वाढदिवस शुभचिंतन












आपुलकीच्या नात्याचा नवा आयाम… वाढदिवसाचे शुभचिंतन! 

काही नाती रक्ताची नसतात… ती मनाची असतात. काही भेटी मोलाच्या नसतात… त्या भावनेने अनमोल ठरतात. आणि काही क्षण क्षणिक असतात… पण आयुष्यभराच्या आठवणी बनून मनात घर करून राहतात!
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे अशाच निरागस, निर्मळ आणि संस्कारमय भावबंधाचं असतं. शिकवताना शिक्षक ज्ञान देतात; पण नकळत ते विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची, संस्कारांची आणि माणुसकीची पेरणीही करत असतात. म्हणूनच शिक्षकांचा वाढदिवस हा विद्यार्थ्यांसाठी केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस राहत नाही; तो आपुलकी व्यक्त करण्याचा, ऋणानुबंध जपण्याचा आणि आपल्या मनातील प्रेम कृतिशील करण्याचा एक सुंदर उत्सव बनतो.
वाढदिवस जर आपल्या वर्गशिक्षिका किंवा वर्गशिक्षकांचा असेल, तर त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनातील उत्साहाला वेगळंच उधाण आलेलं असतं.त्यांच्या छोट्या-छोट्या कल्पना, आग्रह आणि प्रेमळ सूचना शिक्षकांनीही आनंदाने स्वीकाराव्यात लागतात. कारण शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नसतं; ते मूल्ये आणि संस्कृती यांच्या आचरणाचे, अनुकरणाचे आणि संवर्धनाचे नातं असतं.
आपल्या वाढदिवसाची खबर विद्यार्थ्यांना दोन दिवस अगोदरच लागलेली असते. मग आपल्या मित्रमंडळींत चर्चा सुरू होते. “सरांना किंवा मॅडमना वाढदिवसानिमित्त काय द्यायचं?” आणि इथूनच सुरू होतो आपल्या कुवतीनुसार भेटवस्तू तयार करण्याचा किंवा थोड्याशा पैशांत एखादी वस्तू खरेदी करण्याचा सुंदर प्रवास. काहीजण आपल्या वर्गशिक्षिकेची मदत घेऊन भेटवस्तू निवडतात, तर काहीजण ती स्वतः तयार करतात. 

काही विद्यार्थ्यांनी वहीच्या किंवा चित्रकलेच्या वहीतील पान अलगद फाडून, त्यावर स्केचपेनने अक्षरांची सुंदर रेखाटने करून ‘भेटकार्ड’ तयार केले.शाळेच्याच परिसरातील पाने, फुले आणि डहाळ्या गोळा करून काही मुलींनी नाजूक, इवलेसे ‘पुष्पगुच्छ’ तयार केले. तर काहींनी ऑफिसमधील सरांच्या टेबलचा परिसर फुलांनी सजवून टाकला.
काही विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिकेचे सहकार्य घेऊन सरांच्या छायाचित्राची प्रिंट काढली आणि त्याची ‘बॉक्स फोटो फ्रेम’ तयार करून भेट दिली. ही त्यांच्या कुवतीनुसार केलेली नवनिर्मिती नव्हे काय?
काहींनी नुकतेच रंगभरण केलेले गणपती बाप्पांचे सुंदर कोलाज सरांना भेट दिले. काहींनी तर खाऊच्या डब्यात स्वतःसाठी आणलेला पदार्थ सरांना खाऊ घातला. काही मुलांनी कॅडबरी देऊन शुभेच्छा दिल्या आणि ती खाण्याचा आग्रहही केला.तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकपेशाची ओळख असणारी, प्राणप्रिय लेखणी भेट देऊन वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.
खरंतर, या निरागस मुलांनी एक जंगी सोहळाच बहारदारपणे साकारला.आठवणीत कायमचा राहील असा! संगीताच्या तालावर, हसत-खेळत आणि गाणी म्हणत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मग वर्गनिहाय गर्दी करत, एका भेटवस्तूला सर्वांनी हात लावून ती वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सरांच्या स्वाधीन केली.त्या निरागस स्पर्शातून व्यक्त झालेली आपुलकी,प्रेम आणि आदर शब्दांपलीकडचा होता.
सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी शुभचिंतन केले.तदनंतर सफरचंदांचा खाऊ  खाऊन वाढदिवस साजरा झाला.खरंच, मुलं अनुकरणीय असतात… आणि त्यांच्या निरागस कृतींतून संस्कारांची सुंदर पेरणी होत असते!

शब्दांकन : श्री. रवींद्रकुमार लटिंगे


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प