पुस्तक परिचय क्रमांक:२७५ सृजनाची वाट
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७५
पुस्तकाचे नांव-सृजनाची वाट
लेखक: संदीप वाकचौरे
प्रकाशन-चपराक प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२५, दुसरी आवृत्ती
पृष्ठे संख्या–१५२
वाड़्मय प्रकार-विचारधारा
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७५||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -सृजनाची वाट
लेखक: संदीप वाकचौरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तसेच आपले जीवनमान आनंदमयी करण्यासाठी चांगले संस्कार आचरणात आणणे म्हणजे चांगले शिक्षण.अशा शैक्षणिक विचारांचे लेखन करणारे ज्ञानसाधक,पत्रकार संतसाहित्याचे अभ्यासक तथा लेखक श्री संदीप वाकचौरे यांनी ‘सृजनाची वाट’या बाराव्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
‘सृजनाची वाट’या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून नवनवीन शिक्षणाचे विचार रसग्रहण करायला मिळतील.याची साक्ष देणारे आहे.लेखकांनी हे पुस्तक शिक्षणाची वाट सुलभ करणाऱ्या थोर महापुरुषांना ‘कर्मवीरांना’ व सर्व गुरुजनांना अर्पण केले आहे.तर
मलपृष्ठावरील प्रकाशक श्री घनश्याम पाटील यांचा ब्लर्ब या पुस्तकाचे लेखन आणि प्रकाशनाचा प्रवास अधोरेखित करतात.
मालपाणी उद्योगसमूहाचे विश्वस्त डॉ. संजय मालपाणी यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.आज अद्ययावत जीवनोपयोगी शिक्षण मिळणे खूप गरजेचे आहे.त्यासाठी शिक्षणव्यवस्थेत सतत योग्य ते बदल घडून येणे आवश्यक आहे.म्हणजेच भविष्याचा वेध घेणारे शिक्षण असले पाहिजे.
आयुष्य जगत असताना लेखक संदीप वाकचौरे यांना आलेल्या अनुभवांची विचारांशी सांगड घालून एक नवा आदर्श विचार आपल्या मनात पेरायला या पुस्तकातील लेखमालिका आपल्याला नक्कीच आवडतील.कारण हरेक लेखात त्यांनी सृजनाची वाट आपण का ? चोखळली पाहिजेत.हे समर्पक उदाहरण व दाखले देऊन पटवून दिले आहे.नेहमी सकारात्मक विचारसरणी जोपासणी करायची असेल तर कोणत्याही घटनेचा सखोलपणे अभ्यास करणं महत्त्वाचं असतं.
आजच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात स्वतःची मते लिखित, मौखिक स्वरूपात मांडता येणे.ती मांडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.मुलांना संधी व स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. लेखक संदीप वाकचौरे यांच्या लेखनाला रचनावादाचे अधिष्ठान लाभले आहे.याचा उल्लेख डॉ संजय मालपाणी यांनी प्रस्तावनेत आवर्जून केला आहे.
शैक्षणिक विचारधारेतील पुस्तकातील लेख ते पुस्तके प्रकाशन हा अक्षरवाटे वरील प्रवासाचा मागोवा लेखकांनी ज्ञात अज्ञात महनीय व्यक्तींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.
खरंतर शिक्षणविषयक पुस्तके आणि ग्रंथांची विक्री समाधानकारक नसताना सुद्धा शिक्षण विषय विचारांची बारा पुस्तके लिहून प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य लेखक व प्रकाशक यांनी लिलया पेलून दाखविले.हे वाचकांच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यावरून दिसून येते.
‘सृजनाची वाट' या पुस्तकातील लेखांची भाषा रसाळ सोपी आणि सहज पटणारी आहे.कुठेही कल्पनाविलास आणि शब्दछल न करता एखादा किर्तनकार एखाद्या शब्दाची महती पटवून देताना चिकित्सक पद्धतीने निरुपण करतो.सहजतेने अवघड गोष्टीची उकल सोप्या पद्धतीने करतो.त्याचप्रमाणे भाषाशैली समर्पक शब्दात मांडलेली आहे.
यासाठी संशोधनात्मक अभ्यास आणि चांगले शिक्षण संस्कार विद्यार्थी , पालक आणि समाजाला मिळावेत याची तळमळ आणि विचारमंथनाचा व्यासंग यातूनच तेहतीस शैक्षणिक लेखांची मालिका ‘सृजनाची वाट’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.त्यातील सगळे लेख आपणास विचारांचा प्रवास करायला लावतात.तर यातील अनेक वाक्ये सुविचाराप्रमाणे विचारांचे सौंदर्य पेरणारी आहेत.विचार करायला लावणारी आहेत.
“कधी काळी आपल्या समाजाने आकाशाच्या उंचीची माणसे पाहिली.एक माणूस म्हणजे एक विद्यापीठ.आज माणसं लहान झाली आणि त्यांची राहण्याची ठिकाणे उंच झाली.श्रीमंतीची स्वप्नं मोठी झाली आणि माणुसपणाची स्वप्नं हरवत चालली.कौतुकाच्या शब्दांचा फुलारा आटत गेला आणि टोमण्यांचा महापूर आला आहे.दर्शनीय काय अन् प्रदर्शनीय काय?याचा विचार हरवत चाललाय….”
शिक्षणाचा प्रवास म्हणजे आनंदयात्रा…
विचारमंथन करायला लावणारा प्रश्न म्हणजे शिक्षण कशासाठी घ्यायचं? शिकणाराला काय पाहिजे याचा विचारच शिक्षणव्यवस्थेत करणं महत्त्वाचं आहे.
अतिशय समर्पक शब्दात शिक्षणाचे वास्तव लेखक श्री संदीप वाकचौरे यांनी प्रत्येक लेखातून नवविचार मांडलेले आहेत.पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे रसग्रहण करुन सकारात्मक विचारसरणी जोपासणी पाहिजे असे माझे मत आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २० एप्रिल २०२६

Comments
Post a Comment