सेवा गौरव सौ राजश्री कुंभार मॅडम
सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
शुभचिंतनपर मनोगत
सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या…
आदरणीय सौ राजश्री संभाजी कुंभार मॅडम,
प्राथमिक शिक्षिका पदावरून सुरू झालेला आपला प्रवास
आज केंद्रप्रमुख पदापर्यंत यशस्वीपणे पोहोचून 31 मे ला आपण नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत आहात.
ही केवळ पदोन्नतीची वाटचाल नसून
कर्तव्य,प्रामाणिकपणा आणि शिक्षण सेवेच्या निष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे.
मॅडम आपण हिंदी विषयाच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक विजेत्या आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपले यजमान कुंभार सर म्हणजे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक.आपल्या सोबतीने शाळेत भेटीला आले की ते आवर्जून वर्गात जाणार अन् मुलांच्या
इंग्रजी ॲक्टिव्हिटी घेणारच…कुंभार परिवार म्हणजे शैक्षणिक कृतीशीलतेचा
दीपस्तंभ…
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रती असलेली ममता,
सहकारी शिक्षकांविषयी जिव्हाळा,
प्राथमिक शाळांविषयीची तळमळ
आणि प्रशासनातील समन्वय यामुळे
आपण सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेत.
आपल्या कुशल अध्ययन अनुभवाने निरगुडी, राजाळे, निंबळक, ढवळ, काशिदवाडी आणि सुरवडी येथील ज्ञानमंदिरांना एक नवी दिशा मिळाली. शिक्षकवृंदांच्या सहकार्याने शाळेच्या गुणवत्तेचा आणि स्पर्धा परीक्षेचे आलेख उंचावत गेला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देणारे आणि कलागुणांना प्रोत्साहन देणारे सहशालेय उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी यशवंत गुणवंत झाले. त्यापेकी बरेच विद्यार्थी प्रशासकिय सेवेत आहेत तर काही परदेशात मल्टिनॅशनल कंपनीत सेवेत आहेत तर काहीजण उद्योगव्यवसाय क्षेत्रात भरारी घेत आहेत.
आपल्या शैक्षणिक कार्यास फलटण पंचायत समिती, सामाजिक संस्था व सेवा केलेल्या गावातील विविध संस्थानी आदर्श शिक्षक पुरस्काराची मोहर उमटली आहे. निंबळक शाळेतील सत्यघटनेवरील बालनाट्य त्यावेळी गाजलं होतं.तसेच वर्ड बिल्डर या प्रकल्पात शुटिंग झालेली फिल्म्स इंग्रजी प्रशिक्षणात अनेक शिक्षकांना मार्गदर्शक ठरली.आपण इंग्रजी अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती रिसोर्स पर्सन म्हणून केलेलं कार्य शिक्षकांना प्रेरणादायी ठरलं.आपल्या कार्यकाळात योगासने, क्रिडा स्पर्धा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राविण्य मिळवून शाळेचे गावाचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे नावं उठावदार केले आहे.
🌺 मनोगत कविता 🌺
आदरणीय कुंभार मॅडम…..
खडू-फळ्याशी नाते जुळले,
ज्ञानदीप अखंड तेवत राहिला…
उपशिक्षिकेपासून केंद्रप्रमुखांपर्यंत
प्रवास सुंदर घडत गेला…
शिस्त, संस्कार, प्रेम, जिद्द
यांचा सुंदर संगम झाला,
आपल्या कार्याच्या तेजामधुनी
शिक्षणाचा दरवळ पसरला…
सेवेचा हा प्रवास आज
नव्या वळणावर येऊन ठेपला,
पण आपल्या कार्याचा ठसा
प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहिला…
आपल्या सेवानिवृत्तीच्या या भावनिक क्षणी आपणास निरोगी,आनंदी, समाधानी आणि दीर्घायुषी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
💐 आपली शिक्षणसेवा सदैव प्रेरणादायी राहील. 💐

Comments
Post a Comment