पुस्तक परिचय क्रमांक:१७२ वावरी शेंग








वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७२
पुस्तकाचे नांव-वावरी शेंग
लेखकाचे नांव- शंकर पाटील 
 प्रकाशन-मेहता. पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण ऑक्टोबर २०१७
पृष्ठे संख्या–९२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७२||पुस्तक परिचय 
             वावरी शेंग 
         लेखक: शंकर पाटील 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
  लेखक कथाकार शंकर पाटील यांच्या कथेतून इरसाल गावरान माणसांची ओळख अनेक बहारदार किस्स्यांतून होते.मराठी कथेचं अप्रतिम लेणं.केवळ मनोरंजन न करता सामाजिक जाणीवांचे ओरखडे मनाला काढणाऱ्या एकापेक्षा एक सरस कथा “वावरी शेंग”या कथासंग्रहात आहेत.गावचं जगणं म्हणजे काय असतं,तर आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी मन भरेपर्यंत निबार गप्पा झोडायच्या,रंग भरुन घटना सांगायच्या.खरंतर कथांचा वाहता झरा गावात असतो.लोकप्रिय नामांकित इरसाल माणसांची ओळख त्यांच्या लेखणीतून उतरुन रंगतदार झालेल्या कथा वाचताना लक्षात येते. शब्दांच्या फडात पाटीलकी करणारा भला माणूस.
   रसिक वाचकांना निखळ मनोरंजन सोबत ग्रामीण जीवनोन्नती घडणाऱ्या कथा आहेत. मूल्यांवर आधारित समाज व्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे; म्हणून तर ते आपल्या कथांतून बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करतात.अनुभव शोधून न काढता ते आपसूक कथेत यावे लागतात.
चिंतनाच्या डोहातून त्यांची कथा जन्मते. जेष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे म्हणतात की,“शंकर पाटील यांच्या कथेने मराठी कथेला श्रीमंत केले आहे.हे कुणाला नाकारता येईल काय!”पाटील परंपरेपेक्षा परिवर्तनावर श्रध्दा ठेवतात.त्यांना ग्रामीण प्रश्नांचे भान आहे.
  माणसांच्या स्वभावाची,अंतरंगाची ओळख त्यांच्या दहा कथांतून होते. कुस्ती,करवत,रीत-रिवाज, वेचणी, नवरा, येडताक,वावरी शेंग,पुरावा,इसाळा आणि खोड या कथांचा समावेश ‘वावरी शेंग’या पुस्तकात केला आहे.’कुस्ती’ कथेत आपल्याला कुस्त्यांच्या मैदानातील तोबातोब गर्दीचं वर्णन, तिकीट काढताना झालेली संख्या बाळक्याची फजिती, कुस्त्या बघताना होणारी त्रेधातिरपीट अन् अचानक गरजणारे आभाळ या घटना अतिशय समर्पक शब्दात मांडल्या आहेत.या कथेचा आस्वाद घेताना आपणास प्रत्यक्ष कुस्त्यांच्या फडाचे दर्शन घडवितात.तर ‘करवत’ही भाया सुतार अन् त्याच्या बायकोची गोष्ट. सुताराचे कामं प्रचंड कष्टाने करावं लागतं.त्यात त्याची बायको सतत आजारी. उठताउठताच झालेलं भांडण अन् उपाशीपोटी कामांवर येऊन ओंडका काढण्याचं काम करवतीनं भाया आणि गोपाळा इंजनाचं पिस्टन ओढल्यागत करत असतात.दुपारच्या वक्त्याला त्याची बायको आजारी असताना सुद्धा भाकरी घेऊन येते.हे पाहून भायाला दरदरून घाम फुटतो.त्याची काहीली होते.कारण भर उन्हात ती आजारी असताना आलेली असते.तिच्या जीवाचं काही झालं तर निस्तारु कसं याची काळजी करणाऱ्या संवेदनशील भायाचं छानच शब्दचित्र रेखाटलं आहे.
   मांदिशा बाबुच्या बैलगाडीची रपेट पाटलाला कशी तारदाळला घेऊन जाते. तेंव्हा बैलं कशी हरणावाणी पळतात.अन् फिरुन पाटलांच्या घरी सांगावा द्यायला तो चकिटधुम बैलगाडी कशी पळवतो. याची कथा’रित-रिवाज’.एवढं सुंदर काम करुन पाटील अन् पाटलीन कौतुक न करता त्याला बोल लावतात.याचं सुंदर चित्रण केले आहे.
बापश्याच्या शेतातील कापसाच्या बोंडाची वेचणी करताना बापशा आणि गुल्बोची कथा वेचणी होय.शेतात काम करणाऱ्या बायका कामात कशी टर उडवतात त्याचं मार्मिक उदाहरण ही कथा आहे.स्वत:ची बायको आजारी असताना तीला शेतात काम करायला लावणाऱ्या नवरोबाची कथा.‘नवरा’ रत्ना विव्हळत असतानाही तो तिला एका शब्दानेही विचारत नाही. केवळ शेतातलं काम होण्याशी मतलब असणाऱ्या नवऱ्याच्या कंजूसीची कीव येते.कामाचे अवडंबर माजवणाऱ्या नवऱ्याची कथा खरंच त्याच्या कामाड्या स्वभावाचा पैलू उलगडून दाखवला आहे.
  केरबा आणि कुसूमची एकतर्फी प्रेमाची कथा ‘येडताक’.कथासंग्रहाची शीर्षक कथा ‘वावरी शेंग’अंधश्रध्देला खतपाणी घालणारी आहे.गजरी नवं लुगडं नेसून दुसऱ्याच्या वावरात भुईमुगाच्या शेंगा गोळा करायला गेल्यावर तीला वेगवेगळे भास होतात.कोणाची तरी चाहूल लागते. त्यामुळे तीला कसा चकवा बसतो. ती भितरते,घाबरते.घरी आल्यावर तिच्या अंगात ताप भरतो.सगळ्यांना वाटते तिला झपाटले. त्यावरच देणं भावाला द्यायला गजरीची आई लावते.त्या सगळ्यांचे संभाषण सुंदर शब्दात ‘वावरी शेंग’कथेत गुंफले आहे.तर पुरावा कथेत नवराबायकोचे भांडण कलगीतुरा जणू. बघ्यांना एक गंमतच.पण मुद्द्यांवरुन मुद्द्यावर जाणारं कडकडीत भांडण.बाबू आपल्या बायकोला मारझोड करत असतो. कारण काय? तर  त्याची बायको रात्रीची उठून दिवा लावायला आगपेटी शोधत असते.याला वाटतं ती पेटवून घेतेय. आक्रस्ताळीपणा करणाऱ्या बाबुशाची कथा  'पुरावा.’ तर खेड्यातल्या दोस्तांची कहाणी ‘इसाळा’कथेत मांडली आहे.समारोपात मांजऱ्याचा पोर बाबू अन् त्याची सून रंगू यांच्या संसाराची कथा ‘खोड’.अशा गमतीदार हसुन हसुन पुरेवाट होणाऱ्या इरसाल माणसांच्या कथा शंकर पाटील यांनी शब्द फुलोऱ्यात सजवलेल्या आहेत.त्याचा आस्वाद घेताना कथेची मायबोली रसिक वाचकांच्या मनाला भिडते.इतकं सुंदर लेखन केले आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई सातारा



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड