पुस्तक परिचय क्रमांक:१६४ चैतन्याचे चांदणे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६४
पुस्तकाचे नांव-चैतन्याचे चांदणे
लेखकाचे नांव- डॉ.यशवंत पाटणे
प्रकाशन -संस्कृती प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती ऑगस्ट २०४
पृष्ठे संख्या–१८३
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६४||पुस्तक परिचय
चैतन्याचे चांदणे
लेखक: डॉ.यशवंत पाटणे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚
महाराष्ट्रातील लोकप्रिय वक्ते डॉक्टर यशवंत पाटणे.वाणी एवढीच लेखणीही त्यांच्यावर प्रसन्न आहे.ते शारदेच्या प्रांगणातील अक्षरदौलत शब्द फुलोऱ्यात व्यक्त करणारे साहित्यिक आहेत. त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं “चैतन्याचे चांदणे”ही अक्षरदौलत महापुरुषांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख करून देते.
लोकजीवनात नव्या जाणीवांची पहाट घेऊन येणारे थोर महापुरुष असतात. अनेक महामानवांनी मूल्य संवर्धनासाठी आपले आयुष्य वेचले.अशा वंदनीय व्यक्तींच्या चरित्रकार्याची ही चैतन्यमालिका आहे. ५२ महापुरुषांची सर्वस्पर्शी चरित्रे वर्षभर दैनिक सकाळच्या दर रविवारच्या ‘अंकूर’ पुरवणीसाठी लिखित केली होती मुलांच्या काना- मनापर्यंत जाणारी महात्म्यांची थोर चरित्रे पानावर उमटावित म्हणून अनेक श्रोत्यांनी अक्षरमुद्रेची मागणी केली. लेखांची मालिका सलगपणे “चैतन्याचे चांदणे”या ग्रंथात अलवार शब्दांनी गुंफलेली आहे.
काळोखाचे भय न बाळगता,वेदनांचे काटे तुडवीत सर्वांच्या जीवनात चैतन्याचे चांदणे निर्माण करतात. त्यांची विचारधारा हीच समाजाची ‘चैतन्यस्तोत्रे’ आहेत.काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ नये म्हणून पुनः पुन्हा वाणी आणि लेखणीतून आळवावी लागतात.लेखक डॉक्टर यशवंत पाटणे आवर्जून मनोगतात व्यक्त होतात ;की, “सलग वर्षभर या थोर महापुरुषांच्या सहवासात वावरल्याचा विलक्षण आनंद मी घेतला.”
काही माणसं अन् त्यांची वाचा् ही अदभुत असते.त्यातील एक प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! आपल्या अमोघ आणि सरल वाणीने गहन विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे. सारस्वतांच्या मांदियाळीत आपले स्थान मिळविणाऱ्या अनेक महान सारस्वतांच्या पैकी प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब.यांची प्रस्तावना
प्रसाद रुपात या ग्रंथास लाभली आहे.ते आम्हा सर्व अध्यापकांचे‘दीपस्तंभ’ आहेत. मंत्रांचे मांगल्य लाभलेल्या प्राचार्यांच्या प्रतिभासंपन्न वाणी-लेखणीने आमची पिढी भावश्रीमंत झाली आहे.असे आवर्जून उल्लेख लेखकांनी केला आहे.
डॉक्टर यशवंत पाटणे यांचा साहित्य प्रवास, व्याख्यान आणि सन्मान पुरस्कार यांचा चढता आलेख मुखपृष्ठाच्या आतील बाजूस आहे. चांदण्याचा प्रकाश शीतल आणि गारवा निर्माण करणारा असतो. महापुरुषांनी मानव्यासाठी केलेलं उल्लेखनीय अलौकिक कार्य चांदण्याचा प्रकाश होय.तोच प्रकाश चैतन्यमय शब्दातून व्यक्त करुन “चैतन्याचे चांदणे”या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
थोर महापुरुषांच्या लेखांची शीर्षके आपणास त्यांच्या कार्याची ओळख करून देतात.ती विचारांचे सौंदर्य पेरतात.अन् तेच लेखातील विचार वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण होते.प्रेमाची शिदोरी-स्वामी विवेकानंद,परिसस्पर्श -सुभाषचंद्र बोस, सुंदर अनुबंध -पु.ल.देशपांडे,अग्निदिव्याचा संदेश -भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुलगुरुंचे गुरु-कर्मवीर भाऊराव पाटील, अक्षरांचे नक्षत्र -वि.वा.शिरवाडकर वादळी व्यक्तिमत्त्वाचे क्रांतिसिंह -नाना पाटील,दुर्गसखा-गो.नी.दांडेकर, आधुनिक वाल्मिकी -ग.दि.माडगूळकर,खानदेश काव्यलता-बहिणाबाई चौधरी,रयतेचा पांडुरंग - बॅरिस्टर पी.जी.पाटील आणि संस्कारदीप-साने गुरुजी यांच्या कार्याचे लेखन रसग्रहण करताना मनात चिंतन मनन घडते.छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी दिलेली शिकवण संदेश यांची उकल होत रहाते.कार्याची आणि अनुभवाची शिदोरी संचित होते…
अश्रूंतदेखील चैतन्याचे चांदणे पेरणारे भगवान गौतम बुद्ध यांचा लेख भावस्पर्शी आहे.तर ‘मराठी माणसाची माया’ हा लेख महाराष्ट्रातील राजकीय धुरंधर यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कार्याचा आलेख आदर्शवत आहे.साहित्य,कला आणि राजकारण यामध्ये समन्वय साधणारे रसिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व.शब्दांच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता.किती सुंदर कोटेशन आहे. समाजकारणाचा ध्यास आणि साहित्याचा सहवास हा त्यांचा श्वास असल्यानेच त्यांच्या शब्दकृतींना शहाणपणाचा सुवास येतो. जनतेच्या प्रेमाची शक्ती ज्याच्याजवळ असते,तोच समर्थ मनुष्य बनतो.ही विचारधारा साहेबांची. या लेखातून त्यांच्या विषयी नवीन माहिती रसग्रहण करायला मिळाली.
वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व गाजविणारे साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांना सलाम! महामानव आणि साहित्यिकांच्या विचारांचे सौंदर्याची अक्षरदौलत”चैतन्याचे चांदणे”या विचारग्रंथात शब्दबध्द करून,वाचकांना बहाल केली आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे
ओझर्डे वाई सातारा
खूप सुंदर पुस्तक परिचय
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete