पुस्तक परिचय क्रमांक:२५९ पुढचं पाऊल
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५९
पुस्तकाचे नांव-पुढचं पाऊल
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण सप्टेंबर ,२०१३
पृष्ठे संख्या–१०८
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-पुढचं पाऊल
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
स्वातंत्र्यपुर्व काळातील गावकुसाबाहेरील माणसांच्या जगण्याची चित्तरकथा कथालेखनाचे भिष्माचार्य जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर तथा आदरणीय तात्यासाहेब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अप्रतिम अक्षरसाहित्य ‘पुढचं पाऊल’.दलित समाजातील लोकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी गावाबाहेर पडून शहरांकडे धाव घेणारी माणसं होती.
तिथं आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण किंवा अंगमेहनतीची कामे करून रोजीरोटी मिळवणं हे पहिलं उद्दिष्ट.याच आशयबीजावर आधारित ही कादंबरी आहे. काळाची पाऊलं ओळखून मागे पाय रुतवून ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने आणि हिमतीने पाऊल पुढे टाकून आपलं जगणं सुखासमाधानी होण्यासाठी गावाचं तराळकीचं कामाला तिलांजली देऊन देवाचा पुत्र कृष्णा कुणालाही न सांगता तक्क्यातील ढोलकी घेऊन रात्रीचाच मुंबईला परागंदा होतो.आणि तिथल्या तमाशाथेटरात ढोलकीवादकाचा काम मिळवतो.त्या कृष्णाचं एकच स्वप्न असतं. देवडी गावात आपला स्वतःचा एक मळा असण्याचा…यासाठीच तो पैसा कमवत असतो.आपल्या घराचा मायेचा पाश तोडून तो स्वप्ननगरीत राबत असतो.त्याची कथा ‘पुढचं पाऊल’
अप्रतिम लेखणीतून गावचे आणि शहराचे घटनांपासून रेखाटले आहेत.वाचताना पुढं काय घडतेय?याची उत्सुकता निर्माण होते.त्याच्या स्वप्नाचा भावोत्कट मागोवा लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी, ‘पुढचं पाऊल' या कादंबरीत शब्दबध्द केला आहे.
वडील देवाचं तराळकीचं काम,भाऊ गणाचं बावऱ्यानानाच्या मळ्यात रोजंदारीवरचं काम, बायको रखमाचं कोंड्याचा मांडा करुन मुलांना वाढवण्याचा प्रयत्न वाचताना आपण भावस्पर्शी होऊन जातो.तर मुलं रश्शी आणि बिंच्या यांच आईला उदरनिर्वाहासाठी पोरसवदा वयात पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टाची कामे करणं.काम नसेल तेव्हा भूकेसाठी दुसऱ्याच्या शेतात चोऱ्यामाऱ्या करणं.
हॉटेलवाला सखाराममामा भाबड्या कृष्णाला समजून घेतो.कामधंद्यासाठी आलेल्या कृष्णाला मदतीचा हात देतो.तमाशात मोगरीबाईकडे ढोलकी वाजवायचं काम लावण्याची शिफारस करतो.अन् सतत चांगल्या कामाची सचोटीने व्यवहार करण्याची सूचना करत असतो अन् आसराही देतो.
इकडं कृष्णाचं मजेत चालले असताना त्याला तमासगीरीन मोगरी इश्काच्या जाळ्यात अडकवण्याचं काम करत असते. पण तिच्या इश्काच्या रंगबाजीला हा अजिबात थारा देत नाही.तो फक्त ढोलकी वाजवायचं काम करत असतो. त्यादोघात पैश्यावरुन हाणामारी होते.ते काम सोडून तो हमालीचं काम करत पण तब्बेत साथ देत नाही म्हणून काम बदलतो.
शेतीभातीच्या मळ्याचं वर्णन खास ग्रामीण माणदेशी शैलीत तात्यासाहेबांनी केलं आहे.गावाला लागूनच कृष्णाची दोन एकर काळी जमीन आहे.हत्तीच्या मस्तकासारखी काळीभोर! मृगाच्या शिडकाव्याने ती मऊ लुसलुशीत झाली होती, फुलारली होती.सुवासाचे श्वास सोडीत होती.वर निळं आभाळ पांढुरक्या ढगांनी भरलं होतं.रानपाखरं गिरक्या घेत चिवचिवत होती. समोर निळे डोंगर होते. आसपास इतर रानांचे तुकडे होते. बांधावरली,तालीवरली हिरवीगार झाडं संध्याकाळच्या गार वाऱ्यानं डुलत होती.
त्या मऊ जमिनीवर येताच पोरं हरकली. त्यांनी मातीत कोलांट्या उड्या घ्यायला, धावायला सुरुवात केली.अन् त्याचं मन आनंदाने भरून आलं.बायकोचा हात धरून तो उत्तेजित स्वरात म्हणाला, ‘’रखमे रखमे हे आपलं रान.ही आपली काळी आई!’’ त्याच आवेगाने तो खाली वाकला.पैशाच्या ढिगातून रुपयांची ओंजळ भरुन घ्यावी तशी त्याने ती माती ओंजळीत घेतली,तिचा वास घेऊन त्याने माती कपाळी लावली.त्याच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.निळ्या आभाळाकडे बघत तो दाटल्या घशानं म्हणू लागला, “माजा म्हातारा हे बगायला जगला न्हाई.”
अप्रतिम लेखणीतून साकारलेली अप्रतिम कादंबरी ‘पुढचं पाऊल'.एकदातरी असं अस्सल ग्रामीण साहित्य वाचायला मिळणं सदभाग्य आहे.अंगच्या कलेचं सादरीकरण करुन पैसा कसा कमवावा, हा जगण्याचा मार्ग अधोरेखित करणारा अन् उराशी बाळगलेले स्वप्न साकार कसं होतं.हे उलगडून दाखविणारी कादंबरी-पुढचं पाऊल.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २५नोव्हेंबर २०२५

Comments
Post a Comment