पुस्तक परिचय क्रमांक:२१३ राधिकासांत्वनम्
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१३
पुस्तकाचे नांव-राधिकासांत्वनम्
लेखिका: मुद्दुपलनी
अनुवाद -डॉ.शंतनू अभ्यंकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-
प्रथमावृत्ती जून, २०२३
पृष्ठे संख्या–२२७
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--३३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१३||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-राधिकासांत्वनम्
लेखिका: मुद्दुपलनी
अनुवाद -डॉ.शंतनू अभ्यंकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
एक भावोत्कट आणि कामोत्कट तेलुगू शृंगारकाव्याचा रसाळ मराठी भावानुवाद वाई येथील प्रथितयश डॉक्टर आणि साहित्यिक शंतनू अभ्यंकर यांनी केलेला आहे.
शृंगारातील भव्य काव्य उलगडून दाखविणाऱ्या जीवशास्त्रास व काव्यात अंगार,रसोत्कट शृंगार मांडणाऱ्या भाषेस डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी अनुवादित काव्यसंग्रह समर्पित केला आहे.
तंजावरचं मराठी भाषिक राजे तमिळ भाषिक प्रजेवर राज्य करत होते.परंतू राज्यव्यवहाराची भाषा तेलुगू होती.अश्या संस्कृतीत वेगळं साहित्य-कला-नृत्य-नाट्य जन्माला आलं. तेथील राजे प्रतापसिंह स्वतः काव्यशास्त्र विनोदात रमणारे होते. त्यांनीही नाट्यलेखन केलेले आहे.
ही नगरी कलांइतकीच कलावंतिणींसाठी प्रसिद्ध होती.मुद्दुपलनी ही गणिका अनुपम सुंदर, बुध्दिमान, चतुर आणि शृंगारनिपुण होती. तशीच बहुभाषिक पण होती.तिने केलेली काव्यरचना सात ओळींची होती. तिची तेलुगू भाषेतील रचना,‘राधिका सांत्वनम्.’
तेलुगू भाषेत सांत्वन म्हणजे मनधरणी करणे किंवा रुसवा काढणे होय.यातील सर्व रचना राधा-कृष्ण आणि इला यांच्या कामक्रिडेच्या काव्यात शब्दबध्द केलेल्या आहेत.आणि ते ही कार्य एका स्त्रीने केले आहे हे वैशिष्ट्यपुर्ण आहे.
राधा -श्रीकृष्णाच्या अनेक कथेने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे.आणि त्यांची प्रेमकाव्यं सुंदर आणि शृंगारिक वर्णनात्मक असली तरी राधा-कृष्णाचं मीलन म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचं मीलन होय. कृष्ण, राधा आणि इला यांच्या निस्सीम प्रेमाचा तिसरा कोन आहे.
या काव्यसंग्रहात काव्यरचनेतील अवघड वाटणाऱ्या शब्दांचे समर्पक पर्यायी शब्द प्रत्येक पानावर खालील बाजूस संख्येने लिहिलेले आहेत.
सुंदर आणि आकर्षक रंगीबेरंगी मुखपृष्ठ तर मलपुष्ठावर डॉ.तारा भवाळकर,सांगली
यांचा ‘ब्लर्ब’ काव्यसंग्रहातील आशय अधोरेखित करणारा आहे.तसेच मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा निश्चितच आवडेल असं या पुस्तकातील भावोत्कट आणि रसाळ काव्य रचनेवरून समजते.
डॉक्टर मुकुंद कुळे यांचा ‘त्या दोघींचा आत्मसन्मानाचा लढा!’या प्रस्तावनेत या लेखातून स्त्री आणि शृंगाराविषयी विवेचन केले आहे. राधा ,कृष्ण आणि इला यांची शृंगारिक रचना आहे. कदाचित हेच शृंगार काव्य भारतीय साहित्य परंपरेतील ‘आद्य शृंगार काव्य’ठरावं असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. या रचनेत प्रणयउत्सुक भावना मनमोकळेपणे आणि विस्तृतपणे मांडल्या आहेत.तसेच हे साहित्य हस्तगत कसे झाले? तदनंतर हे साहित्य प्रकाशित कसे केले ?याचाही रिपोर्ताज कुतूहल निर्माण करणारा आहे.चार अध्यायात हा काव्यसंग्रह विभागला आहे.एकदम रमणीय काव्यसंग्रह आहे.
परिचयक-श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक २८ एप्रिल २०२५
Comments
Post a Comment