पुस्तक परिचय क्रमांक:२६० स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं...
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६०
पुस्तकाचे नांव-स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं…
संपादन: सुधा मूर्ती
अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी ,२०१८
पृष्ठे संख्या–१०८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६०||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं…
संपादन: सुधा मूर्ती
अनुवाद: लीना सोहोनी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
आपल्या आयुष्यात अघटित घटना घडतात.त्यांमुळे आपलं आयुष्य संपतेय की काय?असा प्रश्न मनात येतो.त्याच वेळी कायम स्मरणात राहील असा संस्मरणीय अनुभव मिळतो.अन् आपल्या मुखातून शब्द नकळत उच्चारले जातात…
नशीब बलवत्तर म्हणून वाचलो.काळ आला होता पण वेळ आली नव्हती…असं काही.अश्याच वास्तवात घडलेल्या गोष्टी, कहाणी आणि कथा आपल्याला वाचायला मिळाव्यात म्हणून लेखिका लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं..’या कथासंग्रहातून घेऊन आलेल्या आहेत.
हे पुस्तक पद्मश्री पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लोकप्रिय साहित्यिका सुधा मूर्ती यांनी संपादित केलेलं इंग्रजी पुस्तक आहे.त्यांनी तरुण लेखकांसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती.सुखदुःखाचे जीवनगाणे इतरांना प्रेरक ठरावे. त्यातून वैचारिक मंथन व्हावा.तसेच श्रमजीवी खडतर कष्टप्रद अशा जीवनाची वाटचाल करत असताना आपलं जगणं आशा, श्रध्दा,दया आणि आनंद यांनी ओतप्रोत भरुन ओसंडून वाहत असतं.याची प्रचिती या कथांचा आस्वाद घेताना निश्चितच येणार. असा प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथांचा वास्तव कथासंग्रह आहे. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या रसिक वाचकांना मंत्रमुग्ध करतील असा हा कथासंग्रह आहे.
कथांचा आशय शब्दचित्रांतून मुद्रांकित करणारं आखीवरेखीव रंगीत मुखपृष्ठ नजरेत भरणारे आहे. निवडलेल्या वीस तरुण लेखकांची नावे मुखपृष्ठावर समाविष्ट आहेत.तर मलपृष्ठावर कथांचा समर्पक शब्दात उलगडणारा आशय ‘ब्लर्ब’म्हणते असून गाजलेल्या साहित्याचे कव्हर पेज साहित्य परंपरा अधोरेखित करते.
जनमानसात लोकप्रिय असलेल्या नामांकित दैनिक बातमीपत्रे अनुक्रमे दैनिक सकाळ,दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स यांचे अभिप्राय या कथासंग्रहाची अस्सल वाचनीयता अधोरेखित करतात.अनुभव संपन्न सृजनशील दृष्टीने निवडलेल्या या सत्य कथा आहेत. प्रखर वास्तवात आशेचे किरण निर्माण करणाऱ्या या कथा, जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश देतात.
लेखिका सुधा मूर्ती स्पष्टपणे प्रस्तावनेत नमूद करतात की,“मी आजवर जे जे लिहिलेलं आहे.मला भेटलेल्या लोकांच्या आगळ्या वेगळ्या जीवनाविषयी.आजवर ज्या लोकांनी मला त्यांच्या जगात सामावून घेतलं.त्यांच्या हृदयात स्थान दिले.त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोपनीय गोष्टी मनमोकळेपणाने माझ्यासमोर उघड केल्या.अडचणी मांडल्या त्या सर्वांना मदत करण्याची संधी मिळाली. केवळ तटस्थपणे कथा सांगणाऱ्या कथाकथनकाराचं मी काम केलं.”
वास्तव आयुष्यातील सत्यकथा. जगात अजूनही चांगुलपणा आणि वाईटपणाही आहे. तरीही अजून सुद्धा द्वेषापेक्षा प्रेम अधिक आहे. हेच या कथांमधून सिध्द होते.कथांचे वाचन करताना निश्चितच रसिक वाचकांना आनंदानुभवा सोबतच वैचारिक खाद्यही मिळेल.
शीर्षक अनुक्रमणिकेतून आपणाला या कथांची ओळख होते. त्या स्वीकार,लाल गुलाब,ढाक्याची मुलगी, अग्निपरीक्षा, अमृत,नाही म्हणण्याचा हक्क,माझ्या वडिलांचा चष्मा,आग्नेया,नवी सुरुवात, अगम्य गूढ जोडप्याची गोष्ट,झन्नू मांकडियाने हे साध्य करुन दाखवलं, सविताची गोष्ट,ॲसिड,आजी-आजोबांचा दिवस,उदयन इफेक्ट,टाइम टू पॅक अप?, जबाबदार’ गुंड’,इस हाथ दे उस हाथ दे,ते एका वादळात पडलं, एक आगळीवेगळी गाठभेट.
‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’या कथासंग्रहातून आपापल्या गोष्टी कहाणी रसिक वाचकांना घेऊन आलेले हे सगळे लेखक खऱ्या अर्थाने तरुण पिढीवरचा विश्वास नक्कीच दृढ करत आहेत.सत्य आत्मवृत्त सांगण्यासाठी धाडस आणि आत्मविश्वास लागतो. सुधा मूर्ती यांनी प्राप्त झालेल्या सगळ्या गोष्टींचे मनापासून वाचन केले.काही अनेक वाचन पारायणे केली.यातून त्या कथांची आशयघनता आणि जीवनातील परिवर्तनाची बीज लक्षात आले.वयस्कर माणसांनासुध्दा आयुष्यातील कठीण प्रसंगी सामोरे जाण्याचं आणि आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करण्याचं कौशल्य अवगत होतं.
लहान लहान घटना प्रसंगातून नातेसंबंध दृढमूल होतोय हे पटवून देणाऱ्या प्रेरक सत्यकथा स्तिमित करणाऱ्या, हृदयाला भिडणाऱ्या, मनात कनवाळू दयेची भावना निर्माण करणाऱ्या, संस्कारित संचित पेरणाऱ्या समस्त कथांचा संग्रह अनुवादक लीना सोहोनी यांनी ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अप्रतिम लेखणी शैली! मनाचा ठाव घेणारी आशय समृध्द भाषा आणि समर्पक शब्दांची उत्तम पेरणी करुन हा कथांचा बगिचा फुलवला आहे…
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
दिनांक:२७ नोव्हेंबर २०२५

Comments
Post a Comment