पुस्तक परिचय क्रमांक:१६९ रायगड राजधानी स्वराज्याची
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६९
पुस्तकाचे नांव-रायगड राजधानी स्वराज्याची
लेखकाचे नांव- शिवप्रसाद मंत्री शिवतीर्थ रायगड ट्रस्ट,पुणे व संदीप तापकीर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती मार्च २०२१
पृष्ठे संख्या–६४
वाड़्मय प्रकार-मार्गदर्शिका
किंमत /स्वागत मूल्य--५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६९||पुस्तक परिचय
रायगड राजधानी स्वराज्याची
लेखक:शिवप्रसाद मंत्री शिवतीर्थ रायगड ट्रस्ट,पुणे व संदीप तापकीर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!
राजा खासा जाऊन पाहता,गड बहुत चखोट.चौतर्फा गडाचे कडे काळेभोर तासिल्यासारखे.दीड गाव उंच.पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही. आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादचे दशगुणी उंच, असे देखून संतुष्ट जाहले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा.दुर्गदुर्गेश्वर रायगड,दैदिप्यमान इतिहासाचा अलौकिक वारसा.अभेद्य, बुलंद,बेलाग आणि अजिंक्य दुर्ग. स्वराज्याची राजधानी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचे ‘तीर्थस्थान’ रायगड राजधानी स्वराज्याची! तिथं गेल्यावर काय जाणाल? काय पहाल?काय बघाल?या गौरव ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची गडफेरी कशी करावी? या माहितीचा समावेश या पुस्तकात केला आहे.
स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रायगडाचा ऐतिहासिक वारसा ज्ञात-अज्ञात इतिहास संशोधक, अभ्यासक आणि लेखकांनी रयतेपर्यत पोहचविला त्यांना हा ग्रंथ कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे.
अप्रतिम आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाचे आहे.सह्यगिरीच्या मुख्य रांगेपासून काहीसा दूर,तासून कड्यांची बंदिस्त तटबंदी अन् उत्तुंग व विस्तृत माथा त्याला बुरुजांची दरवाजांची लेणी चढवून ‘अजेय’ दुर्ग बनविला.
रायगडाची गडाची गडफेरी कशी करावी? कसे पोहचावे? गडावरील कोणकोणती स्थळे कोणत्या क्रमाने पहावीत.तसेच रायगडाच्या परिघातील अन् परीघा बाहेरील कोणकोणती तीर्थ पहावीत. स्वराज्याच्या महान कार्यातील महाराजांचे सवंगडी शिलेदार यांची ऐतिहासिक गावातील ‘स्मरणस्थळे’ याची आकाराने लहान पण आशयाने महान पुस्तिकेत माहिती दिली आहे.छापील मजकुरा सोबतीला उत्कृष्ट छायाचित्रे अन् नकाशेही गडाचे लौकिक स्वरूप मुद्रांकित करतात.रायगड पहायचा कसा तर ही पुस्तिका हातात बाळगून.ही पुस्तिका वाचताना आपल्याला इतिहासाची अनुभूती मिळते.अन् गडभेटीची उत्सुकता मनात रुंजी घालते.इतकं अप्रतिम लेखन केले आहे.
तीन भागात या पुस्तकाचे विभाजन केले आहे. पहिल्या भागात काय जाणावे? रायगड, दुर्गदुर्गेश्वर! गडांचा महाराजा! महाराजांचा गड! राजधानी स्वराज्याची! छत्रपती शिवाजी महाराजांची!एका जाणत्या राजाची!एका श्रीमंत योग्याची!!! कसे पोहोचावे? रायगड कसा पहाल? रायगडाचा परिचय.दुसऱ्या भागात काय पहाल? रायगडाचा बृहत आराखडा, बालेकिल्ला,नागरी विभाग,लष्करी विभाग आणि तटबंदी तर तिसऱ्या भागात रायगडाच्या अवती भोवतीचा परिसर. स्वराज्याचे मानकरी, आणखी काय पहाल? आणि शिवतीर्थ रायगड ट्रस्टचे नम्र आवाहन अशा अनुक्रमणिकेतून आपण रायगडाची भ्रमंती करु शकतो.रायगडास जावे, अनुभवावे, परत परत जावे अन् भरपूर चैतन्य घेऊन यावे.
दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे अलौकिक स्वरूप दिमाखात उभे आहे.ते डोळे भरून पहावे.वाहता वारा,बेलाग कडे, रोमहर्षक तटबंदी,पहारे देणारे बुरुज, भव्यदिव्य दरवाजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आलेलं पावित्र्य या सगळ्यांच्या सहवासात वावरल्याचा रोमांचकारी अनुभवामुळे मनाला तजेला प्राप्त होतो.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय….
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Comments
Post a Comment