सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी









  व्याजवाडी केंद्र समूहाच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी जाधव यांच्या सेवा गौरव समारंभात धान्य व वही तुलादान आणि उपस्थितांचे स्वागत फुलझाडांचे रोपटे देऊन केले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक उपस्थितांनी केले.

  जाधव बाईंचे पिताश्री रघुनाथ कदम,पहिले शिक्षक सहकारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.बा.की. गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सौ. विजया कांबळे , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ.नकुसा देशमुख मॅडम, श्रीमती रोहिणी निकम मॅडम, श्री विलास पोळ आणि पती श्रीमान भानुदास जाधव यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला.यावेळी सुपुत्र श्री.रोहीत आणि संकेत, सूना मीनल व सौजन्या आणि नातवंडे यांच्या शुभहस्ते जाधवबाईंची धान्य,गुळ आणि वही तुला केली.
श्री बाबूराव गायकवाड,श्री प्रदीप फरांदे, श्री नारायण शिंदे,सौ.शारदा शिंदे सौ.मुक्ता शिंदे,सौ ज्योती नेमाडे,सौ.ललिता गायकवाड मॅडम आणि स्नुषा सौ मीनल जाधव यांनी गौरवपर मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तदनंतर वाई तालुका शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ ‘मानपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
वाई तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री विजय जाधव,माजी अध्यक्ष श्री सहदेव फणसे, माजी सरचिटणीस श्री दीपक वाघमारे,श्री भणगे सर,श्री नितीन फरांदे, शिवाजी शिंदे,प्रकाश रासकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रित्यर्थ व्यक्त होताना जाधव मॅडम म्हणाल्या की, ‘मेणवली,आसरे, अभेपुरी, खावली आणि व्याजवाडी शाळेतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे आणि कुटूंबाचे सहकार्य सेवा करताना लाभले.अडचणीप्रसंगी मैत्रिणींची मोलाची साथ लाभली.
प्रास्ताविक व स्वागत रोहीत जाधव व संकेत जाधव यांनी केले.आभार भास्कर पोतदार यांनी मानले.निवेदन श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी केले.
कार्यक्रमास आप्तेष्ट नातेवाईक शिक्षक मित्र परिवार सहेली ग्रुप उपस्थित होते.



             मानपत्र   

सौ.नलिनी भानुदास जाधव बी.ए.बी.एड
मुख्याध्यापिका जि.प.केंद्रशाळा -व्याजवाडी ता.वाई * प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व *
 देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे 
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती
वाळवंटातून सुध्दा स्वतिपद्मे रेखिती…निसर्ग कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या 'लावण्यरेखा' कवितेतील काव्यपंक्ती सौभाग्यवती नलिनी भानुदास जाधव मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख अधोरेखित करतात.
 आजच्या आधुनिक युगातील प्राथमिक शिक्षिका हे एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी मातृहृदयी व्यक्ती आहेत.ती केवळ शाळेतअध्ययन अनुभव देणारी नसून,एक मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी आसते.याच विचाराने आचरण करत असलेल्या मुख्याध्यापिका सौ. नलिनी भानुदास जाधव मॅडम नियत वयोमानानुसार ३३वर्षे११महिने सेवा करुन जि.प.केंद्रशाळा- व्याजवाडी ता.वाई येथून ३०जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
     कदमवाडी (ओझर्डे) येथील रहिवासी असणारे,श्री रघुनाथ कदम आपले पिताश्री.नोकरी निमित्ताने ते पुणे येथे स्थायिक आहेत.आपले इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले.तदनंतर १९८४ साली आपला विवाह गंगापुरी वाई येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक असणारे श्री सर्जेराव जाधवांचे चिरंजीव श्री. भानुदास यांच्याशी झाला.अन् आनंदी सुखी संसार सुरु झाला.पुढील काळात आपण केवळ गृहिणी न राहता डी.एड.च्या शिक्षणासाठी सासर व माहेरच्या संमतीने एथेल गार्डन,पुणे येथील अध्यापक विद्यालयात प्रवेश घेऊन गुणवत्तेच्या जोरावर दोन वर्षांनी शिक्षक पदविका उत्तीर्ण झालात.
१५जुलै १९९१ साली आपण मेणवली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा.तिथे सात वर्षे आपण उपशिक्षिका म्हणून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलेत.तदनंतर तुमची बदली पश्चिम भागातील केंद्र शाळा आसरे येथे झाली.तिथे नऊ वर्षे ज्ञानदान केलेत. तदनंतर अभेपुरी येथे आठ वर्षे सेवा बजावलीत.लोकसहभाग,शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम,क्षेत्र भेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबविताना दिलेली जबाबदारी सहकारी शिक्षकांच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडलीत.
पदवीधर शिक्षिका म्हणून खावली येथे पदोन्नती स्विकारलीत.तिथे चार वर्षे सेवा केलीत.तदनंतर आपली बदली व्याजवाडी केंद्रशाळेत झाली.तिथे आपण अध्यापनाचे कार्य करत,’मुख्याध्यापक’ पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारुन तिथे सात वर्षे सेवा केलीत. 
जाधव मॅडम आपण परिवारात आई,पत्नी, सून व बहिण यासारख्या भूमिका जबाबदारीने पार पाडत आहात.तर शाळेत विद्यार्थ्यांचे मनोविश्व समजून घेत, त्यांना प्रेमाने आणि सहनशीलतेने शिकवले. ज्ञानदानासोबतच मुलांमध्ये नैतिक मूल्यं, जीवन कौशल्ये, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण केलीत.जाधव मॅडम भविष्याचा वेध घेत वर्तमानकाळातील वास्तव जगात वावरणाऱ्या आहात. सचोटीने, निरपेक्षपणे आणि कर्तव्य परायणतेने सेवा केलेल्या प्राथमिक शाळेची गुणवत्ता संवर्धन करण्यासाठी शिक्षकवृंदांना सहकार्य केले आहे. 
मेणवली,आसरे,अभेपुरी,खावली आणि व्याजवाडी ज्ञानमंदिरातील अनेक सक्षम नागरिक घडविण्याचे महनिय कार्य आपण प्रामाणिकपणे केलेत.त्या विद्यार्थ्यांशी आजही आपला कायम गुरुशिष्याचा ऋणानुबंध जुळलेला आहे.मुलांच्या अभिव्यक्तीसाठी सदोदित प्रेरणा देणाऱ्या आहात.विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील अध्यापिका म्हणून आपले विद्यार्थ्यांच्यात अग्रगण्य स्थान आहे. लोकसहभागातून आपण शाळांचा शैक्षणिक दर्जा आणि भौतिक सुविधा उपलब्धतेसाठी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने विविध उपक्रमांची राबवणूक केलीत.अभेपुरी शाळेत आपण साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’या पुस्तकातील संस्कार कथांचे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कथापारायण केलेत.इन्स्पायर अवाॅर्ड उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमांची निवड विभागीय स्तरावर झाली होती.तर विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केलेल्या उपकरणांस तालुका स्तरावर तीनवेळा मानांकन मिळाले होते. 
आपल्या मैत्रिणींच्या मांदियाळीत आपली एक आगळीवेगळी ओळख आहे.आपल्या सहकारी शिक्षिकांचा सुखी संसार सुरु रहावा यासाठी अनेकदा आपण मदतीचा हात देत,समन्वयक म्हणून केलेले कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.  
आपल्या आजवरच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच वाई रोटरी क्लबने‘नेशन बिल्डर’पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच वाई तालुका प्राथमिक संघाच्या महिला आघाडीची धुरा समर्थपणे सांभाळलीत.  
कुटूंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी आपण प्राथमिक शिक्षिका झालात. पतीच्या सहकार्याने आपण दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केलेत.रोहित अभियंता असून संकेत बी.फार्मसी आहे.दोघेही त्यांच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. स्नुषा आणि नातवंडात आपण रममाण झाला आहात.आपणास पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!आपले जीवन आनंदमयी,निरामयी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!                       
सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या ! आपणास सेवापुर्ती सोहळ्यात वाई तालुका प्राथमिक शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक ‘मानपत्र’ देऊन गौरवताना विशेष आनंद होत आहे.सोमवार दि.३० जून २०२५ 
शब्दांकन:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई “”””””””””””””””””””””””””””””””””””””””””

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड