पुस्तक परिचय क्रमांक-६१ धिंड






वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-६१

 पुस्तकाचे नांव--धिंड

 लेखकाचे नांव--शंकर पाटील

प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण सप्टेंबर २०१८

एकूण पृष्ठ संख्या-१३०

वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--कथासंग्रह

मूल्य--१३०₹

------------------------------------------------

महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्तिचित्रांतून वेध घेणारे पटकथाकार, जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार 

शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण आणि खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.ऐकायला व वाचायला मिळतात.नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते बारकाईने व  चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात.


कथा,कादंबरी,वगनाट्य, चित्रपट पटकथा या सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.ऊन, खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला, धिंड,पाऊलवाटा यासारख्याअनेककथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे.

त्यातीलच सन १९६२ साली प्रसिद्ध झालेला शंकर पाटील यांचा 'धिंड' हा कथासंग्रह.सह्याद्री दूरचित्रवाणी वाहिनीवर ''सोनपावलं"या कथामालिकेत ही टायटल कथा 'धिंड' टीव्हीवर पाहिली होती. ते कथा  वाचताना लक्षात आली.


यात राऊ खोताची अफलातून भूमिका विनोदी कलाकार सुनील तावडे यांनी केली होती.धिंड या कथासंग्रहाला डॉक्टर भालचंद्र फडके यांची प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात की,''शंकर पाटलांची कथा मराठी कथेचं एक देणे आहे.

त्यांचे मन संस्कारक्षम आहे.केवळ ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे एवढाच त्यांचा हेतू नसून केवळ लोकप्रियतेसाठी गावरान किस्से सांगून रसिकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणे एवढाच त्यांचा हेतू नसून त्यांची कथा म्हणजे आत्मशोधाचे साधन आहे.लेखनामागे खेडेगावातील सामाजिक जाणीव आहे.तसेच मूल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेचे चित्रण ते आपल्या कथेतून बेगडी परिवर्तनाचेव्यंगचित्रण करत आहेत."


कथा निर्मितीमागे ध्यास आहे.सुक्ष्म निरीक्षण आहे.वास्तवतेत घडणारा संवाद आहे.गप्पा चर्चेतील संभाषण आहे. चिंतनाच्या डोहातूनच तीचा जन्म झाला आहे.मराठी कथेला ऐश्र्वर्याचा लाभ दिला आहे.मौखीक प्रसिध्दी देणाऱ्या शाळा, शेत, चावडी,देऊळ आणि गाव या ठिकाणी घडलेले संभाषण सहज सुंदर शब्दात गुंफले आहे.यातील ग्रामीण लकब आणि  कोल्हापूरी बोलीभाषेचा वापर रसदार आहे.कथेचा रसास्वाद घेताना हास्याची लकेर चेहऱ्यावर आपोआप उमटते.इतकं कथेचं गोष्टीरुप लेखन रसदार आहे.


 शंकर पाटील ह्यांच्या ग्रामीण कथा विनोदी आणि हसता हसता रडवणाऱ्या असतात ज्यांना ग्रामीण कथेत अधिक रस आहे त्यांच्या साठी ही पुस्तके पर्वणी आहेत.ग्रामीण भाषेचं सौंदर्य अनुभव त्यांच्या कथा वाचन व श्रवण करताना होतो. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिंचा स्वभाव व शरीरयष्टीचे वर्णंन अस्सलपणे करतात.त्यामुळे प्रत्यक्ष घटना-प्रसंग डोळ्यासमोर तराळतात.त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही. 

        त्यांच्या सर्वच कथा बहारदार इरसाल आणि मिश्किली रुपातल्या आहेत.त्या रसग्रहण करताना सामाजिक प्रश्न, प्रथा,परंपरा,आणि चर्चा यांचा उहापोह होतो.

वाचताना हसत हसत आपणाला त्यातील सामाजिक जाणीव समजते.'धिंड' या कथासंग्रहात एकूण अकरा कथांचा समावेश आहे.धिंड,पाळणा,देशी उपाय, अडसर, तक्रार, तमाशा, पाहुणचार,वाघ गावात येता,चकवा, येणार येणार ,दोन बायकांचा दाल्ला अशा एकास एक सरस करांची मालिका धिंड मध्ये आहे.


     धिंड या कथेत १५ऑगस्टच्या मुहूर्तावर सगळ्या गावाने उद्या पासून -कोण दारु पिईल त्यांची गाढवावरनं धिंड काढायची असा ठराव पास केला होता.कोण सापडतोय ,कोणाचा पहिला नंबर धिंड काढाय लागतोय याच्या पाळतीवर अनेकजण लक्ष ठेवून होते.अन् 

अचानकपणे वीस तारखेला राऊ खोत तावडीत सापडला होता.त्याने दारु पिल्याची बातमी चावडीवर येऊन धडकली.गावातल्या गल्लीबोळातूनत्यांची धिंड काढायला हजर राहण्याची दवंडी तराळाने दिली.चावडीत त्याचा कज्जा (खटला) मिटिंग सुरू झाली.तिचे आणि दिंडीचे प्रत्यक्ष वर्णन खुमासदार शैलीत गावकऱ्यांच्या संभाषणात व्यक्त केले आहे.वाचताना तोंडावर हास्य उमटते.डांग टिक टाक टिक डांग टिक टाक च्या चालीवर  घुमणारी हलगी आणि लेझीम सुरू होते.चेव आल्यागत लोकं धिंडीत कशी नाचत होती.तसेच रात्रभर चाललेल्या या धिंडचे वर्णन अफलातून भाषेत केले आहे. 


पाळणा या कथेत रुंजाजी आणि त्यांचे मित्र कुटूंब नियोजनाचे आॅपरेशन करणार आहे.हे लोकांनी त्याच्या बापास देवळात सांगताच खरं खोटं करण्यासाठी घरी येतो.कारभारणीला यांचा जाब विचारते.तर ती पोरांनो काय केलं ते उलगडून सांगा असे म्हणते.आणि तो सगळ्या चुलत्यांपुढे हा प्रश्न उभा करून पोराला समज द्यायला सांगतो.अशा पाळणा या कथेचं गोष्टीरुप लेखन वाचताना प्रसंग डोळ्यासमोर चाललाय असं वाटते.छोटे कुटुंब सुखी कुटुंब नियोजन करताना कसे वडिलधारी मंडळी बोलतात याचं चित्रण या कथेत उभारले आहे.


'देशी उपाय'या कथेत बायकोच्या दुखण्याने त्रस्त झालेला रामा तिरपुडे अनेक वैद्य आणि डॉक्टर कडे पत्नीला घेऊन जातो.तरी फरक पडत नाही म्हणून ती म्हणते मला पुण्याच्या डॉक्टरकडे दाखवायला घेऊन जा,असालकडा लावते.तो रागावतो.तदनंतर तोच आजारी पडल्याचं सोंग करतो.तेंव्हा त्यांचे मित्र उपाय करताना वैद्य आणि डॉक्टर यांचे आलेल्या अनुभवी किस्स्यांचे यथार्थ वर्णन शब्दसाजात सजविले आहेत.वाचताना हास्याची पुरेवाट होते.


नवरा बायकोच्या नात्यात अडसर आणणारी आई आणि मुलाची 'अडसर'कथा मार्मिक आहे.लग्नात सूनेच्या माहेरच्या मंडळींशी बिनसलेले असते.ते काय क्षमा मागत नाहीत.पत्नी सहवासासाठी मुलाने केलेल्या युक्त्यांचे वर्णन गावरान भाषेत मांडले आहे. आपला मुलगा बंडा आठवीच्या परीक्षेत नापास झाला म्हणून मुख्याध्यापकांच्या घरी  जाब विचारायला गेलेल्या सुबरावच्या चेहरेपट्टीचे वर्णंन अफलातून केले आहे.


मुख्याध्यापक आणि सुबराव यांच्यातील संभाषण वाचताना  हजरजबाबीपणाने कसे तोडीसतोड उत्तरे देतात.काहीही करा पण माझ्या मुलाला पास करा नाहीतर मी पंचमंडळीपुढे तुम्हाला उभं करीन.की ज्या पंचमंडळींना अक्षरांचा गंध नाही.अशी 'तक्रार'कथा आहे.

शेतातल्या खळ्यात राखण करणारे तीन गडी गावच्या जत्रेदिवशी असणारा तमाशा बघायला जाण्यासाठी काय काय गमतीजमती करतात.अटकळ करतात.याचे अस्सल वर्णन तमाशा कथेचा रसास्वाद घेताना हास्याची कारंजी उडतात. 


प्रत्यक्ष कथाकथन ऐकताना किती मजा येत असेल याची प्रचिती येते.पाहुणचार कथा म्हणजे तर गावातील शेतकऱ्याचे आपल्या घरी मुलाला शिकविणाऱ्या मास्तरांना दिलेलं निमंत्रण.त्याअनुषंगाने वसंताच्या वडिलांनी (अण्णांनी) अंघोळ ,मळा बघणं,भोजन आणि न्याहरी करण्यासाठी मास्तरांना केलेल्या आग्रहाचे आणि संभाषणाचे वर्णंन खुमासदार शैलीत केले आहे.भूपाल अण्णांच्या घरी पहाटेचा वाघ घरात घुसला.आणि मग त्यानंतरची चित्तरकथा अफलातून भाषेत मांडली आहे.


गावकारभाऱ्यांनी चेष्टेने विचारलेल्या प्रश्नांना तेवढ्याच वास्तवतेने उत्तर देणारे अण्णा.

शंभरजणांना सांगून सांगून वैतागलेले असतात. टेहळणी करणारे बंदूक धारी पाटील, वाघाबरोबर कुस्ती खेळायला उत्सुक झालेला पैलवान आणि तलाठी यांचे संभाषण संवाद वाचताना हास्याच्या ऊखळ्या फुटतात.असं रसदार वर्णन वाघ गावात येतो या कथेत केले आहे.


खेड्यातल्या एका द्विशिक्षिकी शाळेत शिक्षण  भागाधिकारी शाळा तपासणीला येणार हे लखोट्यातील पत्र वाचताच कुंभार गुरुजी आणि बकरे गुरुजींची होणारी तारांबळ, अस्वस्थता आणि शक्कला सहज सुंदर समर्पक शैलीत चकवा कथेत शब्दबध्द केली आहे.पावसाळ्यातील झडीच्या दिवसात पोटाला अन्न मिळावे म्हणून सावकाराच्या घरावर चिठ्ठी लावायचे काम.आणि दरोडा पडेल म्हणून रात्रभर राखणीसाठी वाड्यात राहायला गेल्यावर जेवायला मिळेल.अशा घटनाप्रसंगाचे वास्तव वर्णंन दिसते.


तसेच गावकुसाबाहेरील वंचित समाजाला पोटभर अन्न मिळवण्यासाठी काय दिव्य करायला लागते.हे हसत हसत काळजाचा ठाव घेते.हे येणार येणार कथेतून उलगडत जाते.दोन बायकांचा पती झाल्यावर होणाऱ्या संसाराची कथा दोन बायकांचा दाल्ला या कथेत पतीची अस्वस्थता आणि दोघींचा कलह व दुस्वास दिसून येतो.अशा सरस कथांची मांडणी धिंड या कथासंग्रहात गुंफण केलेली आहे. व्यक्तिंचे चित्रण खुमासदार शैलीत मांडले आहे.मराठमोळी भाषा या कथांतून गतिमान करुन समृध्द करण्याचं कामं ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांनी केले आहे. मिश्किली कथांतून गावाची सामाजिक जाणीव उलगडते.अप्रतिम कथासंग्रह आहे.


#श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


दिनांक-२५सप्टेंबर २०२१


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड