पुस्तक परिचय क्रमांक:२५८ पाऊलवाटा





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५८
पुस्तकाचे नांव-पाऊलवाटा 
लेखक: शंकर पाटील 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण डिसेंबर,२०१७
पृष्ठे संख्या–११४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-११०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५८||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-पाऊलवाटा 
लेखक: शंकर पाटील 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्तिचित्रांतून शब्दबध्द करणारे लोकप्रिय पटकथाकार, जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण व खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.ऐकायला व वाचायला मिळतात. नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते बारकाईने व  चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात.
कथा,कादंबरी,वगनाट्य, चित्रपट पटकथा या सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. ऊन,खुशखरेदी, खुळ्याची चावडी,खेळखंडोबा, जुगलबंदी,टारफुला,धिंड,पाऊलवाटा यासारख्या अनेक कथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे.त्याच पठडीतील एक बहारदार कथासंग्रह म्हणजे ‘पाऊलवाटा’होय.
या कथासंग्रहात खेडेगावातील ग्रामीण जीवनोन्नती आणि खेड्यातील समस्या, बदललेलं खेडं आणि याच पांढरीत राहणाऱ्या इरसाल,मासलेवाईक माणसांच्या स्वभावगुणांचे रेखाटन चित्तरकथेच्या रुपाने वाचन रसिकांना मंत्रमुग्ध करत राहते.इतकं वास्तव आणि सखोल लेखन केले दिसून येते.गावच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण आणि विवेचन अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दात उलगडून दाखविले आहे.
 घनदाट जंगलांतून जाणारी अनवट पाऊलवाट मुखपृष्ठावर झळकली आहे.  निसर्ग सौंदर्याने मुखपृष्ठ आकर्षक आणि नेत्रदीपक दिसते.ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणारा कथासंग्रह ‘पाऊलवाटा’
याच्या आशयाची खोली आणि उंची  मृद्रांकित करणारे रंगीत मुखपृष्ठ आपणास पुस्तक हाताळण्याची लालसा निर्माण करते.तर मलपृष्ठावर पाऊलवाटांचा ऋतूत
नवं रूप धारण करणाऱ्या वाटांचा साज 'ब्लर्ब' मध्ये अतिशय मनभावन शब्दात रेखाटला आहे.
     काही माणसांचा जसा थांग लागत नाही,तसा वाटेचाही अंदाज लागत नाही.माणसाची ‘खोली’एक वेळ अजमावता येते;पण या वाटेची लांबी कधी समजत नसते.कदाचित म्हणूनच पाऊलवाटांची लांबी मोजण्याच्या भानगडीत कोणी पडत नसावा.देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर मैलाचे दगड दिसतात;पण पाऊलवाटेवर मैलाचा दगड अजून कोणी रोवलेला नाही!आपली मोजमापे कुणी घेऊ नयेत म्हणून तिची चाल वाकडी,घसरडी,मजेशीर, चकवी,फुफाट्याची,वळणावळणाची तर कधी गावच्या मातीची ऋणानुबंध जपत एकटं चालणाऱ्या आपल्या गावकऱ्याशी गप्पा मारत गावच्या बातम्या पुरवणारी रुळलेली आणि मळलेली पाऊलवाट.
 या कथासंग्रहात एकंदर सव्वीस कथांचा समावेश केला आहे.यात लघुकथांचा काही अंशी समावेश केला आहे. विनोदा ढंगाने सामाजिक परिस्थितीवर चिंतन करायला लावणाऱ्या कथांचा समावेश आहे.स्वातंत्र्य पुर्व काळातील स्थानिक परिस्थिती आणि सध्याचे निमशहरी झालेलं खेडे यातील बदल,फरक टिपकागदासारखा समर्पक शब्दांनी टिपला आहे.यातील पंख असलेला सस्तन प्राणी,पालकांच्या सुरस व चमत्कारिक गोष्टी, बाई:एक शनिचा खडा!,नवे नवे धंदे,सहकार:जुना आणि नवा,गाव हेही एक माणूसच, अंमलदार: जुनेआणि नवे,खेडं:एक मुखपृष्ठ,गूळपाणी ते कोकाकोला,ग्रामीण मराठीवरील इंग्रजीचा परिणाम,भागाबाई,‘एक मिनिट येतं, एक कणं घेतं’या कथेत खेडेगावातील माणसं काहीही कामधंदा न करता चारही प्रहर काय करतात हे पटवून दिले आहे.
थापा मारणं-एक कला ,यात गावातील एकतरी इसम बोलका असून एखादी बातमी तेलमीठ चोळून गावात कशी पसरवतो.अश्या बाकळ्या बाताड्या गणूची कथा वाचली की लक्षात येतं खरोखरच थापा मारणं ही सुध्दा एक कलाच आहे. पुढे एक नको तो व्यवसाय!, ‘एक न मावळणारी संध्याकाळ’; साहित्यातील भिष्माचार्य प्रा.ना.स.फडके, लेखक आणि डॉ.यु.म.पठाण यांच्यात रंगलेल्या गप्पांची मैफल.हल्ली तलाठ्यांना कोणत्याही कामासाठी मलिदा कसा द्यावा लागतो त्याचे वर्णन करणारी आँखो देखी कथा म्हणजे ‘तलाठी:गावचं एक देणं!’
एक खुळी समजूत या कथेत शेतकऱ्यांच्या व्यवहारी दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.गाजराची पुंगी,मी पाहिलेलं भूत, परोपकार, मुंबईचा धाक आणि एका चिक्कू माणसाची गोष्ट या कथाही गमतीदार आठवणी डोळ्यासमोर उभ्या करतात.सर्पकथा,एक घरगडी, पाऊलवाटा अप्रतिम कथा तर समारोपातील ‘काळाचा महिमा’गावच्या पाटलांच्या पुर्वीच्या आणि सध्याच्या काळावर भाष्य करणारी राजकारणापायी  चेकमेट देणारी कथा.यातील काही उतारे लेखक शंकर पाटील यांच्या लेखणीला सलाम करणारे आहेत. खेडं:एक मुखपृष्ठ या कथेत त्यांनी ‘खेडणं म्हणजे जमीन कसणं अन् खेडू म्हणजे जमीन कसणारा, तेव्हा खेडूंची जी वस्ती ते खेडं.’ते खेडं आज दिसत नाही. आता त्याचा तोंडवळा बदलला आहे. अंतरंगाचा ठाव घेणं तर आणखी कठीण.
-शंकर पाटील 
 “हरेक माणूस जसा देवानं वेगळा घडवला आहे, तसं प्रत्येक गाव वेगळं घडवलं.कान, नाक, डोळे असून जसा प्रत्येक चेहरा निराळा,तशी घरं-दारं आणि देऊळ असूनही प्रत्येक गाव निराळं.थोडक्यात काय तर माणसाला जसं एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व असतं तसं ते गावांनाही असतं.प्रत्येक गावाला त्या गावची म्हणून एक खास पर्सनॅलिटी असते आणि म्हणूनच प्रत्येक गावचं ‘पाणी’निराळं असतं.ते चाखण्यात मौज असो वा नसो; पण ते पाहण्यात मौज निश्चित असते!’’
अप्रतिम कथासंग्रह गावच्या मातीशी ऋणानुबंध जपत गावची वैशिष्ट्ये आणि गावच्या माणसांची स्वभाव वैशिष्टे ठळकपणे व्यक्त करणारा कथासंग्रह 
‘पाऊलवाटा’.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- १६ नोव्हेंबर २०२५


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी