पुस्तक परिचय क्रमांक:२९१ क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी




📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९१ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -क्रांतिवीर 
लेखक: भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९१
पुस्तकाचे नांव-क्रांतिवीर
लेखक- भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी 
प्रकाशन-क्रांतिवीर नागनाथ (अण्णा) नायकवडी गौरव समिती,वाळवे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१५जूलै २००७
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२५४
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-५०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
‘अशक्य’ते शक्य करून दाखवणारे तडफदार व झुंजार नेते स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी…. स्वातंत्र्यपूर्व काळात रोमहर्षक व धाडसी कार्य करुन एक आगळा वेगळा इतिहास घडविला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेच्या राजकारणात न पडता जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिथे अन्याय होतोय ,तो दूर करण्यासाठी अग्रेसर असणारे क्रांतिवीर…
क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानणारे त्यागी आणि झुंजार देशभक्त, कष्टकरी शेतकरी कामगार व जनेतेचे नेते,विधायक कामासाठी आंदोलन,ठिय्या व मोर्चे काढून जनतेचे प्रश्न तडीस नेण्यासाठी संघर्ष करणारे लढवय्ये,माजी आमदार क्रांतिवीर नागनाथ नायकवडी तथा अण्णा यांची ऐतिहासिक जीवनगाथा शब्दबध्द करण्याचे महनीय कार्य चरित्र लेखक श्री भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी यांनी केले आहे.स्वातंत्र्यपुर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले जीवन भारतमातेच्या चरणी करणारे अण्णा आणि त्यांच्या सहकारी यांच्या शौर्यगाथेचे दर्शन ‘क्रांतिवीर’या चरित्रग्रंथात होते.देशासाठी प्राणार्पण केलेल्या भारतमातेच्या सुपुत्राच्या कार्याची स्मृती म्हणून अनेकांनी वास्तू उभारल्या पण नागनाथअण्णा नायकवडी यांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा आणि केलेल्या मौलिक कामगिरी आठवण सतत रहावी म्हणून वाळवा परिसरात ‘जीवंत स्मारके’ साखर कारखाना, विद्यालये,वसतीगृहे आदींची उभारणी करून पुरोगामित्व सिद्ध केले आहे.समाजकारणात पारदर्शी कार्यकुशलता ठेवून कारभार करण्यास प्रोत्साहन दिले आहे.अण्णा साखर कारखान्याचे संस्थापक पण आयुष्यभरात कधीही संचालक नव्हे तर चेअरमन सुद्धा झाले नाहीत. हाच करा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
 कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य शेतकऱ्यांमधील असामान्य कर्तृत्व असलेले आदरणीय अण्णांचे हे चरित्र शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य कार्यकर्त्यांना अनुकरणीय आहे.सत्तेत नसताना सुद्धा शेतकरी, कामगार, शेतमजूर आणि धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविता येतात.याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी होय.आत्मस्तुती आणि प्रसिद्धी पराडमुख असं वागणं अण्णांचे होते. ४२व्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची कामगिरी उठावदार आहे.
 ‘क्रांतिवीर’आत्मचरित्र गाथेस त्यांच्याच पिढीतील समाजवादी विचारवंत व लेखक प्राध्यापक ग.प.प्रधान यांची प्रस्तावना या चरित्र ग्रंथास लाभली आहे. बालपण, शिक्षण,राष्ट्रसेवादल,भूमिगत चळवळीतील स्फुर्तिदायीकार्य,शिक्षणसंस्था, साखर कारखाना उभारणी व विधायक कार्याची ओळख अतिशय समर्पक शब्दांत त्यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरपर्यंत रणांगणात
लढणारे झुंजार नेते नागनाथअण्णा नायकवडी यांच्या धगधगीत जीवनाचे यज्ञकुंड शब्दांच्या समिधेने जाज्वल्य देशभक्ती कशी असावी याची ओळख अधोरेखित करणारी प्रस्तावना आहे.
    आदरणीय अण्णांचे जीवनकार्य शब्द आणि रंगीत छायाचित्रात वाचताना अण्णांचे सह्यगिरीएवढं सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य पानोपानी दिसून येते.साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आपल्या कृतीतून सिद्ध करणारे अण्णा. वाळवा परिसराचा भूगोल बदलून इतिहास घडविला हे वास्तव या चरित्र ग्रंथातून रसग्रहण केल्यानंतर समजते.
 चाळीस लेखांमधून त्यांचे जीवनचरित्र उलगडत जाते. तसेच उत्तरार्धात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दर्पण हुतात्मा संकुल परिवार,८३व्या वर्धापनदिनी भावसुमन, वंशावळ,हस्ताक्षर,जीवनपट,त्यांच्यावरील ग्रंथसंपदा, अलौकिक कार्याची मोहर उमटवलेले अनेक पुरस्कार आणि सन्मानचिन्हांची सुची तसेच हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना व किसान शिक्षण संस्था कार्यक्षेत्राचा नकाशा… या महान व्यक्तिमत्त्वाचे उत्तुंग कार्य या ग्रंथात समाविष्ट केले आहे.
 चरित्र लेखक श्री भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी यांनी आदरणीय नागनाथ अण्णा नायकवडी यांचे चरित्र लेखनासाठी अनेक वर्तमानपत्रांची पाने धुंडाळली. मा.नागनाथअण्णा यांच्या मुलाखती ऐकल्या.प्रसिद्ध झालेल्या साहित्यांचा अभ्यास केला. अण्णांच्या सहवासातील स्वातंत्र्यसैनिकांकडून आवश्यक माहिती संकलित केली.वाळवा येथेच सहा महिने ठिय्या मारून लेखन करताना भेटलेल्या अनेक विचारवंतांशी चर्चा करून अण्णांचे विचार समजले.या सर्वांचा परिपाक म्हणजे क्रांतिवीर आत्मचरित्र लेखनासाठी 
बहुमोल उपयोग झाला.याचा आवर्जून उल्लेख मनोगतात केला आहे. सहजसुंदर आणि ह्दयाला भिडणारी भाषा.समर्पक व सुसंगतपणे शब्दपेरणी करून लिहिलेला लेख आशयगर्भता सिध्द करतात.
स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कार्याला त्रिवार वंदन!!!

आस्वादक –श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक: ३०सप्टेंबर २६





Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प