पुस्तक परिचय क्रमांक-६३ नटरंग
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६३
पुस्तकाचे नांव--नटरंग
लेखकाचे नांव--आनंद यादव
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण सप्टेंबर २०१९
एकूण पृष्ठ संख्या-२००
वाङमय प्रकार --कादंबरी
मूल्य--२३०₹
📖📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚
कागल गावचा गुणा,ऐका त्याची कहाणी
रांगडा त्याचा बाज , आगळं हुतं पाणी
कौतिक सांगू किती,पठ्ठ्या बहुगुणी,
अंगी हुन्नर,डोसक्या मधी झिंग,
पैलवानी तोरा त्याचा, रुबाब राजावाणी..
या गाण्याने गुणा कागलकराची कथा 'नटरंग'मराठी सिनेमात कथानक पुढं सरकते. 'झोंबी' आत्मचरित्राचे चतुरस्त्र साहित्यिक आनंद यादव लिखित 'नटरंग' या कादंबरीचा चित्रपट निर्माण झालेला आहे.यातील गाणी आणि स्टोरीही सुपरहीट होऊन मराठी सिनेजगतातील हा सिनेमा सुवर्णाची मोहर उठावदार करणारा ठरलाय.
नटरंग कादंबरीचे लेखक प्रतिभासंपन्न लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावचे. साहित्यातील चौफेर क्षेत्रात त्यांनी आपल्या लेखणीने रसिक वाचकांना भुरळ घातली आहे.ग्रामीण कलावंताच्या आयुष्यातील व्यथा, वेदना आणि सुख-दु:खं त्यांनी कथा- कादंबरीतून जगासमोर मांडली आहेत. त्यांच्या साहित्यकृतीस साहित्य अकादमी व राज्य सरकारचे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अनेक लिखित माध्यमांनी कल्पक ,कलात्मक समिक्षणात्मक अभिप्राय दिलेत.साहित्य विश्र्वातील अव्वल दर्जाची कादंबरी.तमाशा कलावंतांच्या आयुष्यातील व्यथा वेदनांच्या शोकांतिकेचे दर्शन या पुस्तकातून घडते.पुस्तकातून पडद्यावर... लेखक तमाशा….नाटक….. शेवटी चित्रपट आधी वैताग….आता समाधान.एखादी लोकप्रिय कादंबरी चित्रपटात रुपांतरीत होऊन पडद्यावर अवतरते… 'माध्यम बदला'चा हा किचकट प्रवास नेमका कसा घडतो…
त्या पटकथेची 'नटरंग'कादंबरी कलात्म व शोकात्म अव्वल दर्जाची आहे.प्रसंगांना चित्रासारखे आकार देऊन तमाशातील पात्रांना रसपुर्ण बनविले आहे.कथानकातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची त्यांची क्षमता अत्युच्च कोटीतील आहे. याचा रसास्वाद घेताना मन व्यथित करत काळजाला हात घालतो.अस्सल आणि हुबेहूब वर्णन केलेले आहे.
नटरंग कादंबरी ते सिनेमा या लेखात किर्ती मुळीक यांनी समर्पक शब्दात या लोकप्रिय अक्षरशिल्पाचे आणि सिनेमा निर्मितीचे गुपित सारांंशाने उलगडून दाखविले आहे.'नटरंग' या कादंबरीचे कथानक पूर्ण काल्पनिक असून ते लेखकाच्या मनातील आहे.कलाकृती हे कलावंतांच्या मनात जीवन जगताना उमटलेल्या अनेक ठशांचे रुप असतं.कागलच्या गैबीच्या उरुसाचा उमटलेला ठसा,'नटरंग' या कथेतून आकाराला आलाय.हे लेखक सांगतात.पोटाची भूक भागविण्यासाठी रोजचं जगणं सुरु ठेवावे लागते.नवी स्वप्न उराशी बाळगून ध्येयासाठी कष्ट करताना अनेक. अडीअडचणींना तोंड देत आव्हाने स्विकारताना केलेला संघर्ष या कथेत अस्सल जिवंतपणा दृष्टीस पडतो.
'नटरंग' या कादंबरीचा नायक गुणा हा उपेक्षित मातंग समाजातील तरुण कलावंत.कुस्तीचं मैदान गाजविणारा, थोडाफार शिकलेला पण परिस्थितीनं दुसऱ्याच्या (शिर्पतीच्या) शेतात कामकरी म्हणून मोलमजुरी करीत असतो.कुटूंबासाठी राबणारा तो एकटाच असतो.पण तो तमाशा बघायचा नादीक असतो.तुटपुंज्या मिळणाऱ्या आठवड्याच्या पगारात घरखर्च आणि तमाशाचा नाद भागत नाही.त्यामुळे तो वैतागुन जायचा.गुणाचे आई-वडिल,बायको दारकी आणि मुलं राजा दया माया रंजा त्याचा भाऊ यशवंता सैन्यात बेपत्ता झालेला होता.त्यामुळं गुणांचे वडील बाळू नेहमी गुणांची हिडीस फिडीस करायचा.शिव्यांची लाखोली वाहून हजामत करायचा.कारण गुणाचं तमाशाला जाणं त्याला आवडायचं नाही.सतत तो लिंबाच्याबुडी बसून चिंतामग्न असायचा.घराचा कर्ताधर्ता गुणा.
त्याने शेतात मजूरी करावी.बायकामुलांना बघावं,आईबापाचं म्हातारपण जपावं.आणि घरातल्यांची इज्जत राखावी असं गुणाच्या बापाला सतत वाटायचं.शेतात राबून काय मिळकत होत नाही याची रात्रीच्या गप्पा झोडताना सगळ्यांना विवंचना व्हायची.कामधाम,चोऱ्यामाऱ्या, सिनेमा आणि तमाशा यांवर चर्चा चालायची.त्यातच चार पैसे मिळवण्यासाठी तमाशाचा फड उभारायचा मनसुबा सगळ्यांच्या पुढं मांडतो.शेतात काम करताना, चालताना आणि निवांतपणे बसताना त्याच्या पुढं गैबीच्या जत्रेतला तमाशातील पात्रं मनपटलावर उमटायची आणि तो त्यात रंगून जायचा.
मग जन्माचं पांग फिटेल.तमाशातून बऱ्यापैकी पैसा मिळेल या आशेने एके दिवशी नानांच्या गोठ्यात तमाशाचा फड उभारण्यासाठी कुलदैवत खंडोबाची आणाभाका घेऊन भंडारा उचलतात.आणि रात्रीचं गैबीच्या दर्ग्यात जावून शपथ घेतात.नानाच्या गोठ्यातच तमाश्याची तालीम सुरू होते. वादन साहित्य मिळवायला पैश्याची जुळवाजुळव सुरू होते.गुणा शेतात काम करत करत वग आणि लावणी रचत राहतो.ऊसाच्या फडाकडं बघत मनात पाखरं भिरभिरु लागतात.तेंव्हा शब्द पाडसासारखे उड्या मारु लागतात.मग गुणा ओळी जुळवत,घोळवत रचत राहतो.
चाली बांधत घोकू लागतो.
शेतीतल्या त्याच्या रोजच्या कामाचे वर्णंन अस्सल कोल्हापुरी अलंकारिक साजात सुक्ष्मपणे केले आहे.वाचताना याची प्रचिती पानोपानी येते.अप्रतिम ग्रामीण बोलीचे सौंदर्य आणि चपखल शब्दांची पखरण केलीय.अप्रतिम कादंबरी
गुणा तमाशाच्या नादाला लागलाय म्हणून त्यांचा बाप आणि बायको नेहमी वादंग माजवितात.भांडण करतात. शिव्या घालतात पण गुणा फड उभारण्यासाठी पुढचं पाऊल टाकत असतो.त्याला तमाशाची थोडीफार माहिती असलेल्या पांडबाची साथ मिळते.नाचायला यमुनाबाईच्या मुली नयना आणि शोभना तमाशात नाचायला तयार होतात.पण तमाशात एक नाच्या (गणपत पाटील) यांच्या सारखा पाहिजेच तरच तमाशाला चांगले दिवस येतील.असं ती म्हणते.अनेकांना विचारल्यावर कोणीही त्याचे साथीदार तयार होत नाहीत.त्याची घालमेल होते.तमाशाचा फड मोडला जावू नये म्हणून पांडबाने सुचवल्यावर तो नाच्या व्हायला तयार होतो.नयना त्याला बाईसारखंं चालणं, नाचणं, मुरकणं अशी अदाकरी त्याला शिकविते.आणि मग गावच्या गैबीच्या उरुसाच्या जत्रेत पहिला शुभारंभाचा प्रयोग होतो.
पहिलाच प्रयोग रसिकांना फार आवडतो.गुणाच्या नाच्याच्या अदाकारीला रसिक प्रेक्षक टाळल्या वाजवून दाद देतात.पण गावात त्याच्या वाईट गुणाचीच चर्चा सुरू होते.बायको सासरा आणि बाप तमाशात काम करु नये म्हणून समजूत घालतात.पण तो ठाम नकार देतो.वतनदार घराण्याची अब्रु घालवली म्हणून बाप झाडाला फास लावून घेतो.
नयना शोभना कोल्हापूर व गुणा कागलकर यांचा तमाशा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला असतो.तो गावोगावच्या यात्रेजत्रेत गाजायला लागतो.तिकिटावरही तमाशाला गर्दी होत असते.तमाशा परिषदेत गुणाचा सत्कार होतो.
घराचं रुपडही गुणाने मिळालेल्या पैशातून बदलले असते.मातीच्या भांड्यांची जागा आता तांब्या- पितळेच्या भाड्यांनी घेतलेली असते. साधं झोपडं आता दगड मातीचं झालं होतं. घरावर कौलं आली होती.आता मुलं शाळेत जात होती.सगळ्यांना कपडालत्ता चांगला मिळत होता.खाणपिणं चांगलं होतं.पण त्याची बायको दारकी मात्र त्याच्यावर नाराज असायची.पैसा मिळतोय पण हा धंदा चांगला न्हाय.आपला नवरा आपल्या जवळ असावा असं तिला वाटायचं.वस्तीतल्या शेजारणी गरजू बायका उसनवार मागायला यायच्या.आणि नाही दिलं की,तिला काहीबाही बोलून सतत हिणवायच्या.
कला म्हणून गुणा नाच्याचं काम करुन कायमच तमाशाच्या खेळात कायम करत राहिला.इकडं नयनाही त्याच्या मनात घर करत होती.पण तिनं त्याच्या प्रेमाचा अव्हेर केला.ती पक्की व्यवहारी होती.'म्हातारपणी नाच्याच हालं,कुत्रही खाणार नाही.'असं ती म्हणाली.तेव्हापासून तो कुडत राहिला.मितभाषी झाला.कोपरवाडीच्या जत्रेत नाच्यासोबतच पुरुषधारी 'अर्जुन बृहन्नडेचा' हे नवे वगनाट्य सादर करत असताना अचानक नाच्याच्या नावाची आवई उठवून प्रेक्षकांनी गोंधळ घातला.स्टेजवर कल्लोळ माजला. मोरे आणि माने साहेबांच्या भांडणातून फड उधळला गेला. कनात,फड आणि तमाशाची गाडी पेटवून देतात.त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सगळं जळून जातं.गुणा नयना आणि शोभनाशी अक्रित घडतं.
त्यामुळे सगळ्यांची अवस्था काळीज करपल्या सारखी होते,पोटात खोल खड्डा पडतो.हातापायातील अवसान गळून पडते.या घटनेची सगळ्या पेपरात बातमी आल्याने त्यांची नाचक्की होते.मग उध्दवस्त झालेला गुणा गावी येतो तर घराला कुलूप लावून बायकोपोरांसह माहेरी निघून गेलेली असते.मग तो सासरवाडीला जातो.पण घरी माघारी यायला दारकी नकार देवून भांडते.सासराही सगळ्यासमक्ष त्याचा पाणउतारा करून भांडतो.मग गुणा कागलकर गावाकडच्या घरी येतो.घरातल्या अंधारात दार बंद करून स्वत:ला कोंडून घेतो.पांडबा येऊन त्यांची समजूत घालतो.'तुझी ही दशा व्हायला हीच कारण आहे.गुणा मला माफ कर.'असं म्हणून गुणाचं सांत्वन करतो.पण गुणा म्हणतो,मी आता एकटा आहे.
मी नाच्या हाय नाना,
माझी कला माझा जीव, नि मी तिचा शिव.
चैतन्याने रसरसावं तसा नसलेल्या घुंगराच्या ठेक्यात तो नुकत्याच उठून चाललेल्या प्रेतासारखंं तो पावलं टाकत निघाला.
उत्तरार्धात अतिशय भावस्पर्शी शब्दात गुणांच्या मनातील स्वप्नपुर्तीचा तमाशापट आणि त्यातील चाळातलं घुंगरु.त्याची लयबध्द बोली अप्रतिम शब्दलालित्याने गुंफली आहे.त्याचं आठवणं म्हणजे त्याच्या जीवनपटातल्या देवकिन्नराची कला कुणाला कळली नाही.मी मूळ स्त्री सादर केली.पण प्रत्यक्ष बाई असणाऱ्या दारकी,नयना यमुनाबाई यांना कळली नाही. नाना,पांडबा, इश्ण्या,शंकर,धामुड्यापाव्हणां,सद्या,मारुती,
किसना,जन्या आणि पब्या यांच्या साथीने फड उभा केला.हीच साधी माणसं रंगपटात भरजरी फटका, काटेवाडी धोतर परिधान करून राजा प्रधान होतात.बहारदार गण -गवळण- वग सादर करतात.दिलखेचक तालबद्ध नृत्य सादर करतात.पण कनातीत गेली की ही माणसं सामान्य होतात.अशा आगळवेगळ्या तमाशा कलेच्या पायी गुणाच्या आयुष्याची धुळधाण कशी उडाली यांची एक अस्सल कादंबरी 'नटरंग'होय.अप्रतिम लेखन शैली वाचक रसिकांवर गारुडी करणारी अन् कुतूहल वाढविणारी लेखणी.याच लेखणीने रंगवलेली कादंबरी,'नटरंग' अप्रतिम...
रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' सिनेमाही खूप गाजला.लोकप्रिय झाला. अतुल कुलकर्णीचा 'गुणा' आणि सोनाली कुलकर्णीची 'नयना'आणि किशोर कदमचा 'पांडबा' रसिकांच्या मनात चिरकाल स्मरणात राहीला.असा लोकप्रिय मराठी चित्रपट याच पटकथेवरील आहे.नटरंग कादंबरीचे लेखक प्रतिभावंत चतुरस्त्र साहित्यिक आनंद यादव यांच्या लेखणीला वंदन आणि मनःपूर्वक सलाम!
✒️श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
जबरदस्त
ReplyDelete