पुस्तक परिचय क्रमांक:२२२ अवघा तो शकुन
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२२
पुस्तकाचे नांव-अवघा तो शकुन
लेखक: डॉ.लीना निकम
प्रकाशन-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पहिली आवृत्ती २०२३
पृष्ठे संख्या–१६२
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-२२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव:अवघा तो शकुन
लेखक: डॉ.लीना निकम
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जीवनाचे तत्त्वज्ञान अभंगातून पेरणारे जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी, “अवघा तो शकुन,ह्दयी देवाचे चिंतन|”यातील अवघा तो शकुन या ओळीच्या नावाचे पुस्तक राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेत्या डॉ.लीना निकम यांनी प्रसिध्द केले आहे. अतिशय संवेदनशील मनाने आपल्या सहवासातील व्यक्तिंच्या आठवणी त्यांनी अलवारपणे शब्दांच्या फुलोऱ्यात सजवलेल्या आहेत.
एकेक फुलं म्हणजे एका व्यक्तिच्या अंतरंगाचा आविष्कार.अतिशय सहज सुंदर सोप्या लेखन शैलीत सुखदु:खदाच्या घटनांचा मागोवा रेखाटला आहे.
कृष्णधवल कॅनव्हासवर केशराच्या फुलाचे
रंगीत छायाचित्र आपलं सहज लक्ष वेधून घेतं.इतकं ते आकर्षक आहे.केशरातील परागकण हरेक पदार्थ लज्जतदार बनवतात.त्याचा गंध बनविलेल्या पदार्थात उतरतो.अन् तयार झालेल्या मेनूला सुगंधी करत, खाणाऱ्याला तृप्त करतो.तसेच या पुस्तकातील सगळे लेख रसिकांना गंधित करणारे आहेत.पुस्तकातील आशयाचे सौंदर्य मुखपृष्ठातून ठळकपणे दिसून येते.
‘लीनाच्या ललित लेखांमधील लाघव’,या प्रस्तावनेच्या लेखाचा वाचनास्वाद घेताना तर आपण मंत्रमुग्ध होतो.डॉ.सौ.प्रज्ञा आपटे यांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे. की एखाद्या जीवनगौरव सन्मानाचे वाचन रसाळ आणि लाघवी शब्दात लेखिकेच्या सहवासातील सहेली करत आहे.ललित लेखन ही एक कलात्मक अभिव्यक्ती असून तिची अनेक रूपे आपणास दिसून येतात. हसतखेळत मनोरंजक करत विचारांना चालना द्यायची.आत्मप्रकटन करताना जीवनदृष्टी रुजवायची. अलवारपणे वाचकांशी हितगुज साधत लेखातून भावभेट घडवायची.असं मत प्रस्तावनेत नमूद केले आहे.
लेखिकेचे सासरमाहेर फक्त शिक्षित नसून ते संस्कारक्षम आहे.आचरणशील आहे. ऋणानुबंधातील प्रेम , जिव्हाळा आणि आदरणीय आपुलकी जोपासनारं हे सद्शील कुटुंब आहे.जगणं कसं आनंदी करावे.हेच या सगळ्या लेखातून अधोरेखित केले आहे.इतकं अप्रतिम लेखन डॉ लीना निकम यांनी केल्याचे डॉ.आपटे आवर्जून नमूद करतात.
व्यक्तिचित्रणे,भावचित्रणे, साहित्यिकांची ऋजुता, परिवारातील सुखद अनुभव देणारे प्रसंग, नित्य परिचयाचे विषय, स्वता:च्या आकाशातील अंतरंग उलगडून दाखविले आहेत.सृजनशीलतेने वास्तवाचे भान राखत मधुरसात चिंब भिजवणारी लाघवी, रसाळ, मधाळ शब्दयोजना करत लेखनमूल्य वाढवले आहे.आणि ४० लेखांची शीर्षके तर अप्रतिम! संपूर्णतः आशय समर्पक शीर्षकात प्रकटतो.
मलपुष्ठावर साहित्य विहार संस्था, नागपूरच्या अध्यक्षा आशा पांडे यांचा ‘ब्लर्ब’ अवघा तो शकुन या हृदयातील मोरपीसांचा अलवार शब्दस्पर्श रेखांकित करणारा आहे.पुस्तक लेखनाचा प्रवास आणि त्यावरचे अभिप्राय लेखांचे सौंदर्य द्विगुणित करणारे आहेत.
निवेदन संचलन अथवा समालोचन करणाऱ्यांना तर हे पुस्तक म्हणजे संदर्भग्रंथच.किती सुंदर कोटेशन, परिच्छेद,समर्पक ओळी,उदाहरणे दाखले,
सुविचार मौतिके,उपमा आणि प्रतिके सगळंच अवर्णनीय…शब्दगंधाच्या मधाचे पोळे जणू.
लेखिका डॉक्टर लीना निकम यांच्या स्मरण आणि निरीक्षण शक्तीला तर कुर्निसात केला पाहिजे. इतकी समर्पक शब्दात त्यांनी त्यांच्या सहवासातील विचार पेरणारी अनुकरणशील व्यक्तिमत्त्वांची शब्दचित्रं आपल्या लेखणीतून साकारली आहेत.जणू काही कॅनव्हासवर रेखाटलेली चित्राकृतीच जणू. शब्दात जाण भरुन चैतन्य निर्माण करणारे सगळे लेख आहेत.
समारोपाच्या पृष्ठावर त्यांचा साहित्यिक प्रवास आणि पारितोषिकांचा आलेख गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा आहे.
मनमोराचा पिसारा या मनोगतातून त्यांनी
हे पुस्तक प्रकाशित करण्याचा इतिहास मांडलेला आहे.ऋणानुबंधात कायम रहात, लेखनाला प्रोत्साहन दिलेल्या ज्ञातअज्ञात
हातांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मऊसूत उबदार हातांची आजीची माया ‘आजी नावाच्या संस्कारपीठ’यातून दिसते.
आठवणींच्या कुपीतून दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध ‘बहरु कळियांसी आला.यातून‘वेलू गेला गगनावरीऽ’ज्ञानेश्वरांच्या सुरेख रचनेची आठवण मनी रेंगाळते.
पुरोगामी विचारांची ठेव अधोरेखित करणारी ‘एका वटपौर्णिमेचे गोष्ट.’
मातृत्वाचा पाझर मंगलमय स्त्रोतांत जतन करून ठेवलाय‘ती निघून गेली जरी.’या भावस्पर्शी लेखात.कोरोना काळातील रिपोर्ताज ‘झीरो मोगरा ते सुगंधी मोगरा’, प्रस्तुत केला आहे.मैत्रीचं नातं दृढमूल करणारा लेख‘मित्र म्हणजे गच्च भरलेलं आभाळ’.सेंद्रिय परसबाग फुलविणारं ‘टेरेस गार्डन’.कोरोना काळातील तळहातावर रोजीरोटी कमावणाऱ्या कष्टकरी श्रमिकांना मुक्तहस्ते जेवण देणाऱ्या दीनबंधू संस्थेचे मानवतावादी कार्याची ओळख करून देणारा ‘श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती’.हा लेख वाचून त्रिवार वंदन करावे वाटते.त्यांच्या कार्यसंस्कृतीला.एका मैत्रिणीची प्राणिसंग्रहालयाची भूतदयेची गोष्ट ‘ती वेगळीच’या लेखातून अधोरेखित केली आहे.जंगलच्या राजाची भेट घडवून आणणारा लेख ‘गुंतता हृदय हे’.सॉरी नावाची कविता वाचून आत्महत्येपासून परावृत्त झालेल्या एका युवकाची कथा वाचून,कवितेची ताकद लक्षात येते. प्रवासवर्णनपर ‘ढगांच्या घरात हा लेख निसर्ग सौंदर्य दाखवतो.जीवनाकडे सकारात्मक विचाराने बघायला लावणारा ‘आगळंवेगळं मार्केटिंग’लेख.
माणसांच्या स्वभावाचे कंगोरे न्याहाळून त्यावर काव्यात्म कृती व वृत्ती शब्दशैलीच्या रसवत्ता आणि गुणवत्तेतून झळकावणाऱ्या लोकप्रिय कवयित्री शांताबाई शेळके यांच्या साहित्यावर प्रतिबिंबीत होणारा ‘सांगावेसे वाटले म्हणून!’.राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर ते वितरण या काळातील आनंदोत्सव ‘कृतज्ञ मी..’या लेखात प्रभावीपणे मांडला आहे.
मुलगा परगावी शिकण्यास जायला निघाला की,होणारी मनाची अवस्था अतिशय भावस्पर्शी हलक्याफुलक्या शब्दात ‘अवघा तो शकुन ‘या लेखात शब्दबध्द केला आहे.क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती करून देणारा ‘करुया पेरणी सावित्री विचारांची’. आयुष्याच्या जगण्याचं तत्त्वज्ञान निरक्षर असून मनोविद्याचं गूढ सहजरित्या काव्यातून उलगडून दाखविणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कर्तृत्वाचा महामेरू ‘अरे संसार संसार’हा लेख खूपच मनाला भावला.
आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं
एका सासाचं अंतर….
रथसप्तमीच्या पिवळ्या भाताचं गुपित ‘स्वाद रेंगाळला…मायेचा’या लेखात व्यक्त केले आहे.
रानकवी ना.धों.महानोर यांच्या साहित्यावर प्रतिबिंबीत केलेला आरस्पानी सौंदर्याचा
शब्दाविष्कार ‘अंग झिम्माड झालं’या लेखात.फारच छान!हरेक काव्यरचेनी नजाकत वेगळीच.साहित्यविश्वाला दिलेला अनोखा महामंत्र…
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे..
पहिल्या पावसाचा शिडकावा झाला की मातीचा येणारा गंध दरवळत राहतो.त्या गंधाचे वर्णन‘मृदगंध’या लेखात आहे.
श्रावणातल्या माहेरच्या यात्रेच्या वर्णनाची ‘श्रावणातील हिरवी गजबज’.आवडत्या भावविश्वात रमणारी लेखिका ‘थॅक्यू आकाशवाणी’हा लेख लिहून कृतज्ञता व्यक्त करते. ग्रामीण साहित्यिक श्री रा.रं.
बोराडे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास हा प्रबंध सादर करून डॉक्टरेट प्राप्त केली.त्यांच्याविषयी अन् प्रबंधाचा प्रवास
‘बाप माणूस ‘या लेखात शब्दबध्द केला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आणि ज्या शाळेत मुळाक्षरे गिरवत शिकली.त्या शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे निमंत्रण म्हणजे दुग्धशर्करा होय.बालपणीच्या
शाळेतल्या जमतीची आठवण ते हरेक शिक्षकांच्या विशेष स्वभावाचा पैलू अतिशय समर्पक शब्दात मांडलाय. ‘होऊ कशी उतराई’ या लेखात.
सर्वच लेख अप्रतिम आहेत.वाचक रसिकांना आवर्जून वाचावं असं सांगायला निश्चितच आवडेल.लेखिका डॉ.लीना निकम यांच्या लेखणीला सलाम!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २३ मे २०२५
Comments
Post a Comment