पुस्तक परिचय क्रमांक:२१५ मुलांसाठी ओळख पर्यावरणाची
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१५
पुस्तकाचे नांव-मुलांसाठी ओळख पर्यावरणाची
लेखक: निर्मला मोने
प्रकाशन-रोहन प्रकाशन , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण २००२
पृष्ठे संख्या–४८
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-२२₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१५||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: मुलांसाठी ओळख पर्यावरणाची
लेखक: निर्मला मोने
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
उद्या जगात सुखानं रहाता यावं,ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे.त्यासाठी काय करायला हवं?कसली काळजी घ्यायला हवी?काय टाळायला हवं.हे कळून घेणं आपलं कामच आहे.
माणसानं चैनीसाठी, खाण्यासाठी, प्राण्यांची अतोनात शिकार केली.रानं तोडली, त्यामुळे प्राण्यांची उपासमार होऊ लागली.माणसानं जमीन, हवा आणि पाणी या गरजांचीही स्व: हव्यासापोटी नासाडी केली.विज्ञानातील प्रगतीने साधनं आणि शस्त्रे निर्माण झाली.कारखानदारी बोकाळली. रसायनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला.यामुळे निसर्गातील समतोल बिघडला.अन् माणसाचं जीवनच धोकादायक बनले.तेंव्हा पर्यावरण म्हणजे काय? निसर्गाचा तोल सावरायला आपण काय करू शकतो?हे मुलांना समजावे म्हणून लेखिका निर्मला मोने यांनी ‘मुलांसाठी ओळख पर्यावरणाची’या पुस्तकाचे लेखन केले आहे.
नैसर्गिक अधिवासाचे देखणं मुखपृष्ठ आपले लक्ष वेधून घेतं.खूपच आकर्षक आहे.अंतरंगात डोकावून पाहिले तर आपणास नऊ लेखातून पर्यावरणाची इत्यंभूत माहिती लक्षात येते.लेखातील आशयाला साजेशी कृष्णधवल छायाचित्रे चितारलेली आहेत.त्यामुळे लेखातील आशय उठावदार व वास्तव वाटतो.
पर्यावरण म्हणजे काय?पर्यावरण-संतुलन, पंचमहाभूतांचा समावेश, माणुसकीचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण,जल प्रदूषण,ध्वनी प्रदूषण आणि उपाय योजना असे विचार करायला लावणारे लेख आहेत.
पर्यावरण म्हणजे काय?या लेखात नेमकेपणाने ‘पर्यावरणाची’ मुलांच्या लक्षात येईल अशी सर्वसमावेशक माहिती लिहलेली आहे.
वातावरणातील बदलत्या तापमानामुळे सतत वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. हवा,पाणी,ऊन,वारा, पाऊस आणि जमीन आदींचे शास्त्र म्हणजे पर्यावरण होय. साध्या सोप्या घटना प्रसंगातून पर्यावरणाचे महत्व विषद केले आहे.हवा पाणी बिघडलंकी पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याचा परिणाम मानव आणि प्राण्यांना भोगावा लागतो.
पर्यावरणाचे संतुलन या द्वितीय लेखात निसर्ग निर्मित सर्व वस्तूंचा समतोल साधनं का गरजेचे आहे? हे सोदाहरण देऊन स्पष्टीकरण केले आहे. सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समतोल साधनं महत्त्वाचे आहे.
पंचमहाभूतांचा समतोल या लेखात जमीन, पाणी,प्रकाश, वारा आणि आकाश या पाच गोष्टींपासून जगाची उत्पत्ती झाली आहे.या पाच वस्तूंचा वापर करून,एकत्र मिसळून सर्व पदार्थ आणि वस्तू बनलेल्या आहेत. हवेतल्या घटकांचे प्रमाण जरी कमीजास्त झाले तरी हवेचे प्रदुषण होते.ते नियंत्रित करण्यासाठी काय करणे महत्त्वाचे आहे. याचा ऊहापोह या लेखात केला आहे. बऱ्याचदा छोट्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करतो.पण त्यामध्ये सुध्दा खूप समर्पक संदेश असतो.हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही.सर्व जिवजंतूंना सुखाने जगता येईल असं वातावरण म्हणजेच पंचमहाभूतांचा समतोल साधला जाणं महत्त्वाचं आहे.नैसर्गिक आपत्ती सर्वात जास्त झळ मानवाला बसते.भूकंप ज्वालीमुखी, सुनामी, चक्री वादळ यामुळे निसर्गाची आणि मानवाची अपरिमित हानी होते.
यासाठी यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतेही प्रदूषण न करण्याचा निश्चय प्रत्येक नागरिकाने केला तरच यांचा फायदा आपणाला होईल.नुसतं वृक्षारोपण करण्यापेक्षा लावलेली झाडं संवर्धित कशी होतील याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे माणुसकीचं प्रदूषण या लेखातून उद्योग व्यवसाय आणि कारखाने वाढत आहेत. यासाठी कुशल अकुशल मनुष्यबळ लागते.
त्यासाठी शहराकडे खेड्यातील लोकं धाव घेतात.त्यामुळे शहरात गर्दी वाढतच आहे.
कामासाठी अचूक कौशल्य नसलेली कोणत्याही मार्गाने पैसा मिळवतात.त्यातून दंगेधोपे,खून, मारामाऱ्या होतात.गुन्हेगारी वाढत जाते.अन् माणुसकी नाहीशी होते.माणसाची कामगिरी हा लेखही चिंतन करायला उद्युक्त करणारा आहे.
हवेचे प्रदुषण या लेखात हवा प्रदुषित व्हायला कोणते घटक कारणीभूत आहेत याचे विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे.
धुम्रपान,वाहनातील कार्बन मोनॉक्साईड , कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारे रासायनिक घटक,कारण कार्बन वाढला की हवामान तापते.
‘जलप्रदूषण’प्राणीमात्राला पाण्याची जरुरी असते.पिण्याच्या पाण्याचा जलसाठा फक्त नद्या आणि सरोवरात आहे.नदीला जीवनदायिनी म्हणतात.जगात सगळ्यात जास्त वस्ती नदीच्या काठावर वसलेली आहे.नदी मानवाला पाणी देते अन् त्यांनी केलेली घाण वाहून नेते.म्हणूनच नदीला लोकमाता म्हणतात.पण याच नदीची उघडी गटारं माणसांनी केली आहेत.
ध्वनिप्रदूषण फार मोठ्या आवाजाने आपलं आरोग्य बिघडते.वाहतुकीच्या साधनांमुळे जगातला गोंगाट वाढत आहे.शांतता म्हणजे मौन केवळ म्हणच राहिली आहे.शहरात तर दिवसरात्र गोंगाट असतो.साधारणपणे माणूस ८० डेसिबल्स पर्यंतचा आवाज सहन करु शकतो. वेगवेगळ्या सण उत्सवातील शोभायात्रा तर आवाजाची पातळी ओलांडून जातात. तरुणाई डीजेच्या तालावर थिरकते.बेहोष होऊन नाचते.पण त्या आवाजाच्या तीव्रतेने इतरांना अस्वस्थ वाटते.
उपाययोजना या लेखात हवा स्वच्छ रहावी यासाठी काय करता येईल.पाणी शुद्ध राखण्यासाठी आपण काय करू शकतो.ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायची!आदी विषयांवर उपाययोजना सुचविली आहे.
मुलांनो, तुम्ही उद्याचे नागरिक आहात. तुम्ही हे जग सांभाळणार आहात.तुम्ही तुमचं काम जबाबदारीने करणे आवश्यक आहे. ‘इस देश को रखना मेरे बच्चे सम्हालके’असं माणसं तुम्हाला म्हणणार…तेंव्हा मुलांप्रमाणे आपणही पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कृतीतून दाखवून देणं आवश्यक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ५मे २०२५
Comments
Post a Comment