पुस्तक परिचय क्रमांक:२५६ राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५६
पुस्तकाचे नांव-शिक्षण क्षेत्रातील एक सकारात्मक प्रयोग -राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम
लेखक: प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर
प्रकाशन-यशोदा प्रकाशन, गारगोटी कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती जून,२०१३
पृष्ठे संख्या–३१९
वाड़्मय प्रकार-माहितीकोष
किंमत /स्वागत मूल्य-३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-शिक्षण क्षेत्रातील एक सकारात्मक प्रयोग -राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम
लेखक:प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले एक अभियान!, ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’या कार्यक्रमाचा आराखडा ते फलनिष्पत्ती असा उद्दिष्टे साध्य होईपर्यंत झालेली लिखित दस्ताऐवज या यशस्वी अभियानाचे ‘शिक्षण तज्ज्ञ’म्हणून प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर सरांनी सेवाभावी वृत्तीने मांडलेला लेखन प्रपंच होय.
पुस्तकाचे आशयपूर्ण नावातच ‘शिक्षण क्षेत्रातील एक सकारात्मक प्रयोग -राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ एकात्म आणि एकसुत्री पध्दतीने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या अभिनव अभियानची महती लक्षात येते.
हा लेखन प्रपंच‘आधी केले,मग सांगितले’या उक्तीप्रमाणे केलेला आहे.या पुस्तकात एकूण चार विभागात या अभियानाची मांडणी केली आहे.तसेच लेखन करताना औचित्यपूर्ण घटना प्रसंग, विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या प्रतिक्रिया यांचे संदर्भ देत लेखन प्रभावीपणे मांडले आहे.तसेच वेळोवेळी शाळांना दिलेल्या भेटी आणि अध्यांपकांशी चर्चा यातील सार नवोपक्रम स्वरुपात फलनिष्पत्तीसह रेखाटले आहेत.
पाल्हाळीक वर्णन व फाफटपसारा न करता आशयाचे समर्पक व यथार्थ शब्दात सुलभीकरण करून आकृत्या व कोष्टके देऊन यातील आशय अधोरेखित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. म्हणून गुणवत्ता विकासाचा अभिनव प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविलेला आहे सन २००३पासून राबविला आहे.
मुखपृष्ठावरील आकर्षक विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार सादरीकरणाची चित्रं आणि रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचे रंगीत छायाचित्र अभिनव प्रयोगाची आशयघनता साक्षांकित करतात.तर मलपृष्ठावरील ब्लर्ब पुस्तकाची खासियत अधोरेखित करणारा आहे.या संक्रमण ग्रंथाला शांतीनिकेतन लोक विद्यापीठ, सांगलीचे शिक्षणतज्ज्ञ प्रा.पी.बी.पाटील यांची प्रस्तावना लाभली असून तत्कालीन राज्यमंत्री नामदार हसन मुश्रीफ, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पोरेड्डीवार आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महावीर माने यांचे अभिप्राय पुस्तकाची गरज आणि महत्त्व अधोरेखित करतात.
प्रस्तुत शैक्षणिक कार्यक्रमाचा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारुन प्राथमिक शिक्षकांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करत सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ‘ज्ञानयज्ञा’साठी घेतलेली फार मोठी गरुड भरारी आहे.विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रशासन, शिक्षक आणि पालक यांनी नेमकेपणाने काय करणं गरजेचे आहे.त्याची चळवळ उभी करुन सुरू केलेलं खऱ्याअर्थाने हे जनतेचे अभियान आहे.या चळवळीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला व्हायला हवा म्हणून प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर यांनी, “शिक्षण क्षेत्रातील एक सकारात्मक प्रयोग -राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम”या शैक्षणिक ग्रंथाचे लेखन केले आहे.
या प्रयोगशील पुस्तकातील सर्वच लेखन सदरे आपणाला सद्यस्थितीतही विद्यार्थी गुणवत्तेसाठी काय करावे? याची दिशा देण्याचे कार्य तर करतातच याशिवाय एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून उपयोगी पडतील असं माझं मत आहे. विशेषत: अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांसाठी अध्ययन अनुभवांचे कृतीयुक्त धडे कसे गिरवून घ्यावेत.तसेच मुलांमध्ये मूल्यवर्धित संस्कार कसे आचरणात आणावेत आणि विद्यार्थी ज्ञानपरायण कसा होईल?यासाठी एक उत्तम संस्कारित संचित म्हणून उपयोगी पडणारे हे पुस्तक आहे.
कोल्हापूरांतील ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाने’ही शिक्षणाच्या आशयाची कोंडी फोडण्याचाही प्रयत्न केला आहे.शालेय परीक्षेच्या अभ्यासासह जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक मूलभूत असलेल्या अन्न,वस्त्र आणि निवारा गरजांप्रमाणे जीवनोन्नतीसाठी मानवी जीवन मूल्यांची जोपासना करण्यासाठी विविध सुप्तगुण जागरणासाठी या अभियानाचा उपयोग होईल. ‘सहवीर्य करवाव हे!’या सुवचनाप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन सर्वांगीण शिक्षणाचे शिवधनुष्य कसे पेलले आणि मुलांना दर्जेदार व गुणवत्तेचे शिक्षण कसे प्राप्त होत गेले.त्याचा हा उंचावलेला लिखित दस्ताऐवज म्हणजे प्राचार्य डॉ.आर.डी. बेलेकर लिखित ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ अभियान यशोगाथा होय.
अतिशय समर्पक आणि सहज सोप्या शैलीत चिकित्सकपणे शब्दांवर संस्करण करून वास्तव लेखाजोखा मांडला आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २६ऑक्टोंबर २०२५


Comments
Post a Comment