पुस्तक परिचय क्रमांक:१७४ हस्ताचा पाऊस
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७४
पुस्तकाचे नांव-हस्ताचा पाऊस
लेखकाचे नांव- व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सातवी आवृत्ती
पुनर्मुद्रण ऑगस्ट २०१३
पृष्ठे संख्या–१०४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७४||पुस्तक परिचय
हस्ताचा पाऊस
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जेष्ठ साहित्यिक लोकप्रिय कथालेखक तथा‘बनगरवाडी’कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची खेड्यातल्या माणसांना अन् पाळीव प्राण्यांना नायक करून अतिशय सहज सुंदर शैलीत त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यातील लिखाण सुक्ष्मपणे निरीक्षण करून त्यांनी प्रसंगांचे वर्णन केले आहे.ते वाचताना आपण तन्मयतेने एकरुपतेने वाचतच राहतो. इतकं अप्रतिम हुबेहूब वर्णन गोष्टीत दिसून येते.
कथासंग्रहाचे नांव ‘हस्ताचा पाऊस’हस्त नक्षत्राचा काळ हा आश्विन महिन्याचा या काळात नवरात्र दसऱ्याला सिलागंन असतं.आपण सोनं लुटून सिमोलंघन करतो.तसं यातील गोष्टी म्हणजे नवलाई भरलेल्या आहेत. निसर्गायनात ‘हस्त’ हे पावसाच्या निरोपाचं नक्षत्र.मृगातल्या पावसाची सुरुवात ढगांची-विजांची गडगडाटी अन् ढोल ताशे-वाजंत्र्यांनी होते तर हस्तात निरोपाचे ताशे,निरोपाची वाजंत्री धडाडधुम वाजतात.मेघगर्जना,विजांचा लखलखाट होतो.पाऊस आता ‘जातो मी’असं सांगत असतो.तश्याच या गोष्टी.कायम आठवण काढायला लावणाऱ्या.
कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांनी कथेला सुरुवात करण्यापूर्वी ‘सुरुवातीच्या आठवणी’या लेखात माणदेशी माडगुळ गावतलं बालपण ते श्रेष्ठ कथा लेखक कसा झालो.याचाच प्रवास अगदी सहजतेने त्यांनी मांडला आहे.जणूकाही ते आपल्याला सांगतायत असं वाचताना वाटते.ते म्हणतात की, “भाडे देऊन राहणाऱ्या घरात, माळ्यावर एक भलेमोठे खोके बंदिस्त करून ठेवले होते.त्यात काय असेल?या उत्सुकतेपोटी मी घरात कोणी नसताना माळ्यावर गेलो आणि ते खोके फोडले.तर त्यात मला पुस्तकांचा वास आला.अनेक नामांकित लेखकांची पुस्तके त्यात रचून ठेवली होती.ती मला वाचायला मिळाली.याच खोक्यापासून सुरू झालेला वाचनाचा नाद पुढे कधीच कमीच झाला नाही.” याचा आवर्जून उल्लेख लेखकांनी केला आहे.या कथा संग्रहातील कथांना यापूर्वी अनेक नियतकालिके आणि दिवाळी अंकांच्या माध्यमातून प्रसिध्दी लाभली आहे.
मुखपृष्ठावर आकर्षक आणि यथार्थ चित्रण हस्ताच्या पावसाचे आहे.अचानक पाऊस कोसळत असताना म्हसरांना घरी घेऊन जाणारा गुराखी.तर मलपृष्ठावरील ब्लर्ब त्यांच्या चिंतनाची आणि लेखणीची नजाकत अधोरेखित करतो. मुखपृष्ठाच्या मागील पानावर लेखकाचा संक्षिप्त परिचय अन् मानसन्मानाची झलक आहे.मलपृष्ठाच्या आतील भागात त्यांचा साहित्यिक प्रवास कथा, कादंबरी व नाटकं यांची नामावली आहे.
या पुस्तकात एकूण बारा कथा वाचायला मिळतात.गावच्या मातीत ऋणानुबंध जपणाऱ्या गावकुसाबाहेरील वस्तीतल्या माणसांना कथांचे नायक केले आहे.तर यातील काही कथा पाळीव प्राण्यांच्या आहेत. देवा सटवा,वडार वाडीच्या वस्तीत,पडकं खोपटं,काळ्या तोंडाची, एकटा, पोकळी,वसाण,विपरीत घडले नाही, हस्ताचा पाऊस,मायलेकराचा मळा, असंच, त्याची गाय व्याली.यातील काही कथा सत्य आहेत.आपल्या सुक्ष्म निरीक्षणाने त्यांनी अतिशय सुंदर शब्दात
घटना प्रसंग आणि दृश्ये शब्दबध्द केली आहेत.
गावगाडा यातील तराळाची चित्तर कथा वाचताना रसिकांना विचार करायला लावते.स्वातंत्र पूर्वकाळातील तराळाची कर्म कहाणी अतिशय समर्पक शब्दात ‘देवा सटवा’कथेत मांडली आहे.
उपेक्षित पण बेडर लक्षीची आणि तिच्या हऱ्या मेंढ्याची कथा ‘वडरवाडीच्या वस्तीत’होय.अतिशय सुंदर शब्दात सऱ्यामेंढ्याचे वर्णन केले आहे.ते वाचताना आपल्याला समोरच मेंढा जत्रेतील टक्कर शर्यतीत सहभागी झाला आहे.
भावकीतील भावाभावांच्या हर्षेतून झालेल्या भांडणाचा राग खूनापर्यंत जातो. ती कथा म्हणजे ‘पडकं खोपटं’ जिथं राव्याचा भाव्याने काटा काढलेला असतो ती जागा.
काळं तोंड घेऊन आलेली श्वानी चंपी. अपशकुनी म्हणून तिचं जगणं असतं.ती आपली हकीकत ‘काळ्या तोंडाची’या कथेतून व्यक्त करते.खरोखरीच मनुष्य प्राणी किती अंधश्रद्धाळू आहे.हे या कथेतून लक्षात येते.तर मोत्या कुत्र्याची कथा ‘एकटा’त्याचं जिणं अगदी छान शब्दात रेखाटले आहे.त्याचे प्राणीमित्र त्यांची दिनचर्या वाचताना प्रत्यक्ष प्रसंग समोर उभा राहतो.एकतर्फी प्रेम करणाऱ्या माधवाची कहाणी ‘पोकळी.’
पोलिस आणि बहिणा यांच्या एकतर्फी प्रेमाची कथा ‘विपरित घडले नाही.’ रात्रीच्या बहीणाच्या लावण्या ऐकून पोलिस फिदा होतो अन् खिशातील दौलत तिच्यावर उधळूण कफल्लक होतो.तो तिला विसरून जातो.पण बहिणाचा मात्र त्याच्यावर जीव जडलेला असतो.त्यापायी ती मनात झुरत असते.
त्याची प्रेमकथा मनाला भावते.
ओझं मरेपर्यंत वाहणारी गाढवं.वडाराकडे असणारी कुंभाराकडे कशी जातात अन् धडाडधूम कोसळत पडणाऱ्या पावसानं अचानक ओढ्याला आलेल्या पुरात कुंभारासह वाहून जातात.ती कथा म्हणजे ‘हस्ताचा पाऊस’.
माझ्या खेड्याच्या पांढरीत उभे राहून उगवतीला नजर टाकली की,दोन गोफण धोंड्यावर मायलेकरांच्या मळ्यातली दोन चिंचेची सावळी झाडे विठोबा-रखुमाईच्या मूर्तीप्रमाणे डोळ्यात भरतात.त्यांच्या सावलीत मायलेकराच्या दोन समाध्या आहेत.गावचे बाजीबाबा आणि रंगुआजीची आहेत.ऊनपावसाला स्वत:मस्तके देऊन ही दोन झाडे समाध्यांना निवारा देतात.त्या बाजीबाबाने वाढविलेल्या मळ्याची कथा, बटईने मळा फुलविणारा शिवा दयाळ अन् त्याचा शेजारी असणारा महादू न्हावी यांच्यातील वाद संघर्ष याची कथा म्हणजे'मायलेकराचा मळा'.
अठरा विश्व दारिद्रयात जगणाऱ्या माणसाच्या घरात जर लहानग्या मुलाला भुक लागल्यावर काय अवस्था निर्माण होते.ते बापावेगळे पोरगं भुकेने वखवखलेले असते.तेंव्हा खायच्या वस्तूचा धांडोळा झोपडीत घेताना त्याला एका गाडग्यात हळकुंड दिसते.तेच पेटत्या दिव्यावर धरुन खरपुस भाजुन खातो.आणि आपली भुक शमवितो. त्याची कथा'असंच…'
गाईला खोंड झाल्याव दिवास्वप्न पाहणारा रामा आणि त्याची आई जिजा यांच्या पुतळी गाईची कथा…'त्याची गाय व्याली'.
ग्रामीण माणदेशी भागातील व्यक्तिचित्रणा सोबत परिसराचे आणि प्राणीपक्षी झाडांचे सूक्ष्मपणे समर्पक शब्दात वर्णन केले आहे.ते रसग्रहण करताना प्रत्यक्ष घटनेचा भास दिसतो. इतकी ताकद लेखणीत आहे.
अप्रतिम कथासंग्रह 'हस्ताचा पाऊस'.
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातार
Comments
Post a Comment