पुस्तक परिचय क्रमांक:१७१ बायकांत पुरुष लांबोडा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७१
पुस्तकाचे नांव-बायकांत पुरुष लांबोडा
लेखकाचे नांव- डॉ.शंतनू अभ्यंकर
प्रकाशन-विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती ऑक्टोबर २०२२
पृष्ठे संख्या–२०८
वाड़्मय प्रकार-ललित वैद्यकीय
किंमत /स्वागत मूल्य--३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७१||पुस्तक परिचय
बायकांत पुरुष लांबोडा
लेखक: डॉ.शंतनू अभ्यंकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जसं संगीत श्रवणीय,नाटक प्रेक्षणीय तसं डॉ.शंतनू अभ्यंकरांच पुस्तक वाचनीय असतं.अगदी साधी सोपी अन् सरळ भाषा वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते.प्रांजळपणे वास्तव घटनांचे लेखन शतप्रतिशत संदर्भ देऊन केले आहे.त्यासाठी सुक्ष्मपणे आणि चिकित्सकपणे अभ्यासपूर्वक मांडलेले मत लेखातून समजून येते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाची तळमळ त्यांच्या 'बायकांत पुरुष लांबोडा'या वैद्यकीय पुस्तकातून पानोपानी दिसून येते.
लेखक तथा डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास आणि रौप्य महोत्सवी प्रॅक्टिसचा पट मांडला आहे.या वैद्यकीय पुस्तकाला प्रख्यात नट आणि जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.मोहन आगाशे यांची प्रस्तावना लाभली आहे.प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शंतनू अभ्यंकर वाई परिसरातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व.वाचन,लेखन,नाटक,प्रवास आदी छंद त्यांनी कॉलेज जीवनापासून जोपासले आहेत.त्यांची सशक्त लेखणी इतकीच वाणी शुद्ध, रसाळ आणि खुशखुशीत आहे.महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने दिली आहेत.त्यांनी लिहिलेली स्त्री- आरोग्य विषयक पुस्तकांना लोकप्रियता लाभली आहे.स्त्री आरोग्य आणि प्रसुती शास्त्रातील अत्याधुनिक आणि नवनवीन तंत्राचा अवलंब करून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना'डॉ.
आनंदीबाई जोशी'गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.तसेच नास्तिक विचार आणि उत्क्रांती हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय.लेखक तथा डॉक्टर सतत विद्यार्थिभाव जपणारे.विज्ञाननिष्ठ पण तितकाच संवेदनशील माणूस.हा तर 'बायकांत पुरुष लांबोडा' असं जगाला वाटतं;पण बायकांचं माणूस म्हणून वावरणाऱ्या या पुरुषाचे हे लोकविलक्षण लिखाण खरोखरीच वाचनीय आहे.
आपणाला वैद्यकीय शास्त्र म्हणजे डॉक्टरांचे पेशंटला तपासणे, औषधोपचार करणे अन् असेल तर पुढील उपचारासाठी रेफरन्स देणं एवढीच आपणाला त्रोटक माहिती.पण हे पुस्तक वाचल्यावर आपणाला कळतं.की वैद्यकीय सेवेच्या शाखा,स्पेशलायझेशन,पेशंटला तपासताना घडलेले प्रसंग, आणि लेखातून जाणून घेतले तर समजते. या सेवेतील बारकावे समजतात.
लेखक डॉक्टरांनी त्यांचा वैद्यकीय प्रवास परखडपणे निर्भिडपणे मांडला आहे.त्या लेखावरील मतमतांतरे या पुस्तकात समाविष्ट केले आहे.या पुस्तकाची त्यांनी त्रिस्तरीय रचना केली आहे. पहिलाभाग वैद्यकीय शिक्षण, दुसरा कोव्हिड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर तिसरा भागात विज्ञान विचार आहेत.डॉक्टरांची भाषा आणि आधुनिक वैद्यक शास्त्राविषयी गैरसमज पसरवले जातात. सकस काय वाचावे?स्त्री आरोग्य विषयातील एम.डी.आणि होस्टेलचे दिवस. असा लेखनाचा परीघ आहे. 'होस्टेलचे दिवस'या लेखाचा आस्वाद घेताना प्रत्यक्ष फेरफटका आपण वसतिगृहात मारतोय. याचा आभास निर्माण होतो.इतकं दर्जेदार इत्यंभूत लेखन केले आहे.
भाषाशैली अतिशय समर्पक अन् शब्दांची मांडणी तर दिमाखदार आहे.लेखकांची शब्दप्रचुरता वाखाणण्याजोगी आहे.अनेक शब्दांचे बहुपर्यायी, समानार्थी शब्दांचे भंडार वाचनातून प्रगटते.
‘बायकांत पुरुष लांबोडा’या लेखात स्त्रीरोगतज्ज्ञ पुरुष डॉक्टर म्हणून येणारे खुशखुशीत अनुभव खुमासदार रसाळ शैलीत मांडत असताना पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांच्या वेदना देखील संवेदनशीलतेने लेखकाने टिपकागदासारख्या टिपलेल्या आहेत.हर्बल उत्पादनं नैसर्गिक आणि चांगली असा रुढार्थाने गोड गैरसमज ते पटवून देतात.कारण कोणतेही औषध हे रसायनांचे मिश्रण आहे.मग ते अॅलोपॅथी असो वा होमिओपॅथी असो.आजकाल तर अॅलोपॅथीला शिव्याशाप देण्याची पध्दतच पडलीय.पण अॅलोपॅथीच्या वापराने स्वातंत्र्यापूर्वी माणसाचे आयुर्मान ३७वर्षे होते ते आता तब्बल ६७वर्षापर्यंत पोहोचले आहे.तिच खरी मानववंशाची पॅथी आहे.तिची सर्व तत्त्वे माणसाला समप्रमाणात लागू होतात.असे कौतुक लेखक करतात.या पॅथीत सगळंच काही ‘ऑल इज वेल’नसून पण जे वेल आहे त्याचे तरी श्रेय अॅलोपॅथीला द्यायलाच हवे.असं त्याचं मत आहे.
होमिओपॅथी मॅग्नेटोथेरपी अशा पर्यायी उपचार पद्धतीमुळे माणसांना कधी कधी का बरे वाटते?याचा उहापोह 'गोळीबिळी,औषध बिवषद'या लेखात केला आहे.दोन घडीचा डाव आता अनेक घड्यांचा होऊन, आधुनिक वैद्यक शास्त्राने माणूस दिर्घायुषी झाला आहे.
कारण जगणं-मरणं यामध्ये आता एका श्वासाचं अंतर न राहता, आयसीयू व्हेंटिलेटर ,डायलेसिस, अॅंजिओग्राफी ,अॅंजिओप्लास्टी, पेसमेकर,केमो थेरपी, रेडिओलॉजी इत्यादी उपचार पद्धती थकल्या वाकल्या अवयवांना अनेक आधार देतात.असे सांगत लेखक तथा डॉ.शंतनू अभ्यंकर आधुनिक विज्ञानाचे महत्त्व विषद करतात..
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment