पुस्तक परिचय क्रमांक:२७६ दुनियादारी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७६
पुस्तकाचे नांव-दुनियादारी
लेखक: सुहास शिरवळकर
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२०, सोळावी आवृत्ती
पृष्ठे संख्या–२८३
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-४५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -दुनियादारी
लेखक: सुहास शिरवळकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कॉलेज जीवनावर आधारित लोकप्रिय कादंबरी मैत्री,प्रेम आणि वास्तव जीवनाचा सुंदर आविष्कार‘दुनियादारी’ या कादंबरीत शब्दबध्द केला आहे.
महाविद्यालयीन तरुणतरुणींचे विश्व उलगडून दाखविण्याचे काम रहस्यमय कादंबरीचे लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांनी केले आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांची लाईफस्टाईल दिल दुनियादारी आणि दोस्ती हा मुख्य आशय घेऊन एका काल्पनिक कादंबरीचे लेखन केले आहे.कॉलेजविश्वातील मित्रमैत्रिणींचे अनुभव,लाईफस्टाईल,लव्हस्टोरी आणि
दुष्मनी ‘दुनियादारी’या कादंबरीत मांडले आहेत.ही कादंबरी वाचताना आपल्या कॉलेजच्या काळातील आठवणी रुंजी घालतात.इतकं सुंदर कथानक या कादंबरीत मांडलेले आहे.यावर दुनियादारी नावाचा सिनेमाही लोकप्रिय झालेला आहे.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-दुष्मनी, प्रेम- मत्सर, लव्हस्टोरी,गैरसमज अन् आनंद- दु:ख तसेच भावनिक नात्यांचा सुंदर मिलाफ शब्दांनी गुंफला आहे..ही जरी काल्पनिक कादंबरी वाटत असली तरी प्रातिनिधिक स्वरूपात सत्यकथाच वाटते.
कॉलेजमध्ये एकमेकांचे विचार पटणाऱ्या युवकयुवतींचा एक छानसा ग्रुप तयार झालेला असतो.एकमेकांसाठी काहीही करायला तयार असणारा हा कट्टा असतो.
मग इतरांशी खुन्नस निर्माण होतेच.त्या कॉलेजमधील जीवनाचे अंतरंग उलगडून दाखविण्याचे काम लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांनी केले आहे.
‘दुनियादारी’ ही केवळ कॉलेज कथा नाही, तर ती जीवनातील नाती, अनुभव आणि वास्तव शिकवणारी कादंबरी आहे.श्रेयस, दिगंबर,शिरीन,मीनल,सुरेखा, साईनाथ आणि नितीन या तरुणांच्या भावनांना अत्यंत जिवंतपणे मांडले आहे.पुण्यातील एस.पी.कॉलेज की जिथं एक कट्टा आहे.त्याचा आधार घेऊन काल्पनिक पात्रं आणि घटनांचा मिलाफ झालेला आहे.तो वाचताना प्रत्यक्ष घटना आपणासमोर घडतेय इतकं सुंदर लेखन केले आहे.सहज सुंदर आणि सोपी भाषा.
प्रस्तावनेत ते म्हणतात की, “स्वाभाविक कुतूहलापोटी झालेल्या अभ्यासातून जे जे निष्कर्ष हाती लागत होते.ते इतके प्रभावीपणे झपाटून टाकणारे होते की, कोणाही लेखकाला हे निष्कर्ष मांडण्याचा मोह व्हावा! हे जे सगळं क्षणाक्षणाने अभ्यासलं.कणाकणानं जमवलं,ते सगळं कोणालातरी सांगून मोकळं होणं.ही तेव्हा मानसिक गरज होती.या निकडीच्या गरजेतून ‘दुनियादारी’कादंबरीचे लेखन झाले.”याचा उल्लेख केला आहे.
दुनियादारीची जन्मकथा तीन भागात मांडली आहे. प्रत्यक्ष लेखक सुहास शिरवळकर यांचे महाविद्यालयीन जीवनातील अनुभव,कॉलेजमधील विशिष्ट गटातील मुलांचा प्रत्यक्ष सहवासातून मिळालेली माहिती आणि कादंबरी लेखनाला करायला लागलेला विचार. तारुण्याची मूलतत्त्वेच या कादंबरीत मांडलेली आहेत.त्यामुळेच सर्वच वयातील पिढ्यांना ती कथा आपलीच वाटते.या कादंबरीची खासियत म्हणजे बदलते रीतीरिवाज अन् बदलत्या फॅशन्स आउटडेटेड ठरवत नाहीत!!!
वाचनप्रेमी रसिकांनाआणि खेडं,गाव,शहर,नगर व महानगरातील तमाम ‘कट्टागॅंग्ज’ना ,ज्या दुनियादारी जगल्या…जगतात…. जगातील !अशा तरुणाईला हे पुस्तक समर्पित केले आहे.
“सुनाना मी चिन्हे मुश्किल
छिपाना मी जिन्हे मुश्किल…
जरा तूही बता ए दिला!
वो अफसाने कहॉं जाऍं….
वो भूली दास्ताॅं
वो फिर याद आ गयी|
नजर के सामने….
घटा सी छा गयी….!
आपल्या मित्रांची घराघरांतून नित्य घडत असणारी एक काल्पनिक सत्यकथा ‘दुनियादारी’... सुंदर पुस्तक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ६ मे २०२६

Comments
Post a Comment