पुस्तक परिचय क्रमांक:२७४ कथा स्वातंत्र्याची




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७४
पुस्तकाचे नांव-कथा स्वातंत्र्याची
लेखक: कुमार केतकर 
प्रकाशन-म.रा.पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१०  विशेष आवृत्ती 
पृष्ठे संख्या–३४५
वाड़्मय प्रकार-माहिती ग्रंथ 
किंमत /स्वागत मूल्य-७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७४||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -कथा स्वातंत्र्याची
लेखक: कुमार केतकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक समता, लोकशाही समाजवाद, विश्वबंधुत्व व विश्वशांती ही मूल्ये ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्रमात विकसित झाली. त्या राष्ट्रीय चळवळीचा महाराष्ट्राच्या संदर्भात घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कथा स्वातंत्र्याची’ग्रंथ होय. महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार श्री कुमार केतकर यांनी यातील माहिती संदर्भासह विश्लेषण आणि स्पष्टीकरणासह अधोरेखित केली आहे.इतिहास आणि नागरिकशास्त्र विभागाने, आशयसमृध्दीसाठी आवश्यक ते संदर्भ साहित्य शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून या पाठ्येतर ग्रंथाची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे यांनी केली आहे.
‘कथा स्वातंत्र्याची’ हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणांचा मागोवा आहे.
१८१८ ते १९४७ या १३० वर्षांच्या काळात घडलेल्या सर्व घडामोडींची किंवा ठिकठिकाणी झालेल्या विविध संघर्षांची नोंद संक्षिप्तपणे यात समाविष्ट केली आहे.
या काळात ज्या थोर व्यक्तींनी भारतीय जनतेचे नेतृत्व केले त्यांचे विचार आणि कार्य हाच या संशोधनपर ग्रंथलेखन प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होता.भारताचा स्वातंत्र्यलढा अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे.भारतीय जनतेने परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी दिलेला लढा.या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद आहे.या लढ्यात अग्रणी असलेल्या ‘हिंदी राष्ट्रीय काँग्रेस’ची स्थापना महाराष्ट्राच्या भूमीवर झाली. रणशिंगही महाराष्ट्राच्या भूमीवरुनच फुंकले होते.या इतिहासाचे लेखन करताना याचा भारताच्या राष्ट्रीय जीवनावर झालेल्या परिणामांचा विचार आणि घडामोडींचे निरुपम लेखक कुमार केतकर यांनी सतत केला आहे.हे पानोपानी दृष्टीस पडते.घटना आणि व्यक्तींचे कार्य संक्षेपाने पण मुद्देसूद मांडणी केली आहे. 
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण मंत्री श्री राम मेघे यांची प्रस्तावना या ग्रंथास लाभली असून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडाळाचे संचालक श्री एम आर कदम यांनीही विशेष आवृत्तीची प्रस्तावना लिहिली आहे. आकर्षक व आशयबध्द मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील लेखक कुमार केतकर यांच्या साहित्याचा आलेख मांडलेला आहे.

“अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता.आज त्याची पूर्ती, सर्वांशाने का नसेना, पण पुष्कळशा अंशाने आपण करीत आहोत. मध्यरात्रीच्या प्रशांतसमयी सारे जग झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध हा देश घेत आहे. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग असा प्रासाद उभारायचा आहे. दारिद्र्य, अन्याय, विषमता यांचा शेवट करायचा आहे”.……पंडित जवाहरलाल नेहरू 
लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकताच दिल्ली जल्लोषात न्हाऊन निघाली.तीच गोष्ट प्रत्येक छोट्या गावची प्रत्येक शहराची.
 पहिल्या भागात १८५७ च्या बंडाची माहिती…दुसऱ्या भागात सुधारणावादी विचारवंतांनी राबविलेल्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत समाजातील वैगुण्ये नष्ट करून समाजाला मानवी पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला.तर काहींनी सशस्त्र क्रांती घडवून आणली.तिसऱ्या भागात राष्ट्रीय काँग्रेसच्या झंझावाती काळाच्या इतिहासाची माहिती तर चौथ्या विभागात  राष्ट्रीय काँग्रेस, लोकमान्य टिळकांचे स्वराज्याचे कार्य,बंगालची फाळणी आणि सशस्त्र क्रांतीचा उठाव याबद्दलचे विवेचन संदर्भासह केले आहे.पाचव्या भागात राष्ट्रीय चळवळ व कामगार, महात्मा गांधी यांचे असहकार आंदोलन, महर्षी कर्वे यांचे स्त्रीशिक्षणाचे कार्य, महात्मा जोतिबा फुले यांचे लोकशिक्षण व सामाजिक कार्य, राजर्षी  शाहू महाराज यांचे कोल्हापूर संस्थानातील सामाजिक व शैक्षणिक कार्य तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चवदार तळे येथील आंदोलन याविषयी सविस्तरपणे माहिती दिली आहे.सहाव्या भागात महात्मा गांधी यांचे सविनय कायदेभंग चळवळ दांडी यात्रा,मिठाचा सत्याग्रह, नागपुरचे कॉंग्रेस अधिवेशन,शेतकऱ्यांचे मोर्चे याविषयी माहिती दिली आहे तर सातव्या भागात स्वातंत्र्य लढ्याचे अखेरचे पर्वातील घडामोडींची माहिती विषय केली आहे.शेवटी ग्रंथ सुची व घटना सुचली दिली आहे.
अतिशय समर्पक शब्दात घटनाप्रसंगी अवतरणे,काव्य आणि समर्पक उतारे दिलेले आहेत.चिकित्सकपणे सखोलपणे अभ्यास करून लेखक कुमार केतकर यांनी ‘कथा स्वातंत्र्याची’लेखणीबध्द केली आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २९ एप्रिल २०२६


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी