पुस्तक परिचय क्रमांक:२८४ मराठी साहित्य शोध आणि बोध
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८४ || पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध
लेखिका – अनिता जाधव
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह, महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता – श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे, ओझर्डे–वाई
पुस्तक परिचय क्रमांक – २८४
पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध
लेखिका – अनिता जाधव
प्रकाशन – समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती – १ एप्रिल २०२६, प्रथमावृत्ती
पृष्ठसंख्या – १५०
वाङ्मय प्रकार – समीक्षा ग्रंथ
किंमत / स्वागत मूल्य – ₹२२०
---
मराठी भाषा म्हणजे सौंदर्याची खाण आणि तिचे वैभव म्हणजे लिखित साहित्य. विविधांगी साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे वाचन व लेखन करून, समर्पक शब्दांत लेखक-कवींचे विचारविश्व आपल्या ओजस्वी शैलीत उलगडून दाखवणे आणि वाचक-रसिकांना ‘शब्दगंध’ अनुभवण्यासाठी उद्युक्त करणे, हे एका साहित्यसमीक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते.
पण लेखिका अनिता जाधव यांनी केवळ वाचन-लेखन न करता, त्यांना आवडलेली, भावलेली, चिंतनात्मक आणि सकारात्मक विचार करायला लावणारी पुस्तके निवडून त्यांचे समीक्षण एका सुंदर ग्रंथात गुंफले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक आणि हार्दिक अभिनंदन!
लेखिका अनिता जाधव या प्राथमिक शिक्षिका असून विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील अध्यापिका आहेत. त्यांना वाचनाचा व्यासंग असून काव्य व कथा लेखनातील नवनिर्मितीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांचे कोंदण लाभले आहे. वाचन साखळी समूहाचा ‘वाचनयात्री पुरस्कार’ही त्यांना जाहीर झाला आहे.
आपल्या मराठी साहित्यातील समर्पक अक्षरकृतींचे वाचन, चिंतन आणि मनन करून त्यांनी सदतीस पुस्तकांचे समीक्षण ‘मराठी साहित्य शोध आणि बोध’ या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. सुंदर आणि समर्पक मुखपृष्ठ आपल्याला साहित्यदर्पणातील लोकप्रिय व नामांकित साहित्यिकांचे साहित्य वाचायला मिळणार असल्याची जाणीव करून देते. मुखपृष्ठाची रचना इतकी अप्रतिम आहे की, सरस्वतीच्या प्रांगणातील अनेक तेजस्वी लेखक-लेखिका, कवी-कवयित्री यांच्या साहित्याची ओळख तर होतेच; परंतु त्या पुस्तकांची खासियतही मनात येते.
मलपृष्ठावर सातारा येथे संपन्न झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी यांचा शुभेच्छा संदेश आहे. हा संदेश वाचनसंस्कृतीला दिशादर्शक आहे.
‘माझं कवितांचं गाव’ जकातवाडीचे अध्यक्ष तथा शिक्षक सन्मित्र श्री. प्रल्हाद पारटे यांची प्रस्तावना या ग्रंथाची आशयघनता अधोरेखित करते. साहित्याची सफर करताना भाषेतील साहित्यशृंगार आणि मानवी नात्यांचे ऋणानुबंध दाखवत स्त्रियांची माया, ममता, विरह आणि आर्तता अलवार शब्दांत व्यक्त केली आहे.
जावळीचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ यांचा शुभेच्छा संदेश लेखिका अनिता जाधव यांच्या लेखनास प्रेरणादायी आहे.तर मनोगतात या साहित्यनिर्मितीसाठी ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी दिलेले आत्मबळ आणि सहकार्य याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एकंदर सदतीस पुस्तकांचे समीक्षण या ग्रंथात आहे. अनेक साहित्यिकांची सुप्रसिद्ध पुस्तके आपणास एकाच ग्रंथात वाचायला मिळतात. विशेषतः स्त्रियांचे जीवनप्रसंग, घटना, गोष्टी आणि कथा यांवर लेखन केलेल्या पुस्तकांचा समावेश या ग्रंथात आहे.
ही समीक्षणे वाचताना तेच पुस्तक आपण वाचत आहोत, असा भास निर्माण करण्याचे कसब लेखिकेच्या लेखनशैलीत आहे. प्रत्येक समीक्षणातून पुस्तकाचे अंतरंग, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा सुरेख संगम साधत, स्मरणात राहतील असे काही प्रभावी प्रसंग संक्षेपाने सांगितले आहेत. एखादे मनभावन काव्य मनाच्या गाभाऱ्यात संवेदना जागृत करायला लावते. असे एकंदर सहज, सुंदर, अलवार आणि सर्जनशील लेखन या ग्रंथातून अनुभवायला मिळते.
नेमके लेखकाला अथवा कवीला त्यांच्या साहित्यातून कोणती विचारधारा किंवा संदेशवहन करायचे आहे, याचे विवेचन समर्पक शब्दांत सादर केले आहे. अन् विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रत्येक समीक्षणानंतर त्या पुस्तकातील विचारवेध सुविचारांच्या स्वरूपात मांडले आहेत.
समस्त जनांच्या ‘माई’ सिंधुताई सपकाळ यांचे ‘मी वनवासी’ आत्मचरित्र, कवी जालिंदर मोरे यांचा मनभावन काव्यसंग्रह ‘तुझ्यासाठी तुझ्याविना...’, गुजराती साहित्यिक धीरुबहेन पटेल यांची ‘आगुंतुक’ कादंबरी, संवेदनशील मनाचे समाजशिक्षक साने गुरुजी यांनी लेखणीतून उतरवलेली ‘चित्रकार रंगा’ ही कादंबरी आणि ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या रंगाची कहाणी यांचा सुंदर परिचय या ग्रंथातून घडतो.
ह. मो. मराठे यांचा ‘पक्षिणी’ कथासंग्रह संघर्षातून आयुष्याची हिरवळ निर्माण करण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करायला शिकवतो. या कथा जीवनातील वास्तव पटवून देणाऱ्या आहेत.
गावकुसाच्या परीघाबाहेरील वंचित, तळागाळातील कष्टकरी लोकांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून त्यांचे वास्तव जीवनगाणे शब्दबद्ध करणारे आणि प्रवाही लेखणीतून व्यक्तिचित्रे रेखाटणारे कलमबहाद्दर म्हणजे महादेव मोरे. आयुष्यभर पिठाच्या गिरणीत दळण दळून देत त्यांनी अत्यंत सकस, कसदार लेखन केले. कर्नाटकातील निपाणीसारख्या प्रदेशात राहून त्यांनी ग्रामीण मराठी साहित्याचा ठसा उमटविला आहे. त्यांची ‘आडगार’ कादंबरी वाचताना मनात अस्वस्थता निर्माण होते. इतके अप्रतिम हे लेखन आहे.जयश्री काळे यांची ‘दैवगती’ ग्रामीण कथाविश्व उलगडून दाखवते.
शेतकऱ्यांच्या कष्टाने भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळतो, तो श्रीराम घडे यांच्या ‘रुमणं’ या काव्यसंग्रहातून. शहरात असताना गावगाड्याची आठवण आली की कवीचे मन अधीर होते आणि हृदयातले भाव कागदावर कसे उतरतात, याची प्रचिती हे समीक्षण वाचताना येते.शैक्षणिक चिंतन करायला लावणारे राम क्षीरसागर यांचे ‘असे शिक्षण, असे संस्कार’ हे पुस्तक आहे.समाजसेविका अरुणा सबाने यांचे जीवनगाणे शब्दबद्ध करणारी अक्षरकृती ‘सूर्य गिळणारी मी’ आहे.
तरुण तडफदार शिक्षक सन्मित्र तथा लेखक सचिन बेंडभर यांची ‘वर्तुळ’ कादंबरी जीवनाच्या ऊन-सावलीचा उलगडा करते.वैभव डांगरे यांचा ‘वैरी मन’ हा चारोळी संग्रह आहे.
शिक्षणतज्ज्ञ व नामवंत लेखिका लीला पाटील यांचे ‘परिवर्तनशील शिक्षण’ हे पुस्तक शिक्षक व पालकांना हितोपदेश करणारे आहे.पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे ‘महात्मा फुले आणि शिक्षण’ हे ललित लेखसंग्रह असून, परखडपणे शैक्षणिक विचार पटवून देणारे लेख वाचनीय आहेत.तसेच लक्ष्मण हेंबाडे यांचा ‘पांदवाट’ काव्यसंग्रह, ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांचे ‘माणुसकीचे जागरण’, प्रतिभावंत विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे संकलन असणारे ‘अंधाराचे बुरुज ढासळतील!’, वामनराव पै यांचे ‘परमेश्वर आहे का?’ या पुस्तकांचा जीवनदायी संदेशही या परिचयातून सहज समजून येतो.
ॲड. वर्षा देशपांडे लिखित ‘स्टिंग ऑपरेशन’, दीर्घायुषी जीवनाचे सार समजून देणारे श्री. प्रसाद ढापरे अनुवादित ‘इकिगाई’, व. पु. काळे यांचे ‘एक अजबच पॅटर्न’ — त्यांच्या कथा ऐकाव्यात त्यांच्याच आवाजात अन् वाचाव्यात त्यांच्याच कथासंग्रहात! रसिक वाचकांना टेन्शनफ्री करण्याचे अजब रसायन त्यांच्या अनेक कथांमध्ये आहे. ‘गोष्ट हातातली होती!’ यातील कथाबीज सुंदर मन आणि विचारांवर आधारित आहे. यातील कोटेशन्स तर लाजवाब आहेत. कुतूहल वाढवणाऱ्या शब्दसाजात आणि सहज, सुंदर, प्रवाही शैलीत कथा फुलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीला लाभलेले आहे. रसिक वाचकांना त्यांच्या कथांचे गारूड मनाला मंत्रमुग्ध करते.
अनेकांच्या मनातील रंगपेटीतील रंगांसारखी पती-पत्नीच्या नात्यातील वीण उलगडून दाखविण्याची किमया त्यांच्या गाजलेल्या अनेक कथांतून वाचताना अनुभवायला मिळते. इतका निर्मळ आणि निर्भेळ आनंद रसिकांना मिळत राहतो. पुस्तकातील कथेचा आस्वाद घेताना पुढील कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. अशा सुंदर शब्दांत पुस्तकाचा परिचय करून देण्यात आला आहे.
वास्तव लेखन करून काळजात घर करायला लावणारा कथासंग्रह म्हणजे अशोक रास्ते लिखित ‘चवंडकं’. राजेश साबळे यांचा ‘खंत’ हा कथासंग्रहही उल्लेखनीय आहे.‘समिधा’ किती यथार्थ आणि सार्थ नाव आत्मकथेला लाभले आहे! जसे यज्ञात आहुती देण्यासाठी एकेक काडी अर्पण करून यज्ञाचा अग्नी प्रज्वलित होतो, त्याचप्रमाणे त्या समिधेला किती चटके आणि झळ सोसावी लागते, याची प्रचिती ही कथा वाचताना येते. बाबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना आलेल्या संकटांना साधनाताईंनी धीरोदात्तपणे साथ दिली आहे.
सचिन बेंडभर यांचे मनोरंजक बालसाहित्य ‘वाघोबाचा मोबाईल’, ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पत्नीच्या सहवासातील आठवणींचा पट सुंदर शब्दांत मांडणारे पुस्तक आहे.समीर दरेकर यांचे ‘पणतीला जपताना’ तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे.
श्री. विलास वरे यांचे ‘बहिष्कृतांचे अंतरंग’, डॉ. आ. ह. साळुंखे लिखित ‘त्यांना सावलीत वाढवू नका!’, अपर्णा कुलकर्णी यांचे सहनशीलतेतून संवेदनशील मनाने जगणे कसे असते, याची ओळख करून देणारे ‘एका क्षणाची गोष्ट’ हे लेखनही उल्लेखनीय आहे.
कविमनाचे गायक संदीप खरे यांचे ‘नेणिवेची अक्षरे’ दर्जेदार कवितांची मैफल रंगवते. तर विश्वनाथ पालवे यांचा ‘निखारे’ काव्यसंग्रह माणसाची माणुसकी चित्रित करणारे सुंदर लेखन आहे.‘मनातले सारे’ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले कलाकार संजय डोळे यांची काव्यरचना आहे.स्वाती चेणके यांचा ललित लेखसंग्रह ‘हा सागरी किनारा’ स्त्रीमनाच्या संवेदनांची जाणीव करून देतो. तर मातृत्वाचा पाझर डॉ. संजय लांडगे यांनी ‘ईश्वररूप आई’ या लेखसंग्रहातून शब्दांत फुलवला आहे.
लोकप्रिय कादंबरीकार अरुण नासिरकर यांची ‘मातीची माणसं’ ही कादंबरी सर्वसामान्य माणसाचे संघर्षमय जीवन दाखवून देणारी आहे. अतिशय समर्पक शब्दांत कादंबरीतील आशयाचे समीक्षण केले आहे.
साहित्यातील विचारवेध, पुस्तकांचे वाचन आणि लेखन करून त्यांचा शोध घेतला आहे आणि वाचक-रसिकांना त्यातून बोध घेता यावा, यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. याबद्दल लेखिका अनिता जाधव यांचे शतशः आभार!
आस्वादक –
श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे
ओझर्डे, वाई
लेखन दिनांक – १४ सप्टेंबर २०२६


Comments
Post a Comment