विनम्र अभिवादन सामाजिक कार्यकर्ते
ओझर्डे येथील स्वकुळ साळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व श्री. गणपत तुकाराम लटिंगे (वय ८४) यांचे वार्धक्याने व किरकोळ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. लटिंगे यांनी आपल्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाच्या जोरावर आयुष्यभर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली. वाई येथील अडत व्यापाऱ्याकडे त्यांनी अनेक वर्षे दिवाणजी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली. व्यवहारातील सचोटी, नम्रता आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांना सर्व स्तरांत मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
गावातील सोंगे उत्सव, यात्रा तसेच जिव्हेश्वर उत्सवामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहून गावच्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी योगदान देत असत. समाजातील युवकांना एकत्र आणणे, उत्सवांमध्ये सहकार्य करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी व अर्धकुशल काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा संसार उभा केला. कष्ट, प्रामाणिकपणा आणि संस्कारांची शिदोरी देत त्यांनी आपल्या दोन मुलांना चांगले संस्कारित केले. साधेपणा, मेहनत आणि माणुसकी ही त्यांच्या जीवनाची खरी ओळख होती.त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लटिंगे परिवारावर शोककळा पसरली आहे.
🌺 भावपूर्ण आदरांजली 🌺
आमच्या ओझर्डे गावातील स्वकुल साळी समाजाचे ज्येष्ठ, समाजहिताची जाणीव असलेले, साधी राहणी आणि माणुसकीची श्रीमंती जपणारे आदरणीय श्री. गणपतराव तुकाराम लटिंगे यांचे निधन ही आमच्या गावासाठी मोठी पोकळी आहे.
त्यांनी आयुष्यभर समाजकार्य, परंपरा आणि संस्कार यांना जपण्याचे कार्य केले. गावातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक उपक्रमात त्यांचा उत्साहाने सहभाग असे. त्यांच्या शांत, प्रेमळ आणि मदतीच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
माझ्यासाठी ते केवळ गावातील ज्येष्ठ नव्हते, तर आदर, संस्कार आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण होते. त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आणि समाजासाठीची तळमळ सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो व लटिंगे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
श्री मच्छिंद्र कोदे पोलिस पाटील, ओझर्डे



Comments
Post a Comment