पुस्तक परिचय क्रमांक:२७२ चित्रलिपी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७२
पुस्तकाचे नांव-चित्रलिपी
लेखक: संध्या शेषराव येलेकर व विनोदकुमार नवघडे
प्रकाशन-युरो वर्ल्ड पब्लिकेशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम
पृष्ठे संख्या–१०८
वाड़्मय प्रकार-काव्यचित्र
किंमत /स्वागत मूल्य-५००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -चित्रलिपी
लेखक: संध्या शेषराव येलेकर व विनोदकुमार नवघडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
“रंगछटांनी कॅनव्हासवर
उमटली भावना मनीची
सुगंधित शब्दफुलोऱ्याने
बहरली चारोळी सृजनाची!”
मनातील विचारतरंगांना कुंचल्यातून
चित्राला आविष्कार देणाऱ्या चित्रकार सौ.संध्या येलेकर अन् चित्राचा आशय मनभावन काव्यातून सौंदर्य खुलविणारे कवी प्रा.विनोदकुमार नवघडे.दुहेरी संगमातून रसिक प्रेक्षकांना आभासी पटलावर खिळवून ठेवणारी जादुई करामत म्हणजे ‘चित्रलिपी’.
जणूकाही कलाविष्कार मैफिलीत सर्वांसमक्ष चित्रकार स्केचिंग करत आहेत अन् त्याच स्केच ‘दिलरुबा’ समर्पक काव्यातून सादर अशी जुगलबंदी…. एक कलाकार गातो तर दुसरा त्यावर नृत्य सादर करतो….
स्वतः आनंदाने चित्र रेखाटून त्यावर काव्याची झालर लावून तयार झालेला सृजन आविष्कार इतरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी साठी चित्रलिपी साहित्य करण्याचे कार्य केले आहे.याबद्दल चित्रकार आणि कवी या दोहोंचे हार्दिक अभिनंदन!
साहित्याचा नवा आविष्कार ‘चित्रलिपी’
हे रंगीत शब्दचित्र वाचन साखळी समूहाच्या विश्वस्त तथा राष्ट्रीय खेळाडू आणि लेखिका सौ नीता चापले -भोयर यांनी पोस्टाने पुस्तक परिचयासाठी पोस्टाने पाठवले त्याबद्दल ताईंना मनःपूर्वक धन्यवाद!!!
निसर्गाचा आविष्कार रंग आणि ब्रशने चितारलेलं मुखपृष्ठ पाहिलं की लगेच हातात घेऊन पाने उलगडायला सुरुवात झाली.इतकं देखणं मुखपृष्ठ आणि आकर्षक मुखपृष्ठ आहे.तर मलपृष्ठावरील प्रा.पुनित मातकर यांचा‘ब्लर्ब’ चित्रलिपीची खासियत अधोरेखित करतो.आनंदाने
रेखाटलेली चित्रे इतरांच्या नजरेतून ते बोलू लागतं.पण तात्काळ कोणीही अव्यक्त होत नाही. ‘जे न देखे रवी ,ते देखे कवी’या उक्तीप्रमाणे कवी त्या चित्राचा आशय आणि अर्थ एखाद्या काव्यातून अथवा चारोळीतून व्यक्त करतो.अन् अन् अबोल तसबीर शब्दातून बोलू लागते….
‘एकप्रसिस’नवाच साहित्य प्रकार चित्रचारोळी संक्षेपाने चित्रातली भावना अचूक शब्दात मांडणे.कलावंत आणि कवी यांनी एकशेसात ‘चित्रशब्द’रंगीत
कॅनव्हासवर सजवली आहेत. सृजनशील काव्य अन् चारोळी वाचून आणि चित्र पाहून आपण हरखून जातो.लगेच अभिप्राय तोंडातून स्फुरतो…फारच छान! अप्रतिम !लयभारी ! समर्पक काव्यपंक्तीत चित्राचा आशय गुंफलाय!
चित्रकार संध्या येलेकर यांनी परिसरातील निसर्ग,प्राणी,पक्षी,फुले,
वस्तू, वास्तू,घटना-प्रसंग,देवदेवता यांचे चित्रण रंग आणि ब्रशने रेखाटले आहे.तर कवीवर्य तथा प्राध्यापक विनोदकुमार नवघडे यांनी चित्रांना कॅप्शन देऊन साहित्य रसिकांना आनंद देणारा नवा आविष्कार दिला आहे..
‘चित्रलिपी ‘या पुस्तकाला डॉ.व्ही.जे. शिवणकर यांची प्रस्तावना लाभली असून त्यांनी रंग अन् शब्दांच्या जुगलबंदीचे कौतुक केले आहे.बोलकं ‘पद्मशिल्प’या अचूक शब्दप्रयोगात कौतुक केले आहे.
कवी विनोदकुमार नवघडे यांनी लेखात
काव्य निर्मितीच्या छंद ते व्यासंग प्रवासाचा मागोवा घेतला आहे.वर्क फ्राॅम वर्क करत मिळालेल्या प्रचंड वेळेचा सदुपयोग सकारात्मक विचाराने करत
चित्रांची कविता शब्द शब्द जुळवत अर्थाचा संदेश समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.हे आपणास पानोपानी दृष्टीस पडते.
चित्रकार संध्या येलेकर यांनी आकार, भाव, रेषा आणि रंगछटांनी निर्मिलेलं चित्र आभासीपटलावरील स्टेटसला ठेवून इतरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलं.यावर येणाऱ्या बोलक्या प्रतिक्रिया, अभिप्राया कलावंतांना प्रोत्साहन देऊन आत्मबळ वाढवितात.याचा आवर्जून उल्लेख मनोगतात व्यक्त केला आहे.
चला तर मग चित्रलिपीच्या पुस्तकातील नवलाईच्या पद्मचित्रांचा आस्वाद घ्यायला बघायला आणि फावल्या वेळात कॉफी विथ टेबलवरील एकप्रसिस हाताळत आस्वाद घेऊया…..
साहित्य रसिकांना आनंद देणारं एक सुंदर पुस्तक म्हणून मी ‘चित्रलिपी’ची शिफारस करेन…..
पुस्तक परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १ मे २०२६

Comments
Post a Comment