पुस्तक परिचय क्रमांक:१६८ वपुर्झा






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६८
पुस्तकाचे नांव-वपुर्झा
लेखकाचे नांव- व. पु. काळे 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जानेवारी २०२१
पृष्ठे संख्या–२५८
वाड़्मय प्रकार- ललितगद्य
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६८||पुस्तक परिचय 
            वपुर्झा 
         लेखक:व.पु.काळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कोणतंही पान उघडा आणि वाचा! ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्या वाचक रसिकांसाठी…वपुर्झा शब्दांचा अर्थ उलगडत जाणारा निखळ झऱ्यासारखा शब्दांचा प्रवाह शांतपणे मंदगतीने पुढे सरकत असतो.हृदयाला भिडणारे खोल खोल विचार अंतर्मनात विचारचक्र फिरवतात.इतकी ताकद छोट्या छोट्या परिच्छेदात आहे.
वपुंच्या लेखणीने रसिकांच्या मनावर गारूड झालंय, इतके अप्रतिम पॅटर्न ‘वपुर्झा’या ललित संग्रहात आहेत.मनाला पटणारे अनमोल विचार, मनाला स्पर्शून भुरळ घालतात.परखडपणे विचारांचे सौंदर्य पेरतात.ते वाचताना चिंतन मनन घडते.सहज सुंदर शब्दात छोटेछोटे परिच्छेद वाचताना विचार मंथन होते.
  वपु म्हणजे शब्दांचे जादुगार! त्यांच्या लेखणीतून ‘मथळे व अवतरणात’अक्षरांची दौलत कागदावर उतरते.अन् वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेते. इतकं निरपेक्षपणे केलेलं लेखन मनाला भावते.जणू काही कपाटात अनेक अत्तराच्या कुप्प्या आहेत. त्यापैकी मुड असेल तशी कुपी निवडावी अआणि सुगंधाने भारुन जावे. असे त्यांचे कोटस् पानोपानी आहेत.आपल्या विचारांचा पॅटर्न संस्कारक्षम कथेत शब्दबध्द करणारा शब्दसम्राट!
    विचारांचे गुलदस्ते परखडपणे मांडणारे जेष्ठ साहित्यिक लोकप्रिय कथालेखक व.पु.काळे यांची लोकप्रिय ललित गद्य रचना “वपुर्झा”.एखाद्या वेळी प्रकट होते ती छटा म्हणजे संपूर्ण माणसाचे दर्शन नव्हे, आपणचं एखाद्या प्रसंगावरून त्या माणसाची कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्तिमत्त्व होय.आपल्या मनाची भावना वातावरणात मिसळते.मग आकाश भव्य वाटते.पाण्याला चव येते.स्पर्श वेगळे वाटतात. ती भव्यता,ती चव,तो स्निग्धपणा आपल्याच मनाचा असतो.
मुखपृष्ठावरील पेला रिकामा आहे.तो नव्या विचारांची दृष्टी संचित करण्यासाठी.वेगळेच विचारांचे वैभव रसिक वाचकांना आपल्या लेखणीतून बहाल करणारे वपु. वपुर्झा पुस्तकातील अनेक लेख म्हणजे अवतरणे,कोटस्,मथळे यांचे भंडार होय.
प्रत्येक शब्दांची आशयगर्भता सहज सुंदर सोप्या शब्दात गुंफली आहे.लेखाच्या उत्तरार्धात त्यांनी त्यातील विचारांचे विवेचन समर्पक शब्दात व्यक्त केले आहे.
 “स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं.ज्याने-त्याने स्वमालकीचे अनुभव घ्यावेत.”
खळाळून टाळी देणाऱ्या हातात एक प्रचंड सौंदर्य असतं.परमेश्वर माणसाला रिक्तहस्ते पाठवतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. असं असतं,तर नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या इवल्या इवल्या बाळमुठी वळलेल्या नसत्यात.त्या मिटलेल्या बाळमुठीत एक टाळी लपलेली असते.ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही.अशा माणसांना हाताच्या अंतरावर ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं.
किती सुंदर शब्दात जीवनाचं तत्त्वज्ञान प्रस्तुत केले आहे.तसेच नुसते वाचन करून माणसाचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. तर वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात.म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरते चिरंजीव होतं.करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.’साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं.त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही.’ लेखकाला  हवा असतो संवाद.त्याशिवाय त्याचे पान रंगत नाही.वाचन संस्कार आणि साहित्याचा अनुबंध समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.व्यवसायाचे संवर्धन कसं करावं याचे मार्मिक विवेचन समर्पक शब्दात मांडले आहे.
        “पायाखालची वाट स्वतःची असावी. ती सापडेपर्यंत, प्रवासाचा प्रारंभ करू नका. निसर्ग जवळून दिसावा म्हणून प्रवासात दुसऱ्या प्रवाशाची दुर्बीण उसनी मिळू शकते,पण डोळ्यांचे काय?ते स्वतःचेच लागतात.ते डोळे मिळवा. तुमच्या जवळच ते आहेत. त्या डोळ्याजवळ शक्ती पण असेल.पण तुम्ही त्याचा शोध घेतलेला दिसत नाही.शिकारीत मचाण बांधून देणारा मिळवता येतो.सावजाला उठवण्यासाठी हाकारे गोळा करता येतात. पण सावज टिपण्याचं काम शिकाऱ्यालाच करावं लागतं.तेच आयुष्यातल्या प्रत्येक व्यवसायाचं.’टिपणं’महत्वाचं.
कितीही वेळा वाचलं तरी पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटणारं पुस्तक.अप्रुप वाटतं या पुस्तकाचे!रसिक वाचकांना गारुडी करणारं जबरदस्त ललित गद्य रचना ‘वपुर्झा’. कथाकार व.पु.काळे यांच्या लेखणीला मानाचा मुजरा!

परिचयक :श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई सातारा 



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड