माझी आई




मातृहृदयाचे मंगल स्त्रोत्र
      माझी आई 
   
आई म्हणजे आमची पंढरी
सुखीसंसार हीच तिची वारी
तिने घेतली या जगातून भैरवी
नेत्रात पालवती अश्रुंच्या सरी||१||
आई घरकुलाची गोधडी 
आई आयुष्याची नावाडी
आई जादुगाराची पोतडी
आई तराजूची पारडी||२||
तिच्या हातची खावी वडी
कानावले अन् खिचडी
रुखवताची भरुन दुरडी
घेई उखाण्याची रेलगाडी ||३||  
चवदार भोजनाची सुगरण 
जसे दुधाच्या सायीचे आवरण
आर्त वेदनांचे केले आचमन
स्मृतीपटावर पाझरते आठवण||४||
 गोतावळ्यातील मायमाऊली
आभाळमाया आम्हा लाभली 
तुझ्या आधारवडाची सावली 
आम्हा समद्यांना सदैव मिळाली||५||
आमच्या झोळीत पडलं 
इतरांना सहकार्याचे दान 
आम्हाला संस्कारक्षम केलं 
याचा आहे आम्हा अभिमान||६||
कष्टाचा घाम शेतात गाळून
दुसऱ्यांचे बांध धुंडाळले
आहे त्यात समाधान मानून 
जीवन आमचे उभारले  ||७||

भावाबहिणींच्या प्रेममायेची आक्का 
ऋणानुबंध जपण्याचा इरादा पक्का
सणवार लग्नकार्याला समद्या कामाची 
आळीतल्या सगळ्यांची'मामी'हक्काची ||८||

यमुनासुत रवींद्र लटिंगे
—----------------------------------------

आई माझं दैवत!

काबाडकष्ट करून 
आम्हाला वाढवलं
शेतात घाम गाळून 
आम्हाला  घडवलं ||१||
आमचे बालहट्ट 
स्वता:चे मन मारुन पुरवले
स्वत: मेहनत करून 
आम्हाला संस्कारीत केले ||२||
कष्टानं जगण्याची 
शिकवण दिली 
खऱ्यानं वागण्याची 
सवय लावली ||३||
समाधानी वृत्तीनं 
जगण्याची उमेद दिली
निस्वार्थी सेवेची 
उर्मी निर्माण केली ||४||
मायेचा आधार
कष्टाची भाकर 
जीवनाचे सार 
मांगल्याचे घर ||५||
आमची सावली
कृपाळू माऊली 
आजारात धावली 
कनवाळू माऊली||६||
 मायेची ऊब कुशीतली
आम्हाला सतत लाभली 
तुझ्या आधाराची सावली 
आम्हाला सदैव मिळाली||७||
आमच्या झोळीत पडलं 
इतरांना सहकार्याचे दान 
आम्हाला सुसंस्कारित केलं 
याचा आहे अभिमान||८||
मायमाऊलीची स्नेहाळदृष्टी  
हीच तिची आभाळमाया
सदोदित आधाराची सृष्टी 
मनोभावे पडावे तिच्या पाया....!!
श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे वाई सातारा

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी