सेवा गौरव समारंभ विडणी केंद्रप्रमुख लता दीक्षीत





   

फलटण तालुक्यातील विडणी व झिरपवाडी केंद्रसमूहाच्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सौ.लता रत्नकुमार दीक्षित मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव समारंभ श्री हरिश्चंद्र वाघमोडे विभागीय वनाधिकारी, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री रवींद्र येवले सर,डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.सतिश फरांदे सर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी श्री सी.जी.मठपती,श्री बन्याबा पारसे,सौ.वर्षा गायकवाड, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन सौ.निशा मुळीक,माजी चेअरमन श्री राजेन्द्र बोराटे,माजी व्हाईस चेअरमन श्री शशिकांत सोनवलकर, संचालक सौ.पुष्पलता बोबडे मॅडम,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ सल्लागार श्री बाबासाहेब औटी सर, केंद्रप्रमुख विडणी सौ.राजश्री कुंभार विडणी व झिरपवाडी केंद्र समूहातील सर्व शिक्षकवृंद, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री रवींद्र परमाळे सर स्वागत विडणी व झिरपवाडी केंद्रसमूहातील शिक्षकांनी केले.तर आभार श्री धनंजय सोनवलकर यांनी मानले.या कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन करण्याची व लेखन करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमास दीक्षित मॅडम यांचे आई-वडील उपस्थित होते. त्यांना कन्येचा सेवापुर्ती सोहळा पाहण्याचे सद्भाग्य लाभले...हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य..
           || मानपत्र ||
सौ.लता रत्नकुमार दीक्षित, केंद्रप्रमुख
बी.ए.बी.एड.एम.एड.

         अष्टपैलू शिक्षिका 
      शैक्षणिक कार्यकर्तृत्वाची पताका
  विद्यालयात फडकवत ठेवून
प्रशासकीय कार्यकुशलतेने केंद्र समूहातील विद्यामंदिरांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण केलेले प्रयत्न म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी प्रेरक दीपस्तंभच..
शिक्षणातून देशसेवा, शिक्षणातून प्रगती, शिक्षणातून उजळतो इतरांना उजळविणारा एक ज्ञानदीप…सेवागौरव एका तेजस्वी प्रशासकीय ज्ञानगुरुचा.३८.६वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून नियत वयोमानानुसार आपण ३१ मे २०२५रोजी सेवानिवृत्त झाला आहात.आपले पिताश्री श्री.वसंत वेदपाठक हे ग्रामसेवक.आपण त्यांची जेष्ठ कन्या. प्राथमिक शिक्षणाचे धडे जीवन शिक्षण विद्यामंदिर बरड ता.फलटण येथे गिरवलेत;तर माध्यमिक शिक्षण वेण्णा हायस्कूल मेढा येथे पुर्ण केलेत. तदनंतर आपण सातारा जिल्ह्यातील नामांकित ‘जिजामाता अध्यापिका विद्यालय’ येथून अध्यापिका पदवी उत्तीर्ण झालात.आणि
 १९८६ साली प्राथमिक शिक्षक म्हणून जावली तालुक्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिर पिंपरी (मेढा)येथून ज्ञानसेवेचा प्रारंभ केलात.शैक्षणिक उठाव,निरंतर शिक्षण, विविध स्पर्धा,गीतमंच आणि कलापथक आदी उपक्रमातून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावलात.या शाळेतील ग्रामस्थ व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने मिळवलेल्या ‘शैक्षणिक उठावाच्या’उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.हीच आपल्या कार्याची पोचपावती.तदनंतर तुमची बदली आगलावेवाडी येथे झाली.आपला विवाह उच्चविद्याविभूषितM.Sc.Agri राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्री.रत्नकुमार दीक्षित यांच्याशी झाला.आनंद सुखी संसाराला सुरुवात झाली. 
संस्काराचा ज्ञानवारसा अनेक विद्यार्थ्यांना देऊनयशवंत गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केलेत.पुढे आपली बदली फलटण तालुक्यातील प्राथमिक शाळा-बरड येथे झाली.सेवाकाळातच आपण बी.ए.बी.एड. तसेच एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे येथून उच्चविद्याविभूषित ‘एम.एड.’ 
 पदवी उत्तीर्ण झालात. शिक्षणातील नवनवीन तंत्राचा अभ्यास करण्यासाठी आपण पुणे येथील आरेखन व नवी दिल्ली येथील ‘सांस्कृतिक स्त्रोत’ प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेत.
     आपली वनदेवशेरी शाळेत पदोन्नतीने पदवीधर शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. आपली विशेषता म्हणजे संयम, सहानुभूती आणि समर्पणभावना.ती केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही,तर आपल्या वागणुकीतून विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते आणि त्यांच्या पाठीशी उभी राहते.आपण विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील अध्यापिका म्हणून कृतिशील अनुभवाची, संस्काराची घौडदौड अखंडपणे चालू ठेवलीत.याच कार्यकाळात तुम्ही बनविलेले ‘माय इंग्लिश ट्रेझर बॉक्स’ शैक्षणिक साहित्य जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.भारतीय प्रबंध संस्था,वस्वपूर अहमदाबाद या संस्थेने तुमच्या नवोपक्रमाची निवड केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी तुमचे अभिनंदन केले!याचा सार्थ अभिमान आम्हास वाटतो.
  जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थेच्या 'एव्हरीडे इंग्लिश प्रोजेक्ट'साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेले कार्य, तसेच तालुका, जिल्हा व विभाग स्तरीय पुनर्रचित अभ्यासक्रम इ.५वी ते इ.७वी सर्व विषय आणि इतर विविध प्रशिक्षणात आपण तज्ज्ञ मार्गदर्शक तथा मेंटार म्हणून बजावलेली भूमिका आम्हास प्रेरणादायी आहे.
आपण प्राथमिक शाळा अनुक्रमे पिंपरी- २वर्षे, आगलावेवाडी-६वर्षे,बरड-२वर्षे, वनदेवशेरी- १३वर्षे,वडले-८वर्षे, राजुरी-२ वर्षे, झिरपवाडी-६वर्षे अशी प्रदीर्घकाळ शैक्षणिक सेवा केलीत.आणि विडणी व झिरपवाडी केंद्रसमूहाच्या दहा महिने प्रशासकीय कार्यभार स्वीकारुन सेवापुर्ती केलीत. सर्वांना बरोबर घेऊन आपल्या संकुलातील शाळांचा गुणात्मक दर्जा संवर्धित करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करून यशस्वीपणे राबविलेत.शाळांची गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांचा आलेख उंचावत गेलात. आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यकिर्दीस सलाम…..
आपल्या शुभारंभाच्या ते निवृत्तीच्या शाळेतील शिक्षक सहकारी,पालक आणि विद्यार्थी यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध निरपेक्ष भावनेने आपण जोपासत आहात.
आपल्या शैक्षणिक,राष्ट्रीय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल आपणास आदर्श शिक्षक पुरस्कार,कुटुंब कल्याण कार्यक्रम जिल्हा पुरस्कार, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सन२०२२-२३ या वर्षी झालेल्या ‘NMMS’ परीक्षेत कु. श्रावणी दिपक गाडे हिला सारथी शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल झिरपवाडी ग्रामस्थांनी केलेला सत्कार म्हणजे आपल्या शैक्षणिक कर्तृत्वाचा महामेरूच होय.
  आपल्या शैक्षणिक कार्यपुर्तीचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते विडणी व झिरपवाडी केंद्रसमूहातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या वतीने ‘मानपत्र’देवून सन्मानित करण्यात येत आहे.

दिनांक- २२जून २०२५
शब्दांकन- श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 
मुख्याध्यापक आदर्श शाळा-माझेरी पुनर्वसन 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड