पुस्तक परिचय क्रमांक:१७६ सुंदर पिचाई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७६
पुस्तकाचे नांव-सुंदर पिचाई
लेखकाचे नांव- दिगंबर दराडे
प्रकाशन-मायमिरर पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती सप्टेंबर २०२३
पृष्ठे संख्या–१७६
वाड़्मय प्रकार-कथा
किंमत /स्वागत मूल्य--२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७६||पुस्तक परिचय
सुंदर पिचाई
लेखक: दिगंबर दराडे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे,पण ज्याच्या नियंत्रणात गुगल आहे.ते आहेत सुंदर पिचाई.
मी जिथे जातो,तिथे भारत माझ्या बरोबर असतो. जगप्रसिद्ध गुगलचा भारतीय वंशाचा सीईओ! सुंदर पिचाई यांचा गुगलचे सीईओ प्रवास ‘सुंदर पिचाई’या पुस्तकात पत्रकार तथा लेखक श्री दिगंबर दराडे यांनी मांडला आहे.ही एक सक्सेस स्टोरी आहे.स्वप्नांना कवेत घेऊन ध्येय साध्य करणारे सर्वोत्कृष्ट कामगिरी करतच राहणारे तंत्रज्ञानातील मसिहा सुंदर पिचाई.तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले तैलबुध्दिमत्ता,हुशारी आणि तंत्रज्ञानाच्या आवडीतून एक एक पाऊल पुढे टाकत परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली अन् तिथं शिक्षण घेतले.आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर अल्फाबेट इंकचे सीईओ बनले.
एवढी वलयांकित व्यक्ती कशी निर्माण झाली. यासाठी आपल्याला लेखक दिगंबर दराडे यांचे ‘सुंदर पिचाई’या पुस्तकाचे रसग्रहण करायला लागेल.अतिशय सहज सुंदर शब्दात त्यांनी बालपण ते भविष्याचा वेध असा अनोखा प्रवास रसिक वाचकांना उलगडून दाखविला आहे.
लेखक तथा संपादक दिगंबर दराडे पत्रकारितेत गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. लहानपणापासुनच जीवन संघर्ष त्यांच्या वाट्याला आल्याने, संघर्षातून यशाला गवसणी घालणाऱ्या तरुणांविषयी अभिमान आहे.इंटरनेटवर हल्ली आपल्या कामात निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येचे,प्रश्नाचे उत्तर देणारं ‘गुगल’आहे.त्यामुळे लेखकाला याचे औत्सुक्य वाटले.
एकदा गुगलच्या बारा हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारात वाढ.ती माहिती गुगलच्या मदतीने शोधत असताना समजलं की, जगातील सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांची गणना होते.कितीतरी कोटींचं पॅकेज घेणाऱ्या या अवलिया माणसांबद्दल माहिती संकलित करुन लागलो.
अशा उत्कृष्ट लीडरचा जीवनपट माहितीसाठी व अभ्यासण्यासाठी विविध लेख, बातम्या आणि प्रकाशित पुस्तकातून माहिती मिळवू लागलो. यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते.कोणते आवश्यक गुण असावे लागतात.हे इतरांना कळावे याच एकमेव उद्देशाने पुस्तक लेखनाचा प्रपंच त्यांनी केला.पंधरा विभागात त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविला आहे.
बालपण,गुगलमधील खरा हिरो, आयुष्याची साथीदार,अतिश्रीमंतसीईओ,भारतप्रेम, मार्गदर्शक, आदर्श आणि भारतीय वेळापत्रक पाळणारा सीईओ,लीडर सुंदर पिचाई,अनोखे किस्से, जगप्रसिद्ध उत्पादनाच्या निर्मितीमागील किस्से, खऱ्या अर्थी प्रमुख,गुगल विषयी थोडक्यात, लोकप्रिय उत्पादनांचा धुमाकूळ, जबाबदाऱ्या आणि आव्हाने, भविष्याचा दिशेने…असे याची प्रकरणे आहेत.गुगलची उत्पादने आणि सुंदर पिचाई या कर्तृत्व या पुस्तकाच्या पानोपानी आहे.या पुस्तकातील लेखातून आपल्याला गुगल या सॉफ्टवेअर हार्डवेअर व तंत्रज्ञानात सतत होणारा बदल वाचायला मिळतो.’गुगलही टेक’ कंपनी आहे.या कंपनीला नंबर वन ठेवण्यासाठी १००टक्के योगदान देत असतात.एका भारतीय वंशाचा तरुण जगातील एकमेव सीईओ पगाराने अव्वलस्थानी आहे.ते त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्यकौशल्यामुळे.सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे.
आपल्या देशाने भारतातील तिसरा नागरी सन्मान पुरस्कार‘पद्मभूषण’देऊन सन्मानित केले आहे.ते अत्यंत संयमी, बुद्धिमानी,मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व आहे. इतरांना प्रभावशाली आणि प्रेरणादायी आहे असा त्यांचा प्रवास आहे.२०२३च्या वृत्तानुसार Google. com ही जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाईट प्रथम क्रमांकावर आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment