पुस्तक परिचय क्रमांक:२२१ सृजनरंग


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२१
पुस्तकाचे नांव-सृजनरंग 
संकल्पना: अजय कांडर 
संपादक: डॉ.योगिता राजकर
प्रा.मनीषा पाटील, मनीषा शिरटावले 
प्रकाशन-प्रभा प्रकाशन कणकवली-सिंधुदुर्ग
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २६ जानेवारी २०२५
पृष्ठे संख्या–९६
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२१||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-सृजनरंग 
संकल्पना: अजय कांडर 
संपादक: डॉ.योगिता राजकर
प्रा.मनीषा पाटील,मनीषा शिरटावले 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
सामाजिक ज्वलंत समस्या आणि प्रश्नांवर 
पोटतिडकीने भाष्य करणारा प्रातिनिधिक 
काव्यसंग्रह.हरेक कवीची जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन तसेच भावविश्वाची व्यापकता,कवितेचा आशय , रचना आणि मांडणी यामध्ये आपणास वैविध्य दिसून येते.तसेच या काव्यात गंध ,श्राव्य आणि स्पर्श प्रतिमा दिसून येतात.
 या काव्यसंग्रहाचे संकल्पक अजय कांडर आहेत. संवेदनशील मनाच्या कवयित्री डॉ. योगिता राजकर,प्रा.मनीषा पाटील आणि मनीषा शिरटावले अशा तिघींनी महाराष्ट्रातील व्यासंगी कवीपैकी निवडक पंच्याहत्तर कवींच्या कवितांचे संकलन करून संपादित केलेल्या आहेत. 
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ही सांस्कृतिक चळवळ इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर, जेष्ठ लेखक व समीक्षक जयंत पवार यांच्या स्मरणार्थ कार्यरत आहे.या चळवळीला पाठबळ देणारे साहित्यिक,रंगकर्मी यांच्या आभार आणि ऋणनिर्देश व्यक्त केला आहे.
       चित्ताकर्षक असं मुखपृष्ठ नजरेत भरतं. आशयनिगडीत व सृजनाचा कलाविष्कार अधोरेखित करणारं मुखपृष्ठ. तर मलपृष्ठावर प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘ब्लर्ब’प्रातिनिधिक कविंच्या अभिव्यक्तीचे विवरण करत,कवितेचे आशय आणि रचना यांची सांगड घालत विचारधारेचे महत्त्व पटवून देतो.
संपादकीय लेखात पंच्याहत्तर कवींच्या कवितांचे आशयविषय आणि अभिव्यक्ती यावर भाष्य केले आहे.हरेक काव्यातून वाचक रसिकांना संदेश आणि विचारधारा देणाऱ्या सगळ्या रचना आहेत. विविधांगी कवितांतून महाराष्ट्रातील बोलीभाषेचा गोडवा दिसून येतो.नवकवींना लेखनास प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाल्याने उद्याचे सकस व दर्जेदार कवी अशा संकलनातून घडतील असा ठाम विश्वास वाटतो.
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ब्रीदवाक्याशी शतप्रतिशत अधीन राहून साहित्य चळवळ संवर्धन करण्याचा संपादकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. सामाजिक सुधारणात्मक दृष्टिकोनअसणाऱ्या कविता अप्रतिम आहेत.
महाराष्ट्रातील विविध घटकांतील छंदवेड्या 
छांदिष्टांना एकत्र करून त्यांच्यातील लिहिण्याची उर्मी असणाऱ्या कवींची गुणवत्ता ओळखून प्रकाशित पुस्तकाद्वारे जाणकार रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणे.हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही चळवळ मार्गक्रमण करत आहे.
सृजन म्हणजे कल्पनेतून विचारातून नवीन काहीतरी वेगळं निर्माण करणे.सृजनरंग
म्हणजे शब्दांच्या विविधांगी छटांचा वापर करून नवीन सकस आणि दर्जेदार साहित्य निर्मिती करणे.कोणताही कलावंत कल्पनाशक्ती, बुध्दीमत्ता आणि संवेदनशीलतेच्या त्रिवेणी संगमातून सृजनशील साहित्य निर्माण करीत असतो.
सामाजिक प्रश्नांवर, निसर्ग, मानवी मूल्ये,
प्रेम,समाजाचे प्रतिबिंब आणि अंतरंगातील 
विविध स्पंदने टिपत आशयघन रचना कवि-कवयित्रींनी रचलेली आहे.
 शब्दांची बांधिलकी नीलम यादव यांनी ‘शब्द’ कवितेतून मांडली आहे.आजी अन् गोधडीची संगत‘वाकळ’कवितेतून प्रकटते.
संवेदना हरवत चाललेल्या माणुसकीवर अंजन घालणारी ‘गायची आहे मानवतेची प्रार्थना’अप्रतिम रचना! कवयित्री डॉ.योगिता राजकर यांची मौलिक विचारधारा समजून देत.विचार करायला लावणारी कविता.तर मनीषा शिरटावले यांची ‘मी नाकारणार आहे बाईपणाचं ओझं’, पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या मनाचा आणि भावनेचा कोंडमारा सहन करत घुसमटून जाते ती.तिला मुक्तपणे स्वच्छंदी जीवन जगायचं आहे.लादलेलं ओझं पायाखाली तुडवून तिला मोकळा श्वास घ्यायचाय!किती छान संकल्पनेचा संकेत या कवितेतून मिळतोय.
 कष्टकरी श्रमिक महिलांच्या जीवनाचे रहस्य उलगडून दाखविणारी कविता ‘तिचा चेहरा’ही अॅड.मेघना सावंत यांनी गुंफली आहे.
आमचे शिक्षक मित्रवर्य संतोष ढेबे यांची ‘बापू’कविता महात्मा गांधी यांच्या अहिंसेचे तत्वज्ञान कालौघात दुसरं होऊन लबाडी, गरीबी,जातीपाती, भ्रष्टाचारी संस्कृती बोकाळली आहे.हे ठळकपणे व्यक्त होणारी कविता.तर गरीबीची व्यथा ‘भैरवी’या काव्यात संतोष येळवे यांनी मांडली आहे. वृक्षांची परोपकारी वृत्ती 
हरिश्चंद्र पिसे यांनी ‘झाडांच्या विश्वात’ समजावून दिली आहे.महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य श्रीगणेश शेंडे यांनी ‘समाज सुधारक’या गेय रचनेतून स्पष्ट केले आहे.निसर्गातील सौंदर्याची उधळण 
‘अलवार प्रिती’ निसर्गप्रतिमांचा उपयोग करून कवी अमित कारंडे यांनी छान शब्दात सजवली आहे.कितीही संकटं आली तरी त्यांना धीराने सामोरे जाऊन माझा विजय निश्चित करेन.असा आत्मविश्वास‘अंती जिंकेन मी’याकाव्यातून 
कवी दीपक कासवेद यांनी दिला आहे. इतरही कवींच्या रचना खूप छान शब्दात व्यक्त झालेल्या आहेत.प्रातिनिधीक स्वरूपात ७५पैकी काही कवींच्या रचनात्मक आशयाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 ‘सृजनरंग’हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह रसिकांना निश्चितच आवडेल असा विश्वास वाटतो! खरंतर संकल्पना तडीस नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेल्या कवींना पुस्तकरुपी लिखित व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेस आणि सर्व विश्वस्तांना मनःपुर्वक धन्यवाद!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक -१७ मे २०२५




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड