पुस्तक परिचय क्रमांक:२१९ मन सांधते आभाळ
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१९
पुस्तकाचे नांव-मन सांधते आभाळ
कवयित्री:सौ.मनिषा शिरटावले
प्रकाशन-प्रणीत प्रकाशन, सातारा
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २०२१
पृष्ठे संख्या–१००
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: मन सांधते आभाळ
कवयित्री:सौ.मनिषा शिरटावले
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“कविता म्हणजे अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्यगर्भ असा उद्गार! ही सहज साधना नव्हे, त्यासाठी चिंतनऊर्जेचा दाह सहन करावा लागतो. तेंव्हाच त्या अक्षरांच्या चित्रलिपीला प्राणसत्वासह अक्षरत्व प्राप्त होतं.शब्दांची विटकळं रचून कवितेचे किल्ले बांधता येत नाहीत.”किती अप्रतिम!काव्याचे सौंदर्यक विचार मांडले आहेत. असाच एक संवेदनशील कवयित्री मनिषा शिरटावले यांनी आपल्या मनातील विचारतरंग अक्षरधनात गुंफले आहेत. “मन सांधते आभाळ”या संग्रहात.किती सुंदर शिर्षक आहे.जणू काही माझ्या मनातील विचारांनी आभाळाला एकसंघ करण्याचा प्रयत्न.
"मन सांधते आभाळ”या काव्यसंग्रहातील रचना त्यांच्या मनचक्षूने पाहिलेल्या, निरीक्षण केलेल्या मनभावना, जीवनाचे विविध रंग आणि अनुभवांचे सखोल विश्व अधोरेखित करणाऱ्या आहेत.अगदी अलवार स्पर्शाने रफ डायरीत फावल्या वेळेत लक्षात भावस्पर्शी शब्दांनी गुंफत समर्पक शब्दांचा साज चढवत सृजनशील काव्यांची निर्मिती केली आहे.कवितेची रचना करताना जो मनाला आनंद मिळतो.यासाठी व्यासंगी असणारी व्यक्तीच एखादा विषय पटवून देण्यासाठी मनातील विचारतरंग शब्दबध्द करत काव्य रचतात.
संवेदनशील कवयित्री मनिषा शिरटावले या सातारा जिल्ह्यातील एक सक्रिय आणि सर्जनशील साहित्यिक असून जिल्हा पुरस्कार विजेत्या उपक्रमशील अध्यापिका आहेत.
मनाला भुरळ घालणारे आणि आशय बीज उलगडून दाखविणारे आकर्षक मुखपृष्ठ.तर मलपृष्ठावर कवयित्री मनिषा शिरटावले यांचा शाळेतल्या चिमणी पाखरांचे सर्वांगीण विकासासाठी अंतरंग खुलविणारा परिचय! अन् कवितांची आशयघनता अधोरेखित करणारा ‘ब्लर्ब’ तर वाचून विचार करायला लावणारा किती सार्थ तेची प्रचिती करून देतो.
“क्षणापुरताच सहवास देणारी माणसे वाचताना,मिळणारी
सल अंतर्मनातून सदा सावरणारी
खोलवर असताना उभारणारी
मनाच्या कप्प्यामध्ये
नवीन उजेडाची एकच ओळ
प्रवासाच्या चक्रामध्ये
नवीन आनंदानुभवाची एकच जोड….”
कवयित्रीच्या कलांना वावदेणारे मातृपितृ, सासूसासरे आणि परिवारातील सर्व स्नेहीजणांना हे पुस्तक अर्पण केले आहे.या काव्यसंग्रहाला त्रिवेणी (लेखक, कवयित्री व रसिक वाचक) साहित्यातील जाणकार व्यक्तींच्या प्रस्तावनेचे कोंदण लाभले आहे.जेष्ठ साहित्यिक श्री.विलास वरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात या काव्यसंग्रहातील वैशिष्ट्यपूर्ण कवितांचा आशय मांडलाय. तर मार्गदर्शक कवी प्रदीप कांबळे यांनी या काव्यसंग्रहाच्या निर्मितीचा प्रवास अधोरेखित केला आहे.समाजातील सुक्ष्म जाणिवा टिपून तसेच स्व:परीघातील बिंदूचे अवलोकन करत,त्यातील कल्पना,विचारधारा शब्दात गुंफून त्यांची केलेली सृजनशील रचना रसग्रहण करताना काळजाचा ठाव घेते. त्यांच्या कुटूंबीतील सदस्या जाऊबाई सौ.साधना यांनी कविता लेखनाच्या छंदाची स्तुती प्रस्तावनेत करून काही कवितांचा आशय समजावून दिला आहे. घरातून होणार कौतुक हे निस्सीम प्रेम व्यक्त करणारं असतं याची प्रचिती येते.
प्रशासकीय सेवेत असून काव्याचा व्यासंगी श्रीमती अंजली ढमाळ यांनी आपल्या सहेलीच्या प्रकाशित झालेल्या अक्षरधनास स्नेहाच्या मनभावन शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
मनोगतात हळव्या मनाच्या कवयित्री मनीषाताई ‘मनोगतात’ रसिक वाचकांशी हितगुज करताना म्हणतात की, “माझ्या तरल भावविश्वांच्या अनुभूती स्पष्ट अभिव्यक्ती आहेत.कवितेचे भावबंध वाचकांच्या भावविश्वाशी या हृदयीचे त्या हृदयी जोडले जावेत.अन् कवितांना माझे जीवन वाहत्या प्रवाहाप्रमाणे खळखळत, बहरत ठेवले आहे. ''वक्तृत्व स्पर्धांच्या प्रसंगातून निर्माण झालेली रचना,काव्य गायनाच्या मैफिलीत व्यक्त होऊ लागली. रसिक श्रोत्यांच्या शाबासकीने,कौतुकाने तर स्नेहीजणांच्या अभिप्रायाने ती छंदात बध्द झाली.मग डायरीतल्या पानावर लिहिताना तिच्यावर संस्करण होऊन ती सृजनशील रचना होत गेली.मग कविता करणाऱ्याचा व्यासंग झाला.असा कवितेचा प्रवास त्यांनी मनोगतातून मांडला आहे.
डायरीतल्या कविता ते प्रकाशित काव्यसंग्रह घडत असताना ज्या ज्ञात अज्ञात हातांनी सहकार्य केले.त्यावर संस्कार करायला मार्गदर्शकांनी कानमंत्र दिला.परिवारातील सर्वांनी आत्मबळ वाढवायला प्रेरणा दिली.वेळोवेळी कविता लेखन आणि गायन करताना रसिकांना दाद दिली. त्यासर्वांप्रती कृतज्ञतापूर्वक नामोल्लेख ऋणनिर्देशात केला आहे.
‘मन सांधते आभाळ’या मनभावन कविता संग्रहात शहात्तर कवितेचे नजराणा पेश केला आहे. ईश्वर,वैचारिक शब्द,षडरिपू,निसर्ग,भाषा,नातीगोती, सामाजिक ज्वलंत समस्या,अन्नदाता, सैनिक, प्रियकर,प्रेम,ऋणानुबंधातील आणि परिवारातील प्राणप्रिय व्यक्ती आणि वैयक्तिक अवकाश यांसारख्या विविध विषयांवर कविता मुक्तछंद, गेयता आणि दीर्घ कविता आहेत.प्रत्येक रचनेची व्यक्तता विचार आणि संदेश वाचकाला देणारी आहे.
‘पण…ती…’ दोन्ही घरांना प्रकाशाने उजळून टाकणारी आणि जगण्याला अमाप ऊर्जा देणारी पणती ही प्रारंभीची रचना अतिशय समर्पक शब्दात बांधली आहे.मुलीचं कर्तव्य आणि कर्म कसं असावं?याची जाणीव करून देणारं काव्य. तर स्त्रियांचं आयुष्य कसं असतं याची महती काव्यातून मांडली आहे.तर तुझ्या भक्तीशक्तीचं दान माझ्या पदरात घाल असे आर्जव करणारी ‘विठ्ठला’कविता.
नदीचं परोपकारी जगणं ‘सरिते’या कवितेत मांडलय.आपली जीवनदायिनी आणि अमृतवाहिणी सरिता कड्यावरून ओसंडून वाहत पुढं दगडधोंड्यातून खळखळत वाहताना भवतालच्या गावांचे भवितव्य तारते.अथांग अशा सागराला सर्वस्व अर्पण त्याची होतं.खूपच मनभावन कविता.
लावणीच्या चालीवर खूप छान स्वरात
‘माझी मराठी’ ही मायबोलीच्या प्रशंसेची गेय कविता एका कार्यशाळेत मला ऐकायला मिळाली.
माणसांना राग कुठंकुठं, कधीकधी प्रकट तो.त्या रागाच्या प्रसंगाचीआगीनगाडी घटनांचा राग आळवत ‘येतोच की राग’या काव्यात नथांबता रेखाटलाय.
जगाचा पोशिंद्याचं जिणं ‘शेतकरी बापा’या कवितेतून आपलं विचारचक्र फिरतं ठेवतं.
देशाच्या सीमेचे रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांना शब्दफुलोऱ्यातून सलामी ‘वीर अभिनंदन!’या काव्यातून दिली आहे.
‘पाऊस’ या कवितेतून त्यांनी आवडणाऱ्या पावसाचे प्रकार शब्दबध्द करत,त्या पावसाने परिसरातील जीवांवर काय घडतंय याचं अचूक वर्णन केले आहे.त्यातील तिसऱ्या कडव्यातील ओळी तर प्रेमाच्या सुखदुःखाचा गंध अंग शहारून टाकतो. किती सार्थ ओळी आहेत…
स्वप्नांच्या क्षितिजावर तिच्याच मिठीत भान विसरणारा पाऊस ….आसवांच्या धारांत, आठवांची ओंजळ भरुन घेणारा पाऊस….
‘स्वयंपाकघर’समस्त महिलांचे घरातील सर्वांत आवडते ठिकाण.जणु काही तीचा स्वर्गच.तिथल्या हरेक वस्तूंना तिचा स्पर्श झालेला असतो.अतिशय सुंदर अशी रचना केली आहे.
‘उदय ते अस्तात…’या काव्यातील मनाला भावणाऱ्या ओळी
पापण्यांच्या क्षितिजावरती दव अंथरतो
क्षणोक्षणी समोर असणारा तो हळूच नयनांत विसावतो. तर आक्रंदन का असे?
या काव्यातील हे शब्द मनाला गोडवा देतात.कारण तो वेदनेचा हुंकार आहे.
ठायी ठायी,भास तुझे
साद देती, शब्द तुझे
रोम जागवे,स्पर्श तुझे
मन नाचवे,गीत तुझे
बहर देई,स्मरण तुझे…
कवितेच्या अर्थांचे विश्लेषण करणारी कविता उपमातून विविधांगी रूपे दर्शवते.
अथांगअर्थ स्पष्ट करते.आशयघनता दिसते
मृदगंध गोड कोमल स्वर म्हणजे कविता
मधूर शब्दसाखळीचे बंधन म्हणजे कविता
जगण्यासाठी चिरंतन आधार म्हणजे कविता
क्षितिजावर धरेशी मिलन म्हणजे कविता
स्वकर्तृत्वाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपलं सर्वस्व अर्पण केलेल्या थोर व्यक्तिंची ‘उपेक्षित’कविता अप्रतिम आहे. वैचारिक मंथन करायला उद्युक्त करणारी रचना आहे.तर काही रचना माणसांच्या अंतरंगातील पैलू (चेहरेमुखवटे)उलगडून दाखविणाऱ्या’’असतात ‘अशी काही माणसे’ही रचना अप्रतिम आहे.
अतिशय सुंदर अशा मनभावन कविता आभाळ सांधत आश्वासक सकारात्मक विचार आणि संदेश ही पेरत जातात.
खूपच छान! रसग्रहणीय कवितासंग्रह आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १७ मे २०२५
Comments
Post a Comment