पुस्तक परिचय क्रमांक:२८९ बटाट्याची चाळ
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८९
पुस्तकाचे नांव-बटाट्याची चाळ
लेखक: पु.ल.देशपांडे
प्रकाशन-मौज प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- १जानेवारी २०१६ त्रेचाळिसावे पुनर्मुद्रण
पृष्ठे संख्या–१७२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: बटाट्याची चाळ
लेखक:पु.ल.देशपांडे
______________________
आदरणीय भाईं म्हणजेच महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे. यांनी वाड्मय क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात पादाक्रांत करुन ती क्षेत्रे गाजवली आहेत.मराठी माणसाला पु.ल.देशपांडेंनी काय दिले असेल,तर माणसांच्या दैनंदिन जीवनातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने टिपून त्यावर लेखन करुन रसिक वाचकांना मनसोक्त हसायला शिकविले.पु.लं.च्या साहित्यात विनोदाचे स्थान फार महत्त्वाचे आहे.विनोदाचे दोन प्रकार त्यांनी रसिक वाचकांसमोर सहजतेने उलगडून दाखवले आहेत.एका प्रकारामुळे आपल्याला हसू येते तर दुसरा प्रकार हसताना ही विचार करायला लावणारं साहित्य.हसण्याने मनावरचा ताण हलका करतो.त्याचेच एकत्र संचित पानोपानी मनातल्या मनात गुदगुल्या करत हास्याची लकेर उमटायला लावणारी लोकप्रिय व गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘बटाट्याची चाळ’.
त्यातील सगळ्या व्यक्तीचित्रांचे वाचन करणं म्हणजे वाचक रसिकांना एक खमंग आणि खुसखुशीत साहित्याची भेट. कोणत्याही कथा कादंबरीतील जणू काही सगळी पात्र पु.लं.शी गप्पांची मैफिल रंगवितायत.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत साहित्यिक साहित्य आणि संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक विजेते ऋषितुल्य आदरणीय पु.ल. देशपांडे.यांच्या संपूर्ण साहित्यावर शतशः प्रेम करणारे आपण मराठी भाषिक.
मुंबई ही मराठी माणसाची मायानगरी. अपार्टमेंट संस्कृतीपुर्वी इथं लोकं चाळीत राहायची.चाळीतल्या चाकरमानी लोकांची शब्दचित्रं पु.ल. देशपांडे यांनी अतिशय खुमासदार शैलीत ‘बटाट्याची चाळ’या कथासंग्रहात रेखाटली आहेत.अगदी फिरायला, भटकायला आणि सफर करायची असेल तर बटाट्याच्या चाळीतील कथांची करा.तुम्हाला टेन्शन फ्री करणारं हमखास रामबाण उपाय म्हणजे यातील कथा…ज्यांनी कथाकथनाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष पु.ल.देशपांडे यांच्या वाणीतून या कथा ऐकल्या असतील,ते भाग्यवान रसिक.
‘बटाट्याची चाळ’या कथासंग्रहात चाळीत राहणाऱ्या सामान्यांचे दैनंदिन जीवन, समज-गैरसमज,आनंद -दु:ख, भांडणतंटे, परस्पर संबंध आणि स्वभावगुण अतिशय खुमासदार शैलीत मांडले आहे.हास्याची लकेर उमटायला लावणारे चाळीतल्या माणसांचे सामाजिक जीवन आणि स्वभाव यांचा सुंदर मिलाफ साधत मुंबईच्या चाळसंस्कृतीचे वर्णन आपल्या खास शैलीत पु.ल.देशपांडे यांनी केले आहे.यातील विविध व्यक्तींच्या पैलूंचे शब्दलेखन लाजवाब आहे.
बारा लेख वजा अध्यायात चाळीचे पुराण मांडले आहे.सांस्कृतिक चळवळ, सांस्कृतिक शिष्टमंडळ, निष्काम साहित्यसेवा,गच्चीसह-झालीच पाहिजे, राघूनानांची कन्येस पत्रे,काही वासऱ्या, काही स्त्री गीते,उपास,आगामी आत्मचरित्र,भ्रमण मंडळ,संगीतिका आणि एक चिंतन.हे सर्व लेख जणवाणी,साधना, हंस,दीपावली,विविधवृत्त,शिरीष, किर्लोस्कर आणि सत्यकथा इत्यादी मासिकांतून पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत.
‘बटाट्याची चाळ’क्रॉफर्ड मार्केटातील टोपल्यांचे व्यापारी कै.धुळा नामा बटाटे यांनी १८८०साली कशी बांधली. तसेच तेंव्हापासून ती निरनिराळ्या मालकांच्या हाती जात जात,चाळीचे भाडे वसूल करणारा आद्य पुरभय्या देवकीनंदन तिवारी ह्याचा खापरपणतू जानकीदुलारे तिवारी ह्याच्या मालकीची कशी झाली.तो इतिहास विनोदी ढंगाने रंगवला आहे.बिऱ्हाडकरु व मालक यांच्या स्वभावाचे विविध इरसाल नमुने वाचायला मिळतात. सोकाजी,बाबलीबाई,बाबूकाका खरे,बाबा बर्वे,कुशाभाऊ अक्षीकर,मंगेशराव हट्टंगडी, वरदाबाई हट्टंगडी,नागूतात्या आढ्ये, प्रा. कल्पलता फुलझेले, अण्णा पावशे,राघूनाना सोमण आणि इतर ही व्यक्तीचित्रे वाचताना प्रत्यक्ष ही पात्रे आपल्या सभोवताली अथवा अवतीभवती असतात याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते.
अप्रतिम विनोदी शब्दसाजातील कथासंग्रह.
आस्वादक: श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक:२२सप्टेंबर २०२६

Comments
Post a Comment