पुस्तक परिचय क्रमांक.२८३ कृष्णामाई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८३
पुस्तकाचे नांव-कृष्णामाई
लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर
प्रकाशन-न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२५
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१५२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८३ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -कृष्णामाई
लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कृष्णाकाठच्या गावातील माणसांच्या वास्तव कथा..
महाराष्ट्राची जीवनदायी, जीवनवाहिनी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्र वसलेली आहेत.अगदी उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत वेगवेगळ्या देवादिकांची आहेत.कृष्णामाई महाबळेश्वर येथे उगम पावते अन् वाई, सातारा,सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात प्रवेशते.कृष्णेच्या काठावरील बहे गावचे सुपुत्र लेखक श्री प्रदीपकुमार कांबळे यांनी ‘कृष्णामाई’या कथासंग्रहाचे लेखन केले आहे.या पुस्तकावरील आकर्षक आणि देखणं मुखपृष्ठ कृष्णामाईच्या बहे येथील तीरावरील ‘रामलिंग बेट’ अतिशय सुंदर आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.अवखळ अन् वेगाने वाहणारी कृष्णामाई ; कोयनेच्या प्रितिसंगमानंतर तिचं पात्र विस्तारत जातं. अन ती संथ गतीने वाहते.
कृष्णामाई म्हणजे जीवनदायीनी, काठावरील गावांना सुजलाम सुफलाम करणारी ग्रामनिवासिनी.तिच्या काठावरील गावांतील सामाजिक,सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ व सर्वश्रुत नररत्नांची ओळख मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’ मधून दिसून येते.तसेच कृष्णानदीचा उगम ते मिलन असा प्रवाहाचा प्रवास अधोरेखित केला आहे.
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या परळ मुंबई येथील कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार कांबळे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यांनी या पुस्तकातील आठ कथांची ओळख सारांशरुपाने मांडली आहे.नदीकाठच्या गावगाड्यातील माणसांच्या अंतरंगातील स्वभावाची,त्यांच्या वृत्ती- प्रवृत्तीची,जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची,समाजमनाला प्रेरणादायी व्यक्तींची शब्दचित्रे कथांमधून लेखक प्रदीपकुमार कांबळे -बहेकर यांनी मांडलेली आहेत.
गावच्या मातीतील या वास्तववादी कथा गोष्टी असतील असं आपणास वाचन करताना पानोपानी दिसून येते. सहज सुंदर शब्दात आणि गावच्या साध्यासुध्या सोप्या बोलीभाषेतील आपल्या भाषेतील अक्षरसाहित्य वाचताना काळजाचा ठाव घेते.तर कथेतील नायक आणि नायिका आपल्या हक्कासाठी व स्वाभिमानासाठी संघर्ष करताना दिसतात.हेच सर्व कथांचे आशयबीज आहे.
लेखक ‘अंतरंग’या लेखात या पुस्तकातील कथांचे आशयविषय संक्षिप्तपणे मांडून कथा वाचण्याची लालसा निर्माण करतात.भावकी,पैज,वादळ,कोरोनाची हार, कृष्णामाई,फरारी, कीर्तन,सरपंच या एकापेक्षा एक सरस कथांचे लेखन केले आहे.विशेष म्हणजे’कृष्णामाई’ या कथासंग्रहात गावगुंडापासूनआयाबहिणींचे रक्षण करणारे,अन्यायाला वाचा फोडणारे बोरगावचे लोकप्रिय बापू बीरु वाटेगावकर यांची प्रत्यक्ष भेट लेखकांशी ईश्वरपुरच्या बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात झाली.अन् त्यांची मुलाखत ‘फरारी’आणि ‘वादळ’ कथेतून मांडलेली आहे.या कथा आपण वाचताना मंत्रमुग्ध होऊन जातो . इतकं सुंदर लेखन लेखकांनी केले आहे.
महादेववाडीच्या पवार आणि सावंत भावकीतील हाडवैर आणि संघर्ष अटळ असतानाच त्यांच्या मुलांमध्ये (संगीता व रमेश) प्रेमसंबंध निर्माण होते.त्यामुळे वादावर ठिणगी पडते.त्यातच या लफड्यामुळे रमेशचे वडील दिनकर आत्महत्या करतात.पण यातून तावून सुलाखून बाहेर पडायला त्यांचा कॉलेज मित्र कुमार मदत करतो.दोघांच्या घराला पटवून देतो.अन् वैर जाऊन त्या दोघांचे लग्न होते.अन वैरभाव संपतो.ती भावकी
कथा रंगतदार वळणावर थांबते.
गावचा पार म्हणजे हल्लीचे व्हाटस्अप गावातल्या सगळ्या भानगडींचे रवंथ पारावर होणारच.त्यातच् जीवनातील मौजमजेचा अनुभव सिध्दता म्हणजे वेगळीच नशा चढते.अशीच विनोदीकथा
‘पैज’दोन मित्रांमध्ये (हंबीर व बाळू) गावच्या प्रतिष्ठित सखा पाटलाच्या मुलाच्या लग्नाच्या पंगतीत बसून, ‘कोण जास्त जेवतय’याची पैज लागते.त्यामुळे भरपेट जेवल्यावर बाळूवर काय प्रसंग उद्भवतो.त्याची कथा शंकर पाटील यांच्या सारखी खुमासदार शैलीत सादर केली आहे.’कोरोनातील हार’या कथेत प्रत्यक्ष कोरोनाची लागण लेखकाला होते.मग प्रत्यक्ष कोवीडसेंटर मध्ये जगलेले क्षण शब्दबध्द केले आहेत.ते वाचताना देवरुपातील डॉक्टरांचे खरं रुप दिसतं.ते चित्रण उभं केलं आहे.तर शीर्षक कथा ‘कृष्णामाई’कथेत राधाच्या संघर्ष आणि बंडखोरीची कथा.पुरुषप्रधान संस्कृती विरुध्द केलेला विद्रोह या कथेचे बीज आहे.आठवणींच्या साठवणीतील घटना राधापुढे तराळतात.१९७२ च्या दुष्काळात ती रामलिंग येथील बंधाऱ्याच्या कामावर
असताना तिच्या व्यसनी नवऱ्याने केलेल्या हल्ल्याची आठवण येते.मग तिचं पहिलं लग्न, व्यसनी नवरा, नवऱ्याला सोडणं, मोलमजुरी करणं,नवऱ्याचा हल्ला, दवाखान्यात जाणं,बहिण राणी दीराबरोबर दुसरं लग्न लावून देणं. तिचा दुसरा संसार अन् माहेरी आल्यावर रामलिंगच्या यात्रेला येणं…असं कथानक पुढं सरकत जातं…एखाद्या सिनेमाची कथाच वाटते.
किर्तन परंपरेची महती पटवून देणारी व खरा मानव धर्म कोणता यांची ओळख करून देणारी ‘कीर्तन’कथा संतांचे विचार
आचरणातून संस्कार दाखविणारी कथा. बोरगावच्या जत्रेचे आणि ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचे विवेचन अतिशय समर्पक शब्दात वर्णन केले आहे.तर पंढरपुरला वैभव व त्यांचे मित्र वारीला गेल्यावर माळ
घालतात.अन् शाकाहारी होऊन किर्तन भजनाकडे ओढावतात.सासरच्या यात्रेला गेल्यावर वैभवची जेवणावरुन झालेली अवस्था अतिशय भावनिक शब्दात मांडली आहे.तसेच सरपंच कथेत तर एक मध्येच शिक्षण सोडलेल्या केशव व दत्तू या सुशिक्षित दाम्पत्याच्या दत्तक घेतलेल्या सागर या मुलाची कथा ‘सरपंच’.शाळेत मुलांच्यात खेळताना शिकताना मस्ती करताना त्याच्या तक्रारी वाढतात.त्याची चुक नसताना त्यावरच कायम बालंट.मग मन रमेना म्हणून तो आजोबांच्या बरोबर शेती करायला लागतो.तिथं रानातील तो शेड बांधून मजेत राहतो.एकदा मुलांच्या आणि पत्नीच्या सतत बोलण्याने, उपमर्द झालेला,भांडणाने कंटाळून गेलेला नारायण. जो पुर्वी गवंडी काम करून चरितार्थ चालवित होता.घरी एकटा पडल्याने संन्यासी होऊन नारायणाचा स्वामी होतो. रमतगमत सागरच्या शेतावर येतो.तिथं त्याचं मन रमतं.तो स्वामीला छोटं मंदिर बांधून देतो.कालौघात लोकांना स्वामींची कृपा होते.भक्तगण गाऱ्हाणी घेऊन येतात.ती नारायणस्वामी सोडवितो. त्याचा चांगला जम बसायला लागतो.तर स्वामींची भक्ती सागरने केल्यामुळे त्याची गावात पण वाढते.त्यास गावकरी सरपंच करतात.तो गावचा कारभारी म्हणून कायापालट करतो.ज्या शाळेची कौलं काढून तो बाहेर पडला होता.आणि तदनंतर शाळेचे तोंडही पाहिले नाही.त्याच सागरने सरपंच झाल्यावर शाळेची इमारत फंड उभारुन बांधली.अशी संस्कारित करणारी ‘सरपंच’ कथा.
यातील आठही गोष्टीं मराठी सिनेमाच्या पटकथा होतील इतक्या अप्रतिम कथा आहेत.अन् लोकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती होतील; इतक्या सकस आणि दर्जेदार कथांचा विषय आहे.यापैकी बापू बीरु वाटेगावकर यांच्यावर सिनेमा प्रदर्शित झालेला आहे.
‘कृष्णामाई’या कथासंग्रहातून गावातील सर्वसामान्य व भाबड्या जनतेच्या असामान्य कामगिरीचे रेखाटन अतिशय समर्पक शब्दात केले आहे.बापू बीरु वाटेगावकर यांचा जीवनपट प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दातून मांडलेली कथा फरारी अप्रतिम कथा.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ६ ऑगस्ट २०२६

Comments
Post a Comment