पुस्तक परिचय क्रमांक:१७३ मनस्पर्शी श्री

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७३
पुस्तकाचे नांव-मनस्पर्शी श्री
लेखकाचे नांव- अजित क्षीरसागर 
 प्रकाशन-के’सागर प्रकाशनालय,वाई 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती ऑक्टोबर २०२३
पृष्ठे संख्या–१२०
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७३||पुस्तक परिचय 
             मनस्पर्शी श्री 
        कवी: अजित क्षीरसागर 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कविता म्हणजे नवप्रतिभेचा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारा,मनाला स्पर्शून विचारांचे तरंग निर्माण करणारी अभिव्यक्ती.भावना परिसर आणि सभोवतीच्या घटनांना पाहून कागदावर उतरणारा किमयागार म्हणजे कवी होय.वाई येथील प्रथितयश उद्योजक श्री अजित क्षीरसागर हे मल्टीस्किल्स अवगत असलेलं व्यक्तिमत्त्व आहे.कविता लेखन,संपादन  ते पुस्तक प्रकाशन असा अक्षरकृतीचा अनुबंध त्यांनी समर्पक शब्दात मनोगतात व्यक्त केला आहे. त्यांनी अनेकदा काव्यमैफिलीत मनस्पर्शी काव्य पंक्ती पेश केलेल्या आहेत.अतिशय अप्रतिम मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि  सुबक बांधणी केली आहे.मलपृष्ठावरील ब्लर्ब त्यांच्या कवितांना लाभलेला मनस्पर्श सिने अभिनेते व  रंगकर्मी डॉ.गिरीष ओक यांनी अधोरेखित केला आहे.ते म्हणतात की, “जे मनाला भावते, भुरळ घालते ते मनात संचित होते.त्यांच्या काव्यात हे जाणवतं.”
कवी मनाचा संवेदनशील माणूस शब्दात बांधून कविता करतो.ते त्याचे साहित्य स्वानंद देत रसिक वाचकांनाही आनंद देते.
मुखपृष्ठाच्या आतील बाजूस कवीचा परिचय आहे. हा काव्यसंग्रह लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केलेल्या तिसऱ्या वाई पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी सृजन श्रोत्यांना अन् रसिक वाचकांना सस्नेह भेट दिले होते.त्या काव्य संग्रहाचा परिचय करून देताना विशेष आनंद होत आहे.
या संग्रहाला त्यांच्या गुरु(अध्यापिका) सौ. डॉ.मेधा साळवेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.हा काव्यसंग्रह म्हणजे शिष्याने गुरुला दिलेली अनमोल भेट आणि शिष्याची साहित्यिक ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे.छंद म्हणून रचना करत करत त्याचा व्यासंग झाला.यातील काही रचना यापूर्वी नियतकालिक,फेसबुकवर आणि युट्यूबवर आहेत.त्या प्रस्तावनेत म्हणतात की,“काव्यांचे विविधांगी प्रकार कवीने सहजपणे हाताळले आहेत.आत्माविष्कार करत भावना समर्पक शब्दात व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम कविता आहे.” पाच ओळींची पंचावळी,चारोळी व मुक्त छंद काव्य प्रकारांचा समावेश आहे.या पुस्तकात साधारणपणे शंभर रचनांचा समावेश केलेला आहे. काव्यपंक्तीतील आशयाला समर्पक कृष्णधवल रेखाचित्रे चितारलेली असल्याने कवितेला आकर्षकता आणि उठावदारपणा आला आहे. भुपाळीने शुभारंभ करीत कविता रसिक वाचकांच्या मनमंदिरात प्रेमळ 
सखीची आवर्तने आणि जीवनाचे गाणं झुलत राहते.तर दवबिंदूची सोबत करत निसर्गाविष्कार कवितेतून व्यक्त होतात. जीवन, जगबुडी, बिंब-प्रतिबिंब अन् ग.म.श्री. या कविता वैचारिक मंथन करायला लावतात.
  तर, प्रेम फक्त तुझ्यावरच करावं या रचनेत ते निसर्ग, सूर्य- चंद्र,सखी, तलवार या उपमा देत देत पती पत्नीच्या प्रेमाची महती पटवून देतात. चुलीवरच्या भाकरीची कथा तर विस्तवावर टम्म फुगलेल्या खरपूस भाकरीसारखी आहे.वरुन पापुडा कडक आणि मऊशार भाकरी.तशी ही मनाला स्पर्शून हळवी करणारी..
          पृथ्वी 
आकाशातल्या चांदण्यांना
आज मात्र लाज आली.
सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने 
पृथ्वीराणी बहरुन गेली.
             प्रेम
 आल्या दाटून उरीच्या भावना 
शब्दांचे कोडे सुटता सुटेना 
काय करावे काही कळेना 
प्रेमापोटी जीवनी काही उरेना..
चारोळी काव्य प्रकारात चारच ओळी असतात.पण किती खोल आशय त्यामध्ये भरलेला असतो. इतक्या कमी शब्दांमध्ये आपले विचार आणि भावना इतक्या तंतोतंत वाचकांपर्यंत पोहचवू शकणारे चारोळीकार चंद्रकांत गोखले यांचं जसं  अपार कौतुक वाटतं.तसं कवी अजित क्षीरसागर यांचंही. वाचणाऱ्याच्या हृदयाला भिडणाऱ्या  काव्यपंक्ती. हळुवार आणि सहज शब्दांत मांडलेल्या भावना यामुळे त्या पटकन लक्षात राहतात.
अतिशय सुंदर मनभावन काव्यरचनांचे पुस्तक आहे. ‘मनस्पर्शी श्री’या काव्य संग्रहाचा परिचय करून देताना शब्दसखी डाॕ. संगीता गोडबोले यांच्या रचनेत या  पुस्तकाची आशयघनता दिसून येते.
            ओंजळ ..
टपटपणारे थेंब जलाचे ओंजळीमधे घ्यावे झेलून
क्षण सोनेरी आठवणींचे ओंजळीत  ठेवावे झाकुन
सहवासाचे स्पर्श मुलायम ओंजळीत ठेवावे राखुन
मनामनांचे रेशिमधागे ओंजळीत ठेवावे बांधुन
 रंग केशरी क्षितिजावरचे ओंजळीस ठेवावे माखून
गंधभारल्या ओंजळीतली फुले जगावर  द्यावी उधळून…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे,वाई सातारा 



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड