पुस्तक परिचय क्रमांक:२१२ वांझ
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१२
पुस्तकाचे नांव-वांझ
लेखक: मिलिंद भिवाजी कांबळे
प्रकाशन- प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१५ऑगस्ट २०२२
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–३३८
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-५००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-वांझ
लेखक: मिलिंद भिवाजी कांबळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
चारचौघात दबकत वापरला जाणारा ‘वांझ’हा शब्द पण लेखकाने तो शब्द आजची शिक्षणव्यवस्था कशी भ्रष्ट आहे.याचं वास्तव रुप C.H.B.तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचं जिणं अधोरेखित करणारी ही कादंबरी ‘वांझ’.
अहोरात्र मेहनत घेऊन प्राध्यापक व्हायचं ‘स्वप्न’ उराशी बाळगलेल्या युवकांची कशी फरफट होते. याचं जिवंत शब्दचित्र लेखक मिलिंद भिवाजी कांबळे यांनी रेखाटले आहे.
नेट सेट आणि पीएचडी अशा डिगऱ्या प्राप्त बेकार युवकांना नोकरीच्या शोधात कशी वणवण भटकंती करावी लागते? मुलाखतीत कसे टोमणे मारले जातात? नोकरीवर घेतल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी वागणूक कशी दिली जाते?बेकारीच्या खाईत लोटून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली जाते.याचं वास्तव वर्णन सडतोडपणे या कादंबरीत केले आहे.त्यांच्या जीवनात आलेली संकटे,व्यथा,वेदना,आक्रोश आणि वेठबिगारी यांचा शोध‘वांझ’ कादंबरीत स्पष्टपणे मांडलेला आहे.
लेखक तथा प्राध्यापक मिलिंद भिवाजी कांबळे यांच्या प्रकाशित साहित्याचा परिचय परिशिष्टात दिलेला आहे.त्यावर नजर टाकली तर माणुसकीच्या आभाळासाठी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी दीपस्तंभासारखे त्यांचे अक्षरधन आहे.
स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मानवी मूल्यांवर विश्वास असणारे तसेच फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विचारधारा पुढे नेण्याची धमक असणाऱ्या या कादंबरीचे नायक आणि नायिका व्यवस्था बदलण्यासाठी करत असलेला संघर्ष या कादंबरीच्या पानोपानी वाचायला मिळतो.
वाचताना अक्षरशः डोकं सुन्न होतं.इतकं काळजाला जखमी करणारं लेखन या कादंबरीत मांडले आहे. भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेला दिलेली शिवी म्हणजे ‘वांझ’.ही कादंबरी लेखकाने स्वतःची भूक दाबून त्यांना जगवून उच्च शिक्षित केलं. त्या आईबाबांना वांझ कादंबरी समर्पित केली आहे.
तासिका तत्त्वावर महाविद्यालयात सेवा करणारे नायक सारीपुत्र, संघर्ष, रावसाहेब आणि तेजस्विनी या नायक नायिकेची नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या व्यथा कथेतून व्यक्त केल्या आहेत.मग ते मुलाखत असो,प्रत्यक्ष शिकवणं असो, नाही तर महाविद्यालयातील प्रसंग असो नाहीतर त्यांचे कौटुंबिक जीवन असो.आंदोलन असो या सर्वांवर सविस्तरपणे आणि खरंखुरं लेखन शब्दछल अथवा कपोलकल्पित शब्दांचा भडिमार न करता. हृदयाचे हुंदके प्रत्यक्ष हृदयाला भिडतात असं लेखन यामध्ये केलेले आहे.
खरं तर उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना कष्टाची कामेही गावाकडे कोण देतं नाहीत.त्यांना मानसन्मान मिळतो.पण काम मिळत नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही सुमार दर्जाची असते. रोजंदारी नाहीतर उपलब्ध शेतात काम करीत राहणे.त्यात दुष्काळाचा ससेमिरा असतो.त्यामुळे उराशी स्वप्न बाळगले.ते पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा आटापिटा अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.सुशिक्षित बेकार युवकांचा हुंकार म्हणजे ‘वांझ’.भविष्यावर हवाला ठेवून मार्गक्रमण करणारी युवापिढी.खरच मी पूर्णवेळ प्राध्यापक होईन या आशेवर जगणारे CHB तासिकेच्या मानधनावर काम करणारे प्राध्यापक…यांच्या जीवनाची वेदनेला आर्तता देत वाटचाल करणारी कहाणी ‘वांझ’या कादंबरीत लेखक मिलिंद भिवाजी कांबळे यांनी मांडली आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक-२० एप्रिल २०२५
Comments
Post a Comment