पुस्तक परिचय क्रमांक:२७७ पालकांशी शिक्षकांशी हितगुज





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७७
पुस्तकाचे नांव-पालकांशी शिक्षकांशी हितगुज 
लेखक: डॉ ललिता गुप्ते
प्रकाशन-उन्मेश प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-११९२,प्रथमा आवृत्ती 
पृष्ठे संख्या–११९
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७७||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -पालकांशी , शिक्षकांशी हितगुज 
लेखक: डॉ ललिता गुप्ते 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
“शिक्षण म्हणजे दळण नव्हे तर जीवनाला उत्तम वळण लावण्याचे एक उत्तम साधन”
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व्ही व्ही चिपळूणकर यांचा वैचारिक अभिप्राय ‘पालकांशी शिक्षकांशी हितगुज’या पुस्तकाचा आशय विषय अधोरेखित करतो.तसेच शिक्षण आनंददायी व कृतीयुक्त होण्यासाठी पालकांशी व शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी नेमके काय करावे? हे प्रयोगशील उपक्रमशील विद्यार्थीप्रिय लेखिका डॉक्टर ललिता गुप्ते यांनी अनुभवाची शिदोरी या पुस्तकातून कथारुपाने गुंफली आहे.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व वेगळ्या संकल्पनेचे असून,फुलपाखराचे गुलाबपुष्पाशी गुंजारव हे विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा वाढविणारे आहे.तर मलपृष्ठावरील ब्लर्ब आशयाचा आलेख उठावदार करणारा आहे.शाळाशाळातून आणि घराघरांतून हृदयसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिका डॉ.ललिता गुप्ते यांनी केला आहे.संवेदनशील मन आणि विचारी वृत्ती सुजाण पालकांमध्ये असेल तरच गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांचे कसे घडेल? मुले संस्कारित कशी होतील? याची सविस्तर आणि परिपुर्ण माहिती या पुस्तकातील लेखांमधून समजते.शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी या पुस्तकाचे रसग्रहण करणे आवश्यक आहे.
 आपुलकी संस्थेत काम करत असताना पालकशिक्षक संघापुढे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली.तेच संचित या पुस्तकात समाविष्ट असून व्यक्त केलेलं विचार आणि प्रयोग इतरांना प्रेरक ठरावेत यासाठी या पुस्तकाचे लेखन झाले.याचा लेखिका आवर्जून उल्लेख करतात.
“ गुंज मनिचे जाणून घ्यावे, चिंतनातून मंथन व्हावे|
पडताळून अनुभव वेचावे,बोधाचे नवनीत उरावे||”या श्लोकाप्रमाणे केलेल्या प्रयोग प्रकल्प व उपक्रमांची यशोगाथा आणि आलेल्या अनुभवांची शिदोरी कथारुपाने या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. ज्ञानाची समृध्दी प्रत्येक कथेतून आपणास लक्षात येते.वैज्ञानिक युगात नवीन तंत्रज्ञानामुळे माहितीचा विस्फोट झाला आहे.प्रगती वेगाने होतेय त्यामुळे जग जवळ येत आहे. पण माणुसकीची नाती मात्र दुरावत चालली आहेत. स्पंदन हरविलेली असंवेदनशील माणसं सगळीकडे वावरत आहेत.आपल्या मनात अस्वस्थतेचे गाठोडे कसं उलगडावं याचा विचार हरवत चालला आहे.मन बैचेन झालं तर काय करावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल असं वाटतं.कारण मनमोकळं करायला हल्ली ऐकणारं कोण आहे.त्यामुळे हे पुस्तक कथारुपाने वाचकांशी संवाद साधेल असं मला वाटतं. 
आचार विचार उच्चारातील प्रदुषण वाकुल्या दाखवत भेडसावत आहे. संस्कारशील आचरणासाठी विचारांचे सौंदर्य लेखांमधून पेरले आहे.हाच विचारांचा वारसा आपल्याला या पुस्तकातून कथारुपाने वाचकांशी संवाद साधतो.अवाजवी स्पर्धांमुळे विद्यार्थी ज्ञानार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी झाले आहेत.यासाठी शिक्षक, पालक आणि बालकांशी हृदयसंवाद होणे गरजेचे आहे. हा महत्वाचा दृष्टीकोन लेखिका डॉ ललिता गुप्ते यांनी शब्दादीत केला आहे.
  या पुस्तकात स्पंदनासह बत्तीस लेखातून मुलांचे भवितव्य फुलविणेसाठी, घडविण्यासाठी प्रेरक विचार दीपस्तंभासारखे वाचताना अनुभवास येतात.सर्वांच्या चर्चेतून शाळेचा गुणात्मक आलेख कसा संवर्धित झाला.हे त्यांनी उदाहरणे व दाखल्यांसह स्पष्ट केले आहे.तसेच आदर्श पालकसंघाची अनुभव सिध्द कार्यपद्धती समाविष्ट केली आहे.
“सुजाण पालकत्वाची जबाबदारी आणि विद्यार्थीनिष्ठ शिक्षकांची तळमळ हितगुज रुपाने मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी सुसंवाद”हा नवा दृष्टिकोन वाचकांशी हितगुज साधतो.समस्येचे मूळ शोधून उत्तर धुंडाळले पाहिजे आणि मगच योग्य तो उपाय राबवून स्थिती दुरुस्त केली.तरच आपण पालकत्व निभावले.अन् विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संस्कारित केले.हे प्रचिती मुलांच्या आचरणातून दिसून येईल.
शाळेतून अध्ययन अनुभव देताना घडलेल्या घटनांचे वास्तव लेखन सहज सुंदर व सोप्या शब्दात मांडले आहे.तर भाषाशैली गप्पा गोष्टींच्या शैलीतली आहे.
प्रतिकात्मक व काल्पनिक उदाहरणे न देता घडलेल्या प्रसंगाचे शब्दचित्र रेखाटले आहे.१९९२साली या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.त्यावेळी शैक्षणिक परिस्थितीवर केलेले प्रयोग आजच्या काळालाही लागू पडतात.आजच्या शिक्षक आणि पालकांच्या समस्या त्याच आहेत उलट तंज्ञज्ञामुळे आणि मोबाईलच्या सदोदित वापरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच या अनुभव सिध्द शिदोरीचे रसग्रहण करणं महत्त्वाचं आहे.मुलांच्या यशप्राप्तीसाठी जागरूक पालकनीती हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.‘पालकांशी शिक्षकांशी हितगुज’हे केवळ मनोरंजन गोष्टी वाचण्याचे पुस्तक नसून वाचलेल्या लेखांवर विचार करायला लावणारे आहे. वाचकांच्या मनामनात तरंग उमटवित आचरणातून संस्काराची पखरण करणारे आहे.यातील प्रत्येक उपक्रम अथवा प्रकल्प कसे आयोजित करावेत याची संपूर्ण माहिती दिली आहे.खरतर मुलगा घडविण्यात-बिघडवण्यात त्याची संगत महत्वाची असते.मैत्रीला जपणं मान्य आहेच.पण त्याचे मित्र संकटसमयी उभे राहतात का? एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सहकार्याचा हात देतात का?हे महत्त्वाचे आहे. 
आदर्श शिक्षकपालक संघाच्या माध्यमातून 
आलेलं अनुभव,केलेले प्रयोग मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी पालकनीती आणि शिक्षकनीती कशी असावी याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक आहे.
   मायेच्या ऊबेत वाढणाऱ्या हसऱ्या चिमण्या पाखरांना त्यांच्या स्वप्नांतलं घर उभारण्यासाठी शिक्षक व पालकांनी सुसंवाद साधनेसाठी या पुस्तकाचे वाचन करणं महत्त्वाचं आहे. “मनुष्य घरात जगतो आणि शाळेत विचार करायला शिकतो. त्यामुळे जीवन आणि विचार यांचा मेळ घालायला घर शाळेत आणि शाळा घरात असली पाहिजे तरच कौंटुबिक शाळा होतील.”

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २६ डिसेंबर २०२५



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी