. पण त्या क्षेत्रात मन न रमल्याने पुढे त्यांनी'अॉल इंडिया रेडिओ'च्या पुणे येथे ४०वर्षे ग्रामीण विभाग सांभाळला.
'रानमेवा'हा कथासंग्रह माणदेशी खेड्यातील अनेक व्यक्तिंच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करत आहे.त्या काळातील गावांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे चित्रण या कथेत उभारले आहे.त्यांच्या कथा माणसाचे विविध पैलू उलगडून दाखवितात.कथेतील रसरसरीत आणि टवटवीतपणा वाचताना लक्षात येतो. याच पुस्तकात तात्यासाहेबांना पुणेविद्यापीठाने डी.लिट्.पदवी देवून सन्मानित करताना दिलेले 'सन्मानपत्र' वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.
साहित्यातील त्यांंच्या अलौकिक कार्याबद्दल समर्पक शब्दांत सन्मानित केले आहे. "स्वातंत्र्योत्तर बदलत्या ग्रामीण जीवनाची स्पंदने आपण अतिशय समर्थपणे व्यक्त केली आहेत. आत्तापर्यंत मराठी साहित्यात खेडे येत नव्हते, असे नाही परंतु प्रथमत:च अस्सल ग्रामीण वास्तव कलात्मकपणे आपल्या लेखनातून प्रकट झाले आहे. काळीचा रंग-गंध आणि पांढरीची वेदना यातून आपले साहित्य उत्कट झालेले आहे.शेतकऱ्यांबरोबरच खेड्यातील दलित आणि इतर कास्तकरांच्या जीवनाचे आलेख आपण मोठ्या समर्थपणे रेखाटले आहेत. म्हणूनच १९९४५ नंतर उदयाला आलेल्या 'नवकथे' च्या जडणघडणीत आपला वाटा मोठा ठरतो.आपल्या कादंबऱ्या सीमापार करून जगातल्या अनेक भाषांमध्ये लोकप्रिय केलेल्या आहेत.तसेच आपले नाटय क्षेत्रातील कार्यही अतुलनीय आहे.लोककलांच्या सामर्थ्याचा वापर आपण 'बिन बियाचे झाड' या वगनाट्यावरुन नवी जाणीव मराठी भाषेमध्ये विकसित होत गेली याचं श्रेय आपल्याकडेच आहे. कृतार्थ भावाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सन्मान्य डी.लिट्. पदवी प्रदान करीत आहोत."
'रानमेवा'या कथासंग्रहात नऊ कथांचा समावेश केला आहे.रानमेवा, माझी मोठी खरेदी,भाजी विक्याची गोष्ट, इंद्रजाल,चिमण्या,बावा,जागर,गाठोडे आणि तालमीचे उद्घाटन..
रानमेवा कथेचे वाचन करताना आपल्या बालपणी शाळकरी वयात केलेल्या धमालगोष्टी उचापती, डोंगरदऱ्या नदीनाली व रानोमाळच्या भटकंती आणि शेतशिवारातल्या गमतीजमती आठवतात.रसास्वाद घेताना आपण बालपणात हरवून जातो.सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उजाळतात. रानमेवा ही कथा किन्हई,कुंडल आणि माडगूळ परिसरातील आहे. शाळा सोबत्यांच्या बरोबर रानोमाळ शेत शिवारातील भटकंतीचे बारकाईने केले आहे.रानात अन् शेतातलं काय काय मेवा खाल्ला? याचं वर्णन गावरान भाषेत मांडलेले आहे.फळझाडांच्या बागांतील लयलूट करत मनसोक्त रानमेवा हासडला.चिंचची पाने ते चिंचा,आंबे,पेरु,
बेलफळे,आवळे,रामफळे, सिताफळे,बोरे आदी फळे खाण्याच्या करामती.निवडुंगाची बोंडे काढण्याची युक्ती. रानात अंडी उकडण्याची नामी शक्कल.आणि गमतीचे वर्णंन रसदार केले आहे.
पत्र्याच्या शाळेत शामू नावाच्या मुलाबरोबर शाळा सुटल्यावर झालेल्या झटापटीतून हाणामारीतून त्याने मैत्रीसाठी पुढे माझा हात हातात घेऊन म्हणाला,''शाबास रे भाद्दर!
आपन-तुपन आजपासनं दोस्त.हात मिलाव.''आम्ही उरावरी भेटताच मुलांनी शिट्ट्या वाजवल्या.टाळ्या पिटल्या.किन्हई ते सातारा रोड या रस्त्यावर लायब्ररी बंगल्या जवळ सरकारी बागेतील घटना तर फारच रोमांचकारी आणि वेदनादायक आहे.महादा, शंकर आणि लेखक बागेतील पेरु काढायला बंगल्या जवळील झाडांकडे जातात.तिथं दोन उंचच उंच चिंचेची झाडे होती.त्याच्याच सावलीत लांबलचक ओंडका होता.तोडलेले पेरु वाटावाटी करून खात होतो.
गप्पा मारत बसलो होतो.तेवढ्यात आभाळ भरुन आले होते.पेरु संपले म्हणून पुन्हा आणायला लेखक आणि शंकर गेले.महादा तिथचं थांबत म्हणाला,'तुम्ही तोडून आणा,मी बंगल्याच्या आवारात येणार नाही.माळी मला धरुन नेईल सरकार वाड्यावर."मग ते दोघे पेरु काढत असताना अचानक विजांचा कडकडाट आणि चमचमाट झाला.तेवढ्यात काळ्याभोर आभाळातून विजेचा लोळ चिंचेवर पडला. त्यांचे डोळे दिपले.थोड्या वेळाने झाडावरून खाली उतरून पळत चिंचेजवळ आले आणि बघतात तर, चिंचेची पाने खोड व फांद्या करपल्या होत्या.वीज चिंचेच्या झाडावर कोसळली होती.अन् ओंडक्यावर बसलेला महादाही करपून खाली धुळीत पडला होता. रानातले लोक 'वीज पडली.वीज पडली.' असा गोंगाट करत धावून आले.अनर्थ घडला होता. माणसाचे अपघाती मरण पहिल्यांदाच बघितल्याने लेखक व शंकर भीतीने थिजून गेले होते.या प्रसंगाचे वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात.मनापुढे प्रसंग तराळतो.
'माझी मोठ्ठी खरेदी'या कथेत हेंदळे नावाच्या गृहस्थाचे वर्णन आणि अचानक उगवण्याचे प्रसंग अफलातून रंगविले आहेत.तात्यांचा तसा भिडस्त स्वभाव ,शक्यतो ते नकार देत नाहीत.याचमुळे त्यांनी हेंदळे यांच्याकडून दुर्मिळ पुस्तकांचा रिचर्ड एफ बर्टनचा संच,कातड्याचा सोफा सेट,पर्शियन गालिचा आणि एअरगन आदी चीजवस्तू खरेदीचे रसभरीत शब्दसाजात वर्णंन केलंय.एवढच नव्हे तर हेंदळ्याकडून सर्कशीतल्या हत्तीचे पिल्लूही खरेदी करून गॅरेज मध्ये दोन-तीन दिवस ठेवले होते.तिन दिवसांनी पेपरमधील जाहिरात वाचल्यावर खरे काय उमगले.संपर्क नंबर फोन फिरवून पिल्लू घेऊन जाण्याचे सांगितले.पण हेंदळ्यांकडे पिल्लू कसे आले,हे कोडे काय सुटले नाही.अशी खरेदीची मिश्किली कथा आहे.
'भाजी विक्याची गोष्ट'या कथेत तानाजी नावाच्या हातगाडीवरुन भाजीपालाविकणाऱ्या इसमाची गोष्ट आहे. तानाची गुलटेकडी मार्केट मधून भाजी खरेदी करून हातगाडीवर ठेवून ठराविक गल्लीत विकत असतो.लोकांना कळण्यासाठी तो,'बहाऽऽजे ले!अशी ओरडत आरोळी द्यायचा.अलिकडे ट्राफिक बेसुमार वाढल्याने गर्दीतून भाजीची गाडी ढकलत जाणं जिकिरीचे व्हायचं.एकदा गणपतीच्या दिवसांत रस्त्याच्या जागोजागी ट्राफिक हवालदार उभे राहिले होते.थोडं कुणी रेंगाळल की ओरडत होते."हला ,हला ओ साहेब,ओ पैलवान पुढं चला."तेवढ्यात एक टाकी गाडीजवळभाजीची पेंढी घेत होत्या.तेवढ्यात ट्राफिक हवालदार ओरडतो,''ए भाजी हाल ,हाल पुढं…''अस एक दोन वेळा घडते.वरुन येणाऱ्या गाड्या हॉर्न वाजवत होत्या त्यामुळे हवालदार भलताच कावला.काकी पैसे आणायला जाते.ती काय लवकर येत नाही.मग तानाजीला पैसे मिळत न्हाय.हवालदार ओरडतो.त्यामुळे तानाजी म्हणतो,''आयलाऽऽ रेऽ''हवालदारला वाटते मला शिवी दिली.तो त्याला घेऊन चौकीवर येतो.कोर्टात खटला दाखल होऊन त्याला काही काळासाठी कारावासात रवानगी होते.
तुरुंगातून सुटल्यावर तो नेहमीसारखा त्याच गल्लीतून भाजी विकत असताना गिऱ्हाईक वेगळ्याच नजरेने बघतात.त्याची भाजी आपण नाही म्हणून तो दुसऱ्या दिवशी मद्य पिऊन भाजी विकायला त्याच गल्लीत येतो.ऐन गर्दीच्या वेळी भर रस्त्यावर गाडी उभी करतो. ट्राफिक जाम होऊन आवाजाचा गलकावाढतो. हवालदार शिट्टी वाजवत येतो.आणि म्हणतो, ''ए, भाजीवाला,हाल,हाल,म्होरं हो.."तानाजी गप्पच उभा राहतो.मग पुन्हा हवालदार ओरडल्यावर तो एक खच्चून शिवी हासडतो.''कोन रं, मला हाल म्हणणारा तू?''तानाजीच्या तोंडाचा वास आणि हावभाव बघून त्याचा आवाज मऊ होतो.मिनतवारी करुन हवालदार गाडी बाजूला घ्यायला लावतो.मग प्रेमानेसंवाद साधतो.अशा दोन घटनांचे वर्णन सहज सुंदर शब्दात केले आहे.शिवी दिली नसताना तुरुंगात जावे लागते,आणि मद्य पिल्यावर खरंच हवालदाराला शिवी दिलीतर केसही होत नाही.तानाजी तर सारखा, 'मी शिव्या दिल्या.मला धरा.जेलात टाका ,'असा लकडा लावतो.तेव्हा हवालदार म्हणतो,''पैलवान,पिल्याव माणसाचा थोडा तोल जातो.तोंडातनं तसलाशब्द निघाला तरी शान्या माणसानं कानाडोळा करायचा असतो."
'इंद्रजाल' ही कथा गावातल्या कामधंदा न करता आयतं बसून खाणाऱ्या गणा भपट्याची आहे.त्याला काम धंदा न करता जादुने बक्कळ पैसा कमवायचा असतो.त्यासाठी गावात आलेल्या गारुड्याला पैसे मिळवून देण्याची विद्या शिकवायची गळ घालतो.गारुड्याचे हातचलाखीचे खेळ त्याला खरेच वाटतात.गारुडी त्याला ही विद्या पंढरपुरला पुस्तकाचा दुकानातील 'इंद्रजाल' पुस्तक घेण्याचा सल्ला देतो.मग गणा पैसे जमवून चालत जाऊन पुस्तक आणतो. आणि ते वाचून करामती करायला लागतो.त्याचे वर्णन वाचताना विक्षिप्त व ऐतखाऊ गणू कसा आहे हे दिसून येते.
'चिमण्या'या कथेतून लेखकांस गावाकडील घर आणि परिसरात चिमण्यांची चिवचिव आठवत राहते.घरी चिमण्या येवून काय काय करायच्या याचं बारकाईने वर्णंन शब्दबध्द केले आहे.सुगरणीच्या घरट्यांचं वर्णंन करत करत शहरातील घरातही चिमण्या कपाटाच्या पाठीमागे घरटं कसं उभारतात.अंडी कशी घालतात,पिल्लं कशी होतात.याचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून सुंदर शब्दात लेखन केले आहे. त्यांची निरीक्षणे अप्रतिम पध्दतीने या कथेत लिहिती झाली आहेत.खुपच बारकावा लेखनाचा आहे.कथा वाचताना प्रसंग आपल्या समोर घरातल्या अंगणात घडतोय असं वाटतं राहते.
'बावा'ही कथा दोन लहान जिवलग मुलींच्या मैत्रीची आहे.मिरी आणि सुबाची ही कथा आहे.निस्सीम मैत्रीला मोठ्यांच्या अनपेक्षित घटनेने विरजण लागते.सुबाच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे तिच्या मुलीशी खेळायचे नाही. असे मिरीला तिची आई निक्षून सांगते.त्यामुळे त्या दोघी एकमेकींशी अबोला धरतात.एकत्र खेळत नाहीत.एकदा मिरी वडिलांचे जेवण घेऊन ओढ्यापलीकडील मळ्यात निघालेली असते.ते सुबा आपल्या घरातून बघते.मग ती ही तिच्या मागे न बोलता चालत जाते.तेथील वाळूत पाय भाजण्याचा प्रसंग आणि दोघींनी आंबा चोखून खाण्याचा प्रसंग त्यांची अबोला असूनही मैत्री कशी टिकते,याचे दर्शन घडविते.सुंदर कथा आहे.
'जागर'कथा तर प्रत्यक्ष कोल्हापुरात एका जोगत्याच्या घरी ऐकलेली ही कथा रुपक स्वरुपात गुंफली आहे.एका चित्रपटाच्या पटकथेसाठी जोगत्याचे घर आणि गाणी ऐकायची होती.यल्लमा देवीच्या जोगत्यांनी घातलेला जागर ऐकायला ते जातात.ती संपूर्ण दुबळ्या कोंडूची कथा संवाद रुपात मांडलेली आहे.संध्याकाळच्या वेळी गावच्या पटांगणात बसून खेड्यातले लोक कथा ऐकत असतील तेव्हा आपल्याच जीवनाचे प्रतिबिंब त्यांना दिसत असेल.
'गाठोडे'या कथेत अबोल बळीराम कोष्टीचे व्यक्ती चित्रण रेखाटले आहे.शांततेत एकटाच शंकराच्या देवळाच्या पायरीवर बसून असतो.कुणी जेवायला बोलावलं तरी न बोलता जेवून परत माघारी येतो.दसऱ्याला फक्त त्याला नवी कापडं आणि सैलीच्या घरी जेवायला मिळतं.हे सांगायचे कामही घरगडी झेल्यालाच करावं लागतं.जेव्हा सैली आजारी पडून मृत्यू पावते.हे झेल्या बळीरामला सांगतो.मग तो गाठोडे खांद्याला लावून ओढ्याच्या काठाकाठाने जातो. थोडं पुढे गेल्यावर ते गाठोडे झेल्याला देतो.आणि कुठं जातोस विचारल्यावर तो आभाळाकडे तोंड करत, 'बायकोकडं' म्हणतो.आणि तसाच पुढे चालत जातो.झेल्या तिथंच थांबून कुतूहलाने तो गाठोड्याच्या गाठी सोडतो.तर त्यात जुनी कुजकी फडकी चिंध्या असतात.
'तालमीचे उद्घाटन'ही कथा बनगरवाडी कादंबरीतील शाळामास्तर राजाराम विठ्ठल सौंदणीकर याने शाळा उभारताना आलेल्या अडचणींना तोंड देऊन शाळा कशी उभारली याची कथा आहे.आधुनिक संस्कारापासून सर्वथा दूर असणाऱ्या खेड्यात चलनवलन करण्याचा प्रयत्न मास्तरने कसा केला आहे.बलोपासनेसाठी तालीम बांधण्याचा विचार भोळ्याभाबड्या लोकांना पटवून देणे. त्यांच्या कडून सहकार्य मिळविणे.सामाजिक जीवनात चैतन्य कसे निर्माण झाले यांचे तपशीलवार वर्णन उत्कृष्ट रीतीने केलेलं आहे.
एकंदर सर्वच कथांचे रसग्रहण करताना माणदेशी आणि शहरी जीवनातील व्यक्तींचे विविध पैलूंचे दर्शन घडते. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती समजते. सुंदरअक्षरशिल्पात कथांचे साजेशे रसभरीत वर्णन केले आहे.सर्वच कथा वाचनिय आहेत.
✒️परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🍁📖🍁📖🍁📖🍁📖🍁📖🍁📖🍁
Comments
Post a Comment