पुस्तक परिचय क्रमांक:२७८ तू भ्रमत आहासी वाया





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७८
पुस्तकाचे नांव-तू भ्रमत आहासी वाया 
लेखक: व पु काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०११,पुनर्मुद्रण आवृत्ती 
पृष्ठे संख्या–८४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-९५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७८||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -तू भ्रमत आहासी वाया 
लेखक: व पु काळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश.वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारा दूत…..
—-व पु काळे 
सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असणाऱ्या अप्रतिम कथा गुंफणारे लेखक कथाकथनकार आणि उत्तम रसिक व पु काळे यांनी शब्दबध्द केलेली एक सुंदर कादंबरी ‘तू भ्रमत आहासी वाया’. 
ज्यांचं बोलणं ऐकत राहावं,अशा सौ सरोजिनी वैद्य, श्रीमती शांता शेळके,सौ वीणा देव आणि अरुणा ढेरे.स्पष्ट वाणी, नेमके विचार, योग्य विवेचन आणि निखळ प्रांजळपणा.या सगळ्याचा संगम यांच्या लेखणीतून उतरतो…त्या चौघींच्या प्रतिभेला ही कादंबरी अर्पण केली आहे.
साहित्यिक वामन देशपांडे यांची प्रस्तावना या कादंबरीचे आशयबीज अधोरेखित करुन मध्यवर्ती कल्पना समजावून देणे. त्यामुळे कादंबरीचा आस्वाद घ्यायला लावते.
“सुखी संतोषा न यावें|दु:की विषादां न भजावे|आणि लाभालाभ न धरावें|मनामाजी|”सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दु:खाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये.मनातल्या अंतर्मनातसुध्दा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत,हे सांगणारे संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर स्वतः तसे अनुभव सिध्द जगले आणि तसे ते प्रभावीपणे सांगू शकले.व पु काळे यांच्या लेखणीतून ‘तू भ्रमत आहासी वाया’मधील सायरा ज्ञानेश्वरीच्या याच ओवीत दडलेली नाही तर अशा कितीतरी आशयघन ओव्यांतले चिंतन प्रकट करते आहे,हे कादंबरी वाचताना जाणवते.कारण सायराच्या व्यक्तिमत्वाचा ज्ञानपायऱ्यांवरचा विकास 
आणि भक्तीची भगवी पताका सायराने स्वतःच्या जगण्यातून आणि बोलण्यातून व्यक्त करत शेवटी ओंकारनाथाच्या खांद्यावर इतक्या सहजपणे ही पताका दिली आहे हे वरील ओवीवरुन जाणवते.
ही सायरा म्हणजे वैचारिक परिपूर्णतेचा खेळ.नेहमीच्या त्रिकोणात अडकलेली प्रेमकहाणी नाही तर सोने जन्मल्यावर हिणकस भाग नष्ट होऊन शुद्ध सोने शिल्लक रहाते.असा अनुभव देणारी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाची एक समर्थ कादंबरी आहे.या कादंबरीतील व्यक्ती, प्रतिमासृष्टी आणि कथानक एकरुप झाले आहे.ही कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतिकार मात्र उमटत रहातात.अन् भारुन टाकणारी सायराच आठवत रहाते.जणू काही तलम रेशीमधागा मनात रेंगाळत रहातो.

अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दांत कादंबरीचे लेखन कथाकार व पु काळे यांनी केले आहे.

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई 
सातारा 
लेखन दिनांक- १० मे २०२६


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे