पुस्तक परिचय क्रमांक:२२० घरपण




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२०
पुस्तकाचे नांव-घरपण
लेखक:प्रा.आप्पासाहेब खोत
प्रकाशन-अजब पब्लिकेशन, कोल्हापूर 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २०१९
पृष्ठे संख्या–१४४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२०||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: घरपण 
लेखक:प्रा.आप्पासाहेब खोत
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
ग्रामीण माती, ग्रामीण शेती, ग्रामीण वास्तव परिस्थिती आणि ग्रामीण संस्कृत्ती या सर्वांचा वास्तवपूर्ण अविष्कार सुप्रसिद्ध कथाकथनकार प्रा.आप्पासाहेब खोत यांच्या कथांतून दिसून येतो.शेती मातीचा हुंदका आणि हुंकार त्यांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतो.या कथांच्या माध्यमातून यंत्रयुगातील बदलत्या खेडयापाडयाचे वास्तव दर्शन घडते.कथाप्रमाणेच लेखनाची हातोटी असणारे प्रा. आप्पासाहेब खोत यांनी स्त्रीप्रधान कादंबरी’घरपण’लिहिली आहे.
 पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या मनाचा आणि भावनेचा कोंडमारा कसा होतो. हे मुख्य बीज असणारी कादंबरी.
 ग्रामीण भागातील कोणत्याही गावचे प्रतिष्ठित घरंदाज तालेवार असणाऱ्या परिवारातील नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे पैलू आणि सामाजिक वास्तव यांचा समावेश असणारे शब्दचित्र ‘घरपण’या कादंबरीत सुप्रसिद्ध कथाकार प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांनी रेखाटले आहे.
पुरुषमंडळी नेहमीच महिलांपासून अनेक गुपितं लपवून ठेवतात.त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि ध्येयं नेस्तनाबूत करत असतात.त्यांच्या विचारांना कवडीमोलाची किंमत नसते.आणि मग अश्याच एका स्त्रिचं सत्व जागं झालं.अन् तिने कंबर कसून,घरावर आलेल्या संकटाला सामोरं जात पुरोगामी विचाराने तडजोड करत सगळ्या अघटित घटना आनंदात साजऱ्या केल्या.त्या घराची बेअब्रू वाचवली आणि घराचे ‘घरपण’ जपले.
 घराचं घरपण जपायचे असेल तर तडजोड करावी लागते.तडजोड करताना रुढी परंपरेचा विरुध्द माणुसकी जपताना भोगापेक्षा त्यागाची गरज असते. ही जाण फक्त शिक्षण आणि सुसंस्कारानेच येत असते.भविष्यातील आक्रमक आव्हाने पेलण्यासाठी काळाबरोबर प्रवाहात असणं हीच काळाची गरज आहे.स्त्रियांना व्यक्ति स्वातंत्र्य देऊन महत्वाच्या प्रसंगी तिचे विचार समजून घेणं आवश्यक आहे.कारण उंबऱ्याआड चार भिंतीतच तिचं एक घर असतं.कोणाच्या मनाला घरघर न लावता ती आपल्या घरट्याचं ‘घरपण’जपत असते.तिला एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.
उषादेवींची कन्या मुक्ता हिला न विचारता तिच्या लग्नाचा घाट रघुनाथराव घालतात.तिला तर पुढे शिक्षण घ्यायचे असते.पण परस्परच तिचे लग्न ठरविले असते.त्यामुळे मुक्त्याच्या मातोश्रीला तिचा लग्नाचा प्रसंग आठवतो.तिलाहीदहावी नंतर पुढे शिकायचे असते.पण तिचेही लग्न ठरवून टाकतात. त्यामुळे शिकायच्या आकांक्षेवर पाणी पडलेले असते.मुक्ताच्या शिक्षणासाठी ती  रघुनाथरावांकडे विनंती करते पण ते अजिबात बदलत नाहीत.
याचं विवंचनेतून त्या बेशुद्ध पडल्यावर त्यांना दवाखान्यात अॅडमिट करावे लागते.तिथे तिला बालमैत्रिण भेटते.जी डॉक्टर झालेली असते.
तदनंतर एकेक प्रसंग तिला समजतात. पतीचे दुसरं लग्न,मुलांवर विनयभंगाचे बालंट आणि मुक्ताचा होणारा नवरा बाहेरख्याली…अश्या अघटीत प्रसंगातून बाहेर कशी पडते?ते ही राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का न लावता सामोरी जाते.
सवतीला दुसऱ्या पत्नीचा दर्जा देते.तिच्या मुलाला घरातला हिस्सा देऊन भावाच्या मुलीशी लग्न ठरवते.मुलाचे लग्न प्रेम करणाऱ्या सारिकेबरोबर ठरवते.तर मुलीचे लग्न भावाच्या मुलाशी ठरलेल्या मुहूर्तावर करते.पती आणि मुलाने अगोदर घेतलेल्या निर्णयावर विचार करून जिल्हा परिषदेची निवडणूक लढायला सिद्ध होते….अशी ही घरंदाज स्त्रीच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारी कादंबरी ‘घरपण’.
ग्रामीण कोल्हापुरी भाषेत सहज सुंदर सोप्या शैलीत कादंबरीचे लेखन केले आहे.
खरंतर पुरुषप्रधान संस्कृतीला चिंतन करायला लावणारी कादंबरी आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक - १८ मे २०२५

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड