पुस्तक परिचय क्रमांक-५३ प्रिय बाई

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-५३

 पुस्तकाचे नांव--प्रिय बाई बार्बियानाची शाळा

 अनुवादक-सुधा कुलकर्णी

प्रकाशक-मनोविकास प्रकाशन, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम  १९७९ साली तर  पुनर्प्रकाशन २०१२ 

एकूण पृष्ठ संख्या-१३६

वाङमय प्रकार --- ललित

मूल्य--१२०₹

------------------------------------------------"


' लेटर टु अ टीचर'नावाच्या एका चिमुकल्या पुस्तकाने माझी झोप उडविली... जीवनात प्रत्यक्ष अनुभवांचे चटके बसायला लागले की लहान वयातही कसं एक विलक्षण शहाणपण येतं याचं प्रत्यंतर  हे पुस्तक वाचताना जागोजागी येतं….हा काही कवितासंग्रह नव्हे. तरीदेखील गेल्या वर्षात हे पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचलं.'' हा अभिप्राय साहित्यक्षेत्रातील चतुरस्त्र प्रतिभावंत पु.ल.देशपांडे यांचा आहे.


इटलीमधल्या एका खेड्यात राहणाऱ्या आठ गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला लिहिलेल्या या पत्रांचं एकत्रीकरण'Letter to a Teacher'या पुस्तकात केले आहे.मूळ इटालियन भाषेतील  पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर केले आहेत्याचा अनुवाद ''प्रिय बाई बार्बियानाची शाळा ''या छोटेखानी  पुस्तकात लेखिका सुधा कुलकर्णी यांनी केला आहे.सन १९६० सालातील शिक्षण पद्धतीचा उहापोह या पुस्तकातून उलगडत जातो.बरीचशी मुलं नापास झाल्यामुळे शाळेची पायरी न चढता  घरातील व्यवसायास मदत अथवा इतर कामे करतात.अशा मुलांनी इतर मुलांचे नापाशीने नुकसान होऊ नये म्हणून खाजगी वर्ग घेतले.'प्रिय बाई' हे पुस्तक रुपातील पत्रे वास्तवेचे दर्शन नापास झालेल्या मुलांनी व्यक्त केले आहे.


बार्बियाना हे काही शाळेचे किंवा गावाचं नाव नाही.इटली देशातील तुस्कानीमधल्या म्युगेल्लो विभागातल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीसेक विखुरलेल्या घरांच्या वस्तीची वसाहत होय.डॉन ऑरेंज मिलानी हे बार्बियानाच्या शाळेचे संस्थापक तिथल्या विखुरलेल्या शेतावरच्या मुलांची दुरावस्था त्यांच्या लगेच लक्षात आली.या मुलांसाठी शाळा सुरू केली.


  हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली.मोठ्या मुलांचा बराचसा लहानांना शिकवण्यात किंवा झालेल्या अभ्यासाची उजळणी करण्यात जायचा.आपल्या आयुष्याशी निगडित असलेले प्रश्न समजून घेऊन त्याचा अभ्यास करण्या करता सगळेजण वेळ द्यायचे.त्यातून चांगलं शिक्षण मिळण्यासाठी शाळेतल्या आठ मुलांनी हे पत्र लिहून काढलं.


 बार्बियानाच्या माजी विद्यार्थ्यांनी, मिनानीच्या

मित्रमंडळांनी आणि रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून रीतसर एक"दोपोस्कुओला"शाळा उघडली. ही शाळा म्हणजे प्रशस्त खोली आहे.एक फळा खडू पुस्तके आणि बरेचसे स्वयंंसेवक..एकच पाच तास चालणारी शाळा.या पुस्तकात शाळा सुटल्यानंतरचा वेळ अभ्यास न समजलेल्या मुलांकरिता कसा उपयोगात आणायचा त्यावर भर दिला आहे.

 

खेड्यात राहणाऱ्या या गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला लिहिलेल्या या पत्रांनी असंख्य वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. इटली आणि इतर देशांतही त्यांचं फार नांव झाले आहे.अर्थातच पुस्तकाला लोकप्रियता लाभली ती नि:संशय त्याच्या आशयामुळे, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नाजूक वर्मावर नेमकं बोट ठेवल्यामुळे. इटलीत मध्यमवर्गाकरिता म्हणून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये बदल झाला पाहिजे.अशी तीव्र मागणी मोठ्या प्रमाणात समाजात निर्माण झाली.याचे प्रत्यंतर गेल्या काही वर्षांत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे लक्षात येते,असं मत अनुवादक लेखिका सुधा कुलकर्णी यांनी "माझं काम पोस्टमनचंं!" या लेखात केले आहे.


  इटलीतील मुलांनी प्राथमिकची पाच वर्षे आणि माध्यमिकची तीन वर्षे सक्तीने पूर्ण करावीत लागतात.वयाच्या १४वर्षानंतर हव्या त्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची निवड करता येते.विद्यार्थ्यांना नापास करु नये. मुलांचे बोलकं मनोगत रोखठोक आणि टवटवीत आहे.या मुलांनी शिक्षणपद्धतीतील दोषांचा ऊहापोह वाचताना आपण अंतर्मुख होऊन जातो. या पत्रांचं एक वेगळेपण म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन आणि कोवळ्या वयातल्या कडू अनुभवांच्या उपक्रमांनी आलेलं डोळस शहाणपण या पत्रातून दिसतं.


प्रिय बाई , तुमच्या बद्दल आणि इतर शिक्षकांबद्दल माझ्या मनात अनेकदा विचार येतात.की तुम्ही जिला शाळा म्हणता त्या संस्थेबद्दल आणि ज्यांना तुम्ही नापास करता त्या मुलांबद्दल विचार घोळतात. मुलं नापास झाली की पालक त्यांना  शेतीला जुंपतात नाहीतर कारखान्यात कामाला पाठवतात.नापाशीचा शिक्का बसलेली मुलं हिरमुसल्या 

मनानं शाळेपासून मुक्त होतात.दूर जातात .अशा मुलांच्या शिक्षणासाठी बाईंना पत्र पाठविले आहे.ते ही मुलांनीच.


या पुस्तकात काही मुलांची उदाहरणे दिली आहेत.

'गियानीला' तर तुम्ही तोंडी परीक्षा चालू असताना ,'तू खाजगी शाळेत कशासाठी जातोस?तुला तर धड बोलताही येत नाही.'म्हणून गियानीला शाळेतून तुम्ही काढून टाकलेत.याची जबाबदारी कोणाची? भाषेबद्दल भेदभाव न करता,बोलीभाषा बोलणाऱ्यांच्यात भेद केलात.


अॅंडरसन या मुलांच्या पदरी  अपयश का आले.याची कारणे शोधून त्यावर काय उपाययोजना करावी याची माहिती मुलांनी दिली आहे.एखाद्या मुलाला कविता गायन निटसे येत नाही परंतु तो जीवनातल्या व्यवहारी जगातल्या कितीतरी गोष्टीत पारंगत आहे.त्याला व्यवसाय, गावातील लोकांचे जीवन आणि पंचायतीच्या सभेतील माहिती अवगत आहे.तरीही त्याला परीक्षेतील उत्तरे येत नाहीत म्हणून तो नापास असं का?अशा मुलांच्या विविध पैलूंचा सोदाहरण स्पष्टीकरण या पत्रात मुलांनी सहज सोप्या भाषेत केले आहे.


सुदैवाने शिक्षणाचा कायदा पारित झाल्यामुळे अलिकडच्या वीसेक वर्षांत सर्वांगीण गुणवत्तेवर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दतीने आपण. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करता श्रेणी पध्दतीने मूल्यमापन करीत आहोत.म्हणजेच  सर्वसमावेशक दिव्यांग मुलांनाही नियमित शाळेत संधी उपलब्ध झालेली आहे.


परकीय देशातील सन १९६० दशकांच्या. पूर्वीची शैक्षणिक पध्दतीतील दोष त्याच पद्धतीने शिकलेल्या मुलांनी लिहिलेली पत्र वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत.. यावरून बदललेल्या शिक्षण पध्दतीची तुलना होते.मुलेही शिक्षणपद्धती विषयी सडेतोड विचार मांडतात हे लक्षात येते..

पूर्वार्ध, सुधारणा आणि उत्तरार्ध अशा मुख्यतः शीर्षकात पुस्तकाची विभागणी केली आहे. छोट्या मजकूरात सहज सुंदर सोप्या भाषेत लेखन केले आहे.आत्तापर्यंत अब्राहम लिंकनचे गुरुजींना पत्र पाठविलेले वाचले आहे.पण नापास झालेल्या मुलांनी शिक्षकांना पाठविलेले पुस्तक रुपातील पत्रं विलक्षण वाटतात.



@श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड