पुस्तक परिचय क्रमांक:२२३ फकिरा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२३
पुस्तकाचे नांव-फकिरा
लेखक: अण्णा भाऊ साठे
प्रकाशन-सुरेश एजन्सी,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -चौपन्नावी आवृत्ती २०२४
पृष्ठे संख्या–१७६
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२३||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: फकिरा
लेखक: अण्णा भाऊ साठे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
भुकेचा आगडोंब शमविण्यासाठी केलेल्या बंडाची हकिकत म्हणजे ‘फकिरा’.प्रतिभेचं सर्जनशील देणं लाभलेले साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखजिन्यातील राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन गौरविलेली अप्रतिम, लोकप्रिय कादंबरी ‘फकिरा’ वंचित समाजाची व्यथा आणि त्याच्या उत्थानाची गाथा आहे.याची प्रथम आवृत्ती मार्च १९५९ साली प्रकाशित झाली असून या कादंबरीची प्रस्तावना संवाद स्वरुपात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांनी प्रस्तुत केली आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीचा गौरव करत या कादंबरीचा आशय समर्पक शब्दात स्पष्ट केला आहे.
लोकशाहिर साहित्यसम्राट अण्णाभाऊं सारख्या प्रतिभावंताने आपणास त्यांना भेटलेल्या अनुभवांना प्रतिभेची वीट दिली. म्हणून तर इतकी विशाल शब्दपंढरी उभी राहिली अन् ती चिरंतन ठरतेय. जीवन हे सुख दुःखांचे काटे आणि फुले तुडवत मनुष्य चालत राहतो.अशा भेटणाऱ्या व्यक्ती आणि घडणारे प्रसंग लेखक मनाला अनोख्या विश्वात घेऊन जातात.
अण्णा भाऊ साठे….
गरीब,दलित, शोषित या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार
आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक…लोकशाहिर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे
"फकिरा" ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली सामाजिक क्रांतीवर आधारित कादंबरी आहे. ही कादंबरी समाजातील शोषित, वंचित आणि दलित वर्गाच्या दुःखद आणि संघर्षमय जीवनाचे चित्रण करते.स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटीशांनी वारणेच्या खोऱ्यातील एका खेड्यातील गावकुसाबाहेर असणाऱ्या मांग जातीतल्या लढवय्या बापलेकांचं चित्रण करणारी ही कादंबरी.सामाजिक अन्याय,गरीबी, जातीभेद आणि शोषणाविरुद्ध उभा राहिलेला फकिरा या मुख्य पात्राचा संघर्ष आहे.
अण्णा भाऊ साठे ‘फकिरा’या कादंबरीचे वास्तवभान उलगडून देताना;स्वता:ची कैफियत मांडतात.प्रतिभेला सत्याचा जीवन दर्शन आणि अनुभव एकत्रितपणे शब्दबध्द करून या कादंबरीचा इमला ऊभारला आहे.फकिराच्या ऋणानुबंधातून त्याच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून,उतराई होण्यासाठी ही कादंबरी लिहीलीआहे.कारण घौडदौड करत फकिरा आमच्या घरी जेव्हा आला, तेव्हा लेखकाच्या जन्माची वार्ता आक्काने फकिराला सांगितली.या आनंदाप्रित्यर्थ त्याने लुटलेल्या खजिन्यातील दोन ओंजळी सुरती रुपये तिच्या ओटीत टाकले होते.आणि त्याच पैश्याची बालघुटी मी चाखली होती,चाटली होती.जो उपेक्षित होता.त्याच्या कर्तृत्वाचा पसारा सह्याद्रीच्या डोंगराएवढा होता.त्याच्या त्यागातून आणि संघर्षातून सामाजिक क्रांतीचा एक संदेश समाजाला देणयासाठी ‘फकिरा’कादंबरीचं लेखन करुन सरस्वतीच्या मंदिरात चिरंतन उभं केलं.साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली आहे.
चित्तथरारक मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर अण्णा भाऊ साठे यांचे छायाचित्र आणि त्याखाली साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांचा ‘ब्लर्ब’समग्र गावगाडा उभा करण्याचं कसब अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीत आहे.म्हणूनच लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध कादंबरी ‘फकिरा’वर महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन मृदांकित केली आहे.
शिगावच्या यात्रेतील जोगणीच्या हातातील वाटी तलवारीच्या गराड्यातून चालणाऱ्या त्या खोबऱ्याच्या वाटीला राणोजी हात घालतो.अंगावर उगारलेले घाव तलवारीने परतवत गावाकडे सुसाट वेगाने घोड्यावरून धावत सुटतो. वाटी खोतालाच्या हाताला लागू नये म्हणून खाऊन टाकतो.गबऱ्या अधिकच वेगाने माळावर दौडत होता.त्याच्यामागे बापू खोत वाटी पळविली म्हणून सुडाने बेभानपणे घोड्यावरून पाठलाग करत असतो.एव्हाना राणोजी वाटेगावच्या शिवेच्या आत आला.खोतही वाटेगावच्या हद्दीत घुसखोरी करून भाला फेकतो. फेकलेला भाला गबऱ्या घोड्याला लागून खाली कोसळतो.राणोजी उठून उभा राहिपर्यंत त्याच्यावर हत्यारांचे वार होतात.
राणोजी मुठीत तलवार धरून गतप्राण होतो.वाटी सापडली नाही म्हणून खोत त्याचे मुंडके उडवून शिर घेऊन शिगावला परत फिरतो.वाटेगावच्या हद्दीत घुसून मारल्याने ठरलेल्या नियमाचा भंग केलेला असतो.हा अन्याय झाल्याने वाटेगावकर पेटून उठतात आणि शिगावावर चाल करतात.अन् दोन्ही गावात संघर्ष सुरू होतो.
वाटेगावचे विष्णुपंत कुलकर्णी आणि शंकरराव पाटील दौलतीच्या कुटूंबाला सर्वतोपरी मदत करतात.कालौघात फकिरा तरुण होतो.त्याला सगळे गावकरी मान देतात.कारण फकिराच्या पित्याने जोगणीची वाटी आणल्यामुळे वाटेगावात जोरदार यात्रा भरते.जोगणीची वाटी म्हणजे गावची इज्जत असते.या वर्षी खोताने पाहुण्यांच्या मदतीने वाटी पळवण्याचा घाट घातलेला असतो. त्याप्रमाणे मोर्चेबांधणी केलेली असते.पण वाटी घेऊन जाण्याचा खोताचा प्रयत्न फकिरा हाणून पाडतो. त्याचा मूठीसकट हात कलम करतो.त्यामुळे गावाची खपा मर्जी फकिरावर होते.अन् यात्रेत जोगणीच रक्षण करण्यासाठी अग्रेसर असतो.
फकिरा हा एका दलित समाजातील तरुण आहे. बालपणापासूनच त्याने समाजातील अत्याचार, भूक, गरिबी आणि अपमानाचे अनुभव घेतलेले असतात. समाजातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या शोषणामुळे फकिरा मनातून अस्वस्थ होतो आणि एक सामाजिक बंडखोर बनतो.
इंग्रजांच्या अन्यायकारक वागण्यामुळे त्याच्या समाजातील अनेकांना गाव सोडून इतरत्र जावे लागते.कोणत्याही गावात अवैध घटना घडली की बोटं यांच्या लोकांकडे दाखवून त्यांना ठाणबध्द करत. अश्या समस्यावर पंतांकडे कैफियत मांडणारा फकिरा.पंतांच्या मध्यस्तीने अश्या लोकांवरील अन्याय दूर करतो.पंतही प्रांतापुढे अतिशय पोटतिडकीने सुसंगतपणे बाजू मांडून पटवून देतात.फकिराच्या सर्वच लोकोपयोगी कामाला पाटील आणि पंतांनी सहकार्य केले आहे.
दुष्काळ,भूक आणि तापाच्या भयंकर आजाराने माणसं मरत होती. हे असह्य त्याला बघवत नव्हते म्हणून त्याने पंतांची गाठ घेतली.उपायावर चर्चा झाली.पंत म्हणाले, “उद्या साठी जगणं महत्वाचे आहे.त्यासाठी काहीही करा.उपाशी मरु नका” यावर साथीदारांशी चर्चा करून माळवाडीच्या मठकरी वाड्यातील धान्य कोठारावर धाड घालायचं ठरवून ,काम फत्ते करतात.दुसऱ्याच दिवशी पोलीस सगळ्यांना अटक करतात.तेंव्हा गाव कुलकर्णी आणि पाटील यांना पोलिसांनी विचारात घेतलेले नसते.त्यामुळे पंत चिडून प्रांताशी सडकून बोलतात. पुरावा मागतात.शेवटी हतबलता झाल्याने सगळ्याची सुटका होते.पण दुसरं फर्मान येतं. पाटीलकी रावसाहेब पाटलांना आणि डाक्यातील सगळ्यांनी सकाळ संध्याकाळ आणि रात्री हजेरी द्यायची.अन्यायकारक तीनवेळच्या हजेरीमुळे तो अतिशय संतापतो.मध्यरात्रीच्या हजेरीवेळी त्याची नवीन पोलीस पाटील रावसाहेब यांच्याशी झटापटीत तो त्याचे दात घश्यात घालतो. अन् पुढे सगळीचपोरं गावातून फरारी होतात.जंगल दऱ्याखोऱ्यांत वावरतात.
बेडसगावचा खजिना लुटतात.त्यामुळे इंग्रज अधिकारी फकिरा आणि साथीदारांना पकडण्यासाठी फर्मान सोडतात.इकडे त्यांच्या सगळ्या घरांना पोलिसपाटील दारकोंड करतात. वस्तीतल्या सगळ्यांना अटक करुन नेर्ले येथील छावणीवर ठेवतात.तदनंतर सगळ्यांची सोडवणूक व्हावी म्हणून फकिरा आणि दहाजण सरकारी हुकुमाप्रमाणे हजर होऊन शरणागती पत्करतात..अशी ही स्वकीयांच्या सावकारशाही आणि परकीयांच्या साम्राज्यशाही ह्यांच्याशी दिलेली उपेक्षित वर्गातील फकिराने आपल्या समाजासाठी दिलेली झुंज ‘फकिरा’कादंबरीत लोकशाहीर साहीत्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी अस्सल ग्रामीण भाषेतील शब्द लालित्यात अस्सल मातीतली व्यक्तिरेखा रेखाटली आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक -२५ मे२०२५
Comments
Post a Comment