पुस्तक परिचय क्रमांक:२७३ क्षितिजगामी




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७३
पुस्तकाचे नांव-क्षितिजगामी
लेखक:नीता चापले 
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, मुंबई 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जून२०२५, प्रथम आवृत्ती 
पृष्ठे संख्या–२३२
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-३८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७३||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -क्षितिजगामी
लेखिका : नीता चापले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  ‘अनुभव हा महान गुरु’या विचाराला प्रमाण मानून बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या नीता चापले -भोयर यांनी ‘क्षितिजगामी’ एक प्रवास अपराजित जिद्दीचा या पुस्तकात  आयुष्याचे जीवनगाणे अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केले आहे.जणू काही त्या आपली चित्तरकथा इतरांना उलगडून दाखवत आहेत.या आत्मचरित्राचे ‘क्षितिजागामी’हे नाव सार्थ आहे कारण एक महिला क्रिकेटपटू म्हणून त्या घडत गेल्या.त्या अनंत ध्येयासक्तीच्या जोरावर. एक प्रथितयश क्रिडापटू व्हायला काय काय दिव्य करावे लागते याचे ‘चेस युअर ड्रीम्स’महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. स्वप्न जिद्द, संघर्ष आणि घरच्यांचे पाठबळ या जोरावर त्या शिक्षण घेत घेत उत्कृष्ट क्रिकेटपटू झाल्या.नागपूर विद्यापीठाच्या कर्णधार होत्या.असोसिएशन मधील अंतर्गत घटनानंतर क्रिकेटची खेळी थांबवून शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले.तदनंतर लेखिका इंजिनिअर नितीनशी विवाहबद्ध झाल्या.
   प्रदीर्घ कालावधीनंतर पुनश्च: खेळाकडे आकर्षित होते.महिला क्रिकेट अकॅडमी मेट्रोपॉलिटन सिटीत सुरू करुन नवनवीन राष्ट्रीय क्रिकेटपटू तयार करते.तदनंतर वयाच्या ४७व्या वर्षी वजन कमी करण्यासाठी जिम लावून सराव करत असताना वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करते. तदनंतर मागे वळून न बघता वयाच्या ५१व्या वर्षी फिटनेससाठी ॲक्वावॉक करत करत जलतरण क्षेत्रातही सूर मारुन राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून नावलौकिक मिळविते.शक्यतो एखादा क्रिडापटू एकाच क्षेत्रात भरारी घेतल्यावर संपूर्ण आयुष्य त्याच खेळासाठी वाहून घेतो.परंतू तर लेखिका नीता चापले यांनी एक नव्हे चक्क तीन क्रिडाप्रकाराची हॅट्ट्रिक करून क्रिकेटपटू,भारत्तोलनपटू आणि जलतरणपटू अशी बिरुदावली स्वकर्तृत्वाने मिळविली आहे.
  लेखिका नीता चापले या वाचन साखळी समूहाच्या विश्वस्त आहेत.त्यांनी क्षितिजगामी हे पुस्तक  पोस्टाने घरपोच पाठवले.अन् हक्काने विनंती केली की दादा, पुस्तक परिचय कर.

बॅटने चेंडूला फटका मारुन सीमापार करणाऱ्या,आपल्या वजनापेक्षा अधिक वजन पेलून भारत्तोलनमध्ये विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आणि  जलामध्ये सूरमारत क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या नीताताई यांच्या  जीवनप्रवासाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत देखणे आणि आकर्षक आहे.ध्येय,जिद्द आणि त्यामागील चिकाटी,सरावातील सातत्य अधोरेखित करणारे आहे.मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’ एका महिलेने मेहनतीच्या जोरावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझं सांभाळून घेतलेल्या भरारीची संघर्षमय कहाणी इतरांना प्रेरक ठरेल असा आहे.
साहित्य अकादमीचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे यांची या आत्मकथेला प्रस्तावना लाभली आहे. लेखिका तथा सहृदयी मैत्रिण डॉ.लीना निकम यांनी आत्मकथेला शुभेच्छापर नीता: आगळीवेगळी अन् जगावेगळी या लेखात लेखिकेचे अंतरंग, स्वभावविशेष आणि तिचा संघर्ष याचे विवेचन अतिशय समर्पक शब्दात केले आहे.
  नीता चापले -भोयर यांचे आजोबा किसनराव भुयार ता पवनी जिल्हा भंडारा येथील नामांकित मल्ल होते.पण मुलांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवले होते. त्यामुळे वडील व चुलते यांचे शिक्षण झाले.क्रिडापटू होण्यासाठी  व्यायामाचे बाळकडू आजोबांकडून तर जीवन व्यवहारातील कडक शिस्तीचे धडे वडिलांकडून गिरवले.आजी,काकाकाकी आणि मातेच्या मायेची ऊब लाभली.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे घेतघेत सातवीत असताना शिक्षक विरुध्द मुली असा सामना बघताना बीजे रोवली तर  रेशीमबाग क्रिकेट क्लब कडून खेळायला संधी मिळाली.माझे क्रिकटचे पहिले गुरु प्रशिक्षक  प्रफुल्ल लोखंडे यांनी माझ्यातले गुण हेरून मला संधी दिली.आणि सरावात सातत्य ठेवत जिद्दीच्या जोरावरच लेखिका क्रिकेटपटू झाल्या. 
आयुष्यातील घटना प्रसंग वास्तव आणि जसे आहेत तसे ठामपणे त्यांनी उभे केले आहेत.अगदी सुक्ष्मपणे त्यांनी त्यांच्या भोयर घरातल्या आजी-आजोबा, आई- बाबा,काका-काकी,बहिण भावंडे, मातुल घराण्यातील नातेवाईक,शेजारीपाजारी,शाळेतील शिक्षक,शिपाई, शाळेतील मैत्रिणी,क्रिकेटचे कोच,पती,मुले-मुली आणि क्रिकेट टीममधील खेळाडू आणि दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती यांच्या कारणपरत्वे स्वभावाचे अंतरंग सुक्ष्मपणे टिपून जस दिसले तसे,जसे बघितले , जसं पाहिलं तसे शब्दबध्द केले आहे.यातून त्या त्या व्यक्तिंची शब्दचित्र समोर दिसतात.
आत्मकथन करताना सलग कादंबरी सारखे लेखन न करता त्यांनी त्याचे लेख स्वरुपात मांडणी केली आहे. त्या लेखातील महत्वाच्या मजकूराचे शीर्षक दिले आहे.
यामुळे पुस्तक वाचताना आपणास गोष्टींचे वाचन करत आहे.याचा अनुभव येतो. काही घटना वाचताना आपणही उद्विग्न होतो.एखाद्या खेळात असंही घडतं हे खरं वाटत नाही.पण जसं आहे तसं त्यांनी 
आत्मकथेत रेखाटले आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगी उरात बाळगलेले ध्येय साध्य करण्यासाठी मळलेल्या वाटेने न जाता आपणच नवीन अनवटवाट तयार करून अडचणींना सामोरे जात यशाचे शिखर गाठले आहे.
ही कथा एका लढवय्या राष्ट्रीय खेळाडूची आहे.खेळाडू म्हणून घडणाऱ्या मुलांसाठी एक दीपस्तंभ ठरेल असं हे पुस्तक आहे. वाचणाऱ्याला उमेद,प्रेरणा अन् दिशा देणारी आत्यकथा आहे…

पुस्तक परिचयक:: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 

लेखन दिनांक- ३मे २०२६






Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी